सिमल्याहून सकाळी आम्ही मनालीला जाण्यासाठी निघालो .संध्याकाळी मनाली येथे पोचलो .वाटेवर कुलू शहर लागले .परत येताना आम्ही तिथे एक दिवस थांबलो होतो .शिमला येथून मनाली सुमारे दोनशे सत्तर किलोमीटरवर आहे.तर दिल्लीपासून सुमारे पावणेसहाशे किलोमीटरवर आहे. मनाली हे बिआस म्हणजेच व्यास नदीच्या काठी वसलेले शहर आहे .व्यास नदीच्या खोऱ्यात कुलू खोऱ्यांमध्ये खोर्‍याच्या उत्तरेला हे शहर आहे .मनू ऋषीचा आश्रम येथे होता .मनूचे आलय ते मनाली होय . जलप्रलयाच्या वेळी सर्व प्राणीमात्रांना बीजरूपाने संरक्षित करून नंतर त्यांची पुन्हा पृथ्वीवर ज्याने स्थापना केली अशी आख्यायिका आहे तोच हा मनू होय.मनुवादी म्हणून अनेक जण अनेक जणांना धोपटीत असतात. अश्या  लोकांनी मनू काय म्हणतो ते बहुधा वाचलेले नसते!(शाब्दिक किंवा प्रत्यक्ष,मार देणारे व मार खाणारे, दोघांनीही बहुधा मनू वाचलेला नसतो!!) सांगी वांगीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून हे धोपटणे होत असते .

आणखी एक मुद्दा या संदर्भात लक्षात घेण्यासारखा आहे .कोणतेही नीतीनियम आचारपद्धती त्या त्या समाजाच्या त्या कालखंडाच्या संदर्भात असतात.आजच्या काळात हजारो वर्षांपूर्वीचे नियम योग्य की अयोग्य ते हल्लींच्या संदर्भात पारखून घेतले पाहिजेत.असे मला प्रामाणिकपणे वाटते .

आणखी एक मुद्दा मनू नक्की काय म्हणाला ते आज हजारो वर्षांनंतर सांगणे कठीण आहे .त्यानंतर अनेक लेखकांनी त्यांमध्ये मनूच्या नावाने भर घातलेली असणार ! असो हे थोडे विषयांतर झाले .

येथे वरील संदर्भात आणखी एक गोष्ट मांडावीशी वाटते .कोणत्याही धर्माच्या बाबतीत वरील प्रमाणेच मत मांडता येईल .धर्म संस्थापकाला जो काही साक्षात्कार व अनुभूती झाली,ती इतरांना व्हावी म्हणून त्याने काही यमनियम सांगितले.काही आचारपद्धती आचारधर्म सांगितला .त्या काळच्या समाजाच्या संदर्भात ते यम नियम आचार पद्धती होत्या .आजच्या काळात ते यमनियम त्या आचारपद्धती योग्य आहेत की नाही हे तपासून पाहिले पाहिजे.बाबा वाक्यं प्रमाणं अशी आपली धारणा असता कामा नये असे मला वाटते . असो.

जुन्या मनाली गावांमध्ये मनूचे मंदिर आहे .

मनाली समुद्र सपाटीपासून दोन हजार मीटर उंचीवर आहे .महाबळेश्वर समुद्र सपाटीपासून चौदाशे मीटर उंचीवर आहे .तुलनात्मक मनाली किती उंचावर आहे त्याची कल्पना येईल.मनाली विषुववृत्तापासून महाबळेश्वरपेक्षा कितीतरी दूर आहे.कर्क वृत्ताच्याही पलीकडे आहे आणि  हिमालयात आहे त्यावरून तेथील गारठ्याची थंडीची कल्पना यावी .

मनाली हे मधुचंद्रासाठी प्रसिद्ध असलेल्या अनेक स्थळांपैकी एक तर आहेच परंतु त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे .

सोलंग दरीमध्ये स्किइंगसाठी जाण्याचा हा दरवाजा आहे असे म्हटले तरी चालेल.

पार्वती दरीमध्ये ट्रेकिंगसाठी जाण्याचाही हा दरवाजा आहे 

पीरपंजाल पर्वतांमध्ये पॅराग्लायडिंग ,पर्वतारोहण ,व्यास नदीमध्ये राफ्टिंग ,आणि त्याचबरोबर चार हजार मीटर उंचीवर असलेल्या रोहतांग पासला येथूनच जावे लागते.  

प्राचीन काळापासून लडाख व काराकोरम खिंडीमधून पुढे तिबेटमध्ये जाण्याचा हा पारंपरिक मार्ग  होता व आहेही .

ब्रिटिश येथे येण्या अगोदर सफरचंद फळ येथे नव्हते .येथे ब्रिटीशांनी सफरचंदाच्या बागा निर्माण केल्या .हल्ली मनुका व नाशपाती याबरोबरच सफरचंद हे या प्रदेशात एक महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे .रेनबो व ट्राऊट हे मासेही या प्रदेशातील नदीमध्ये ब्रिटिशांनी सोडले .

एकोणीसशेपंच्याऐशीपासून काश्मीरमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दहशतवादाला सुरुवात झाली .त्यामुळे पर्यटकांचा तिकडील ओघ मंदावला.  भारतातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली .त्यामुळे पर्यटन वाढले .या दोन्ही घटनांचा  परिणाम होऊन मनालीमध्ये विशेषत: उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची रीघ लागली.एकेकाळी शांत असलेल्या गावाचे रूपांतर गर्दीच्या शहरांमध्ये झपाट्याने झाले.जुने मनाली व नवे मनाली असे दोन भाग पडले.

हॉटेल वाहतूक व इतर सेवा व्यवसाय प्रचंड प्रमाणात फोफावले . लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली . सर्वत्र पर्यटकांची गर्दी जाणवू लागली .

मनाली हे थंड हवेचे ठिकाण आहे .येथे गरम कपडे बरोबर असणे आवश्यक आहे . उन्हाळ्यातही येथील हवा थंड असते .थंडीच्या दिवसांत तर बर्फवृष्टी होते.उन्हाळ्यातही अधूनमधून निदान आसपासच्या डोंगरावर उंचावर  बर्फवृष्टी होत असते .आम्ही उतरलो होतो ते हॉटेल संपूर्णपणे लाकडी बांधणीचे होते .आमच्या खोलीच्या गॅलरीला संपूर्ण काच होती.आम्ही मनालीला गेलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाऊस व नंतर बर्फवृष्टी झाली .काचेतून समोरच्या डोंगरावर होणारी बर्फवृष्टी व नंतर त्या बर्फाचे वितळणे,प्रथम डोंगरावरील झाडी अदृश्य होