प्रश्न --जागृतता व स्व निरीक्षण यामध्ये काय फरक आहे? जागृततेत कोण जागृत असतो ?
उत्तर--प्रथम आपण स्वनिरीक्षण म्हणजे काय ते पाहू. स्वनिरीक्षण म्हणजे स्वतःमध्ये पाहणे .स्वत:चे निरीक्षण करणे .स्वतःची तपासणी करणे .एखादा स्वतःची तपासणी का बरे करतो ?
अर्थातच सुधारणा होण्यासाठी,बदलण्यासाठी , स्वतःला जो इष्ट वाटतो असा बदल होण्यासाठी .तुम्ही काहीतरी बनण्यासाठी स्व निरीक्षण करता अन्यथा तुम्ही स्वनिरिक्षणाच्या भानगडीत पडणार नाही .जर सुधारणेची, बदलाची ,तुम्ही जे काही आहे त्याहुन जास्त चांगले होण्याची, तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही स्वनिरिक्षण करणार नाही.स्वनिरीक्षणाचे हे उघड उघड कारण आहे .मी रागावलेला आहे. मला वारंवार राग येतो. राग वाईट आहे हे मला पटले आहे . रागापासून मुक्त होण्यासाठी मी स्वनिरीक्षण करतो.स्वनिरीक्षणांमधून राग कसा घालवता येईल, मी कसा शांत होईन, मी कसा बदलेन याचा मी विचार करतो .सुधारणा होण्यासाठी, रागापासून मुक्त होण्यासाठी, मी स्वनिरीक्षण करतो.जिथे जिथे स्वनिरीक्षण आहे,तिथे तिथे सुधारण्याची, बदलण्याची' काहीतरी बनण्याची, इच्छा आहे . म्हणजेच धारणा बदलण्याची, प्रतिक्रिया सुधारण्याची, इष्ट जबाब येईल अशी पार्श्वभूमी तयार करण्याची,आपल्याला योग्य वाटेल अशी धारणा बनवण्याची, इच्छा आहे .म्हणजेच ध्येय समोर आहे. आपण त्या ध्येयापासून दूर आहोत .ध्येय प्राप्ती झालेली नाही म्हणून आपण दुःखी कष्टी श्रांत अवस्थेत आहोत .स्वनिरीक्षण हे नेहमी दुःखी कष्टी अवस्थे बरोबर असते . जेव्हा तुम्ही स्वनिरिक्षण करता म्हणजे स्वतःला तपासता ,जेव्हा तुम्ही तुमच्या धारणे प्रमाणे योग्य वाटणाऱ्या हेतूंची पूर्ती करण्यासाठी स्वतःला तपासता,म्हणजेच धारणेमध्ये बदल करण्याच्या इच्छेने स्वतःला तपासता, त्यावेळी एक प्रकारची श्रांत क्लांत दु:खी कष्टी अवस्था निर्माण झालेली असते. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे कि नाही ते मला माहित नाही.ही एक प्रकारची लाट नेहमी येत असते. या लाटे विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.या विशिष्ट अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला पुन:पुन:निरीक्षण करावे लागते.स्वनिरीक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यातून तुमची खरी सुटका कधीही होत नाही. स्वनिरीक्षणामुळे खरी स्वतंत्रता मिळणार नाही .कारण जे काही आहे त्याचे जे काही नाही त्यात रूपांतर करण्यासाठी होणारी ती प्रक्रिया आहे .या क्रियेमध्ये नेहमी संग्रह प्रक्रिया चालू असते."मी" कशाची तरी, त्यात बदल घडून आणण्यासाठी तपासणी करीत असतो. म्हणून येथे नेहमी द्वैत, विरोध,संघर्ष , सुरू असतो.त्यातून निष्फळता पदरी पडत असते. यातून कधीही सुटका होत नसते .ही निष्फळता लक्षात आल्यामुळे मन श्रांत कष्टी दुःखित वगैरे होते.
जागृतता ही सर्वस्वी निराळी आहे .जागृतता म्हणजे स्वीकाराशिवाय किंवा धि:काराशिवाय साक्षित्व होय.साक्षित्व हेच स्वीकार किंवा धि:कार याशिवाय असते.जागृततेतून समज निर्माण होते.कारण तिथे धि:कार किंवा समरसता याशिवाय केवळ स्तब्ध साक्षित्व असते.
जर मला एखादी गोष्ट समजून घ्यावयाची असेल तर मला ती फक्त पाहिली पाहिजे .मला टीका करून धि:कार करून चालणार नाही .मी तिचा सुखप्राप्ती होत आहे म्हणून अवलंब करून चालणार नाही.किंवा दुःख होत आहे म्हणून ती टाळून चालणार नाही. मी फक्त पाहात असले पाहिजे.वस्तुस्थितीचे फक़्त स्तब्ध साक्षित्व पाहिजे. कुठलेही ध्येय इथे दृष्टीपथात नसते.कुठचाही हेतू इथे नसतो.फक्त जे जे जसे जसे उद्भवते त्याबद्दल सदैव जागृत असणे एवढेच इथे असते.जेव्हा धि:कार,समर्थन, समरसता, विरोध,असतो तेव्हा साक्षित्व व समज लुप्त होते .स्वनिरीक्षण म्हणजे स्वसुधारणा होय.स्वनिरीक्षण म्हणजे स्वकेंद्रितता होय. जागृतता म्हणजे स्वसुधारणा नव्हे.किंबहुना "मी"ला "स्वतः"ला त्याच्या सर्व पैलूसहित,स्मरणासहित, पार्श्वभूमीसह, धारणेसह, हेतूसह,मागण्यांसह,लालसांसह, तिलांजली देणे होय. स्वनिरीक्षणात धि:कार व समरसता असते.जागृततेत धि:कार किंवा समरसता नसते .त्यामुळे तिथे बनणे नसते. स्वसुधारणाहि नसते.कसलीही इच्छा नसते. स्वनिरीक्षण व जागृतता यात जमीन अस्मानाचा फरक आहे .
ज्या व्यक्तीला स्वसुधारणा घडवून आणायची आहे तो कधीही जागृत असणार नाही .सुधारणा म्हणजे कसलातरी स्वीकार व कसला तरी धि:कार होय .सुधारणेमध्ये कसल्या तरी हेतूची पूर्ती असते .या उलट जागृततेमध्ये धि:काराशिवाय, नाकारल्याशिवाय, किंवा स्वीकार केल्याशिवाय, फक्त पाहणे असते .प्रथम जागृतता बाह्य गोष्टींबद्दल सुरू होते .जड वस्तू व निसर्ग यांच्याशी असलेल्या संबंधरूपते बद्दल प्रथम जागृतता सुरू होते .स्वतः भोवती असलेल्या वस्तूंबद्दल जागृतता म्हणजेच वस्तू निसर्ग व लोक यांच्याशी असलेल्या संबंधरूपते बद्दल जागृतता होय .नंतर कल्पनांशी असलेल्या संबंधरूपते बद्दल जागृतता निर्माण होते .निसर्ग लोक कल्पना यांच्याशी असलेल्या संबंधरूपते बद्दलची जागृतता म्हणजेच त्यांच्या बद्दलची विलक्षण संवेदनक्षमता होय. या दोन वेगवेग़ळ्या प्रक्रिया नाहीत.ही एकच अखंड प्रक्रिया आहे .प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक विचार, प्रत्येक कल्पना,प्रत्येक भावना, प्रत्येक क्रिया, जसजशी निर्माण होईल तसतसे तिचे सदैव, अखंड, अविरत, फक्त पहाणे म्हणजेच जागृतता.जागृततेत धि:कार नसल्यामुळे संग्रह होत नाही.जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट चांगली वाटते तेव्हा तुम्ही तिचा स्वीकार करता व त्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींचा धि:कार करता .म्हणजेच ही संग्रह प्रक्रिया आहे. सुधारणा आहे.जागृतता म्हणजे "मी"च्या हालचाली समजून घेणे होय. "मी"ला लोक, कल्पना, व वस्तूजात,यांच्याशी असलेल्या संबंधात पाहणे होय.ही जागृतता प्रतिक्षणी असते. ती अंगी बाणवण्याची गोष्ट नाही.जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट अंगी बाणवण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती हळूहळू सवय बनते. जागृतता म्हणजे सवय नव्हे. जे मन सवयीने ग्रासित आहे ते असंवेदनाक्षम बनते .जे मन एखाद्या विशिष्ट क्रियारूप चाकोरीत सदैव फिरत राहते ते अतरल व मद्दड बनते.जागृतता म्हणजे तत्पर तरलता .हे समजण्याला विशेष कठीण आहे असे मला वाटत नाहीं.ही तत्परता व तरलता जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत रस घेता तेव्हा आपोआपच अस्तित्वात येते .जेव्हा तुम्ही समजणाच्या इच्छेने मूल पत्नी पती फुलझाडे पक्षी यांच्याकडे बघत असता तेव्हा ही जागृतता(संवेदनाक्षमता) अापोआपच अस्तित्वात असते.जेव्हा तुम्ही धि:कार किंवा समरसतेशिवाय पाहता तेव्हा उत्कृष्ट दळणवळण प्रस्थापित होते .द्रष्टा व दृश्य यात संपूर्ण दळणवळण असते .जेव्हा तुम्ही खरोखरच एखाद्या गोष्टीत संपूर्णपणे रस घेता तेव्हा संपूर्ण दळणवळण तिथे असते.
अशा प्रकारे जागृतता व स्वविस्तारकारक अशी स्वनिरीक्षणोत्पन्न स्वसुधारणा यात फार तफावत आहे.स्वनिरीक्षणांमधून जास्त जास्त निष्फळता येते. जास्त जास्त विरोध निर्माण होतो.तर जागृतता म्हणजे स्वतःच्या क्रियांतून सुटका करणारी प्रक्रिया होय.तुमच्या दैनंदिन हालचाली व विचार त्याचप्रमाणे इतरांच्या दैनंदिन हालचाली व विचार याबद्दल सदैव,अखंड,अविरत,प्रतिक्षणी, संपूर्ण साक्षित्व, म्हणजेच जागृतता होय.जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत रस घेत असाल, जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करीत असाल, तेव्हाच ही गोष्ट शक्य होते.जर मला स्वत:ला ओळखावयाचे आहे, वरवर नव्हे, एक दोन थर नव्हे, तर संपूर्ण गाभा समजून घ्यावयाचा आहे, तर मी अर्थातच माझा धि:कार करुन उपयोगी नाही. प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, प्रत्येक कल्पना, प्रत्येक दाबून टाकणे,स्वीकारणे, किंवा दूर सारणे, या सर्वांचे मी दिलखुलास स्वागत केले पाहिजे .जसजशी जागृतता वाढत जाते, तसतसे विचारांचे सर्व पैलू,अंतर्गत सर्व थरातील गुप्त हालचाली,क्रिया व वासना,यापासून संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त होते .जागृतता म्हणजे स्वातंत्र्य .जागृततेमुळे स्वातंत्र्य निर्माण होते. जागृततेतून स्वातंत्र्य निर्माण होते. जागृततेतून स्वातंत्र्य येते .स्वनिरीक्षणामधून विरोध मशागत होते."मी"ची जास्त जास्त कोंडी होते आणि म्हणूनच त्यात नेहमी निष्फळता व भीती असते .
प्रश्न विचारणाऱ्याला कोण जागृत असते हेही जाणून घ्यावयाचे आहे . जेव्हा तुम्हाला जोरदार अनुभव येत असतो तेव्हा काय होते ?तुम्ही अनुभवत आहा याबद्दल जागृत असता काय ?जेव्हा तुम्ही एखाद्या तीव्र भावनेच्या आहारी असता, उदाहरणार्थ क्रोध मत्सर आनंद इत्यादि त्यावेळी तुम्ही जागृत असतां काय ?जेव्हा अनुभवणे संपते तेव्हा अनुभवणारा व अनुभवावयाचे ही निर्माण होतात. नंतर अनुभवणारा जे अनुभवले त्याची पाहणी करतो. अनुभवण्याच्या क्षणी द्रष्टा व दृश्य नसते .फक्त अनुभवणे असते. फक्त दर्शन असते. आपण नेहमी अनुभवण्याच्या बाहेर असतो, म्हणून विचारतो द्रष्टा कोण ?अनुभवणारा कोण ? हा प्रश्नच चुकीचा आहे .ज्याक्षणी फक्त अनुभवणे असते त्यावेळी जागृत असणाराही नसतो व जागृतअसावयाचेही नसते.द्रष्टा नसतो. दृश्य नसते. फक्त दर्शन असते .आपल्यापैकी बहुतेक जणांना फक्त अनुभवण्याच्या स्थितीत असणे अशक्य वाटते .यासाठी विलक्षण असामान्य तरलता तत्परता व संवेदनक्षमता लागते . जेव्हा अापण इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न करीत असतो, फळाची आशा करी असतो, जेव्हा यश प्राप्तीसाठी वासना धरतो, जेव्हा शेवट आपल्या डोळ्यासमोर असतो, जेव्हा आपण गणित करीत असतो, तेव्हा तत्परता, तरलता, संवेदनक्षमता, नाकारली जाते .शेवटी पर्यवसान निष्फळते मध्ये होते.जो मनुष्य काहीही मागत नाही, जो कसलीही इच्छा करीत नाही, जो कसलाही शोध घेत नाही, ज्याला काहीही बनावयाचे नसते, तो सतत अनुभवण्याच्या स्थितीमध्ये असतो .या स्थितीत प्रत्येक गोष्ट गतिमान असते, जिवंत असते, प्रत्येकाला अर्थ असतो .काहीही जुनाट नसते, काहीही जळलेले करपलेले नसते .कसलीही पुनरुक्ती नसते. कारण जे काही आहे ते जुनाट नाही. नित्य नवीन आहे .आव्हान नेहमी नवीन असते. जवाब मात्र नेहमीच जुनाट असतो .त्यामुळे आणखी अवशेष निर्माण होतात. संग्रह वाढतच जातो . यालाच स्मरण म्हणतात .यामुळेच द्रष्टा दृश्यापासून अनुभवण्यापासून आव्हानांपासून स्वतःला वेगळा पाडतो .
तुम्ही याचा स्वतःशीच स्वतःजवळ अत्यंत सोप्या पद्धतीने व सहजरित्या प्रयोग करून पाहू शकता .आता जेव्हा तुम्ही क्रोधायमान, दंगेखोर, मत्सरी, अधाशी, किंवा जे काही असाल, त्या वेळी त्याक्षणी "तुम्ही" अस्तित्वात नसता.फक्त केवळ एक अस्तित्व स्थितीच असते. स्वतःवर पहारा करा ही गोष्ट तुमच्या सहज लक्षात येईल . त्याच्या पुढच्या क्षणी जेव्हा तुम्ही त्या भावनेला नाव देता,वर्गीकरण करता, त्याला मत्सर राग प्रेम अधाशीपणा वगेरे नावे देता, त्याच क्षणी तुम्ही द्रष्टाव दृश्य, अनुभवणारा व अनुभवावयांचे ते, निर्माण करता.जेव्हा अनुभवणारा व अनुभवावयांचे असते तेव्हा हा अनुभवणारा त्यामध्ये बदल घडवून आणू इच्छितो.हा अनुभव बदलण्याचा,त्यात सुधारणा करण्याचा,लक्षात ठेवण्याचा, किंवा लक्षात न ठेवण्याचा, प्रयत्न सुरू असतो .अश्याप्रकारे "मी" स्वतः व अनुभवावयाचे ते यांमधील विभागणी कायम ठेवतो .जर तुम्ही त्या भावनेला नाव दिले नाही,म्हणजेच तुम्ही धि:कार केला नाही, फलाची आशा धरली नाही,फक्त तुम्ही त्या भावनेबद्दल स्तब्ध जागृत असलात, तर अशा स्थितीत द्रष्टाही नसतो व दृश्यही नसते .ही एकच संयुक्त घटना किंवा प्रक्रिया आहे. तिथे फक्त अनुभवणे असते .अशा प्रकारे स्वनिरीक्षण व जागृतता ही दोन्ही संपूर्णपणे निरनिराळी आहेत .स्वनिरीक्षणामुळे जास्त विरोध निर्माण होतो . स्वनिरीक्षणांतून निष्फळता प्राप्त होते. कारण त्यात बदलण्याची इच्छा अंतर्भूत असते .बदल म्हणजे सुधारलेले सातत्य होय .जागृतता ही अशी एक स्थिती आहे की त्यात धि:कार समर्थन किंवा समरसता नसते.आणि म्हणूनच त्यात केवळ फक्त समज असते .या गतिशून्य तत्पर तरल जागृततेमध्ये अनुभवणारा व अनुभवावयाचे नसते तर केवळ फक्त अनुभवणे असते.
स्वनिरीक्षण ही स्वसुधारप्रक्रिया आहे .त्यातून स्वविस्तार होतो.त्यातून "मी" जास्त बळकट होत जातो. त्यामुळे स्वनिरीक्षणातून सत्याकडे केव्हांही जाता येणार नाही. त्यामध्ये स्वकोंडी आहे. जागृतता ही अशी स्थिती आहे कि त्यात सत्य प्रगट होते .जे काही आहे त्याबद्दलचे हे सत्य होय.आपल्या दैनंदिन अस्तित्वाबद्दलचे हे सत्य होय .जेव्हा आपल्या दैनंदिन अस्तित्वाबद्दलचे सत्य समजेल, तेव्हा तुम्ही दूरवर जाण्याला लायक व्हाल.तुम्हाला दूरवर पोहोचण्यासाठी अगदी जवळ सुरुवात केली पाहिजे. आपल्यापैकी बहुतेक जणांना एकदम झेप मारावयाची असते.जवळ काय आहे ते समजल्याशिवाय त्यांना फार दूरवर काय आहे ते समजून घ्यायचे असते .जेव्हा आपल्याला जवळचे समजेल, तेव्हा जवळ व दूर यात काही फरक नाही, अंतर नाही ,असे लक्षात येईल .सुरुवात व शेवट एकच आहे .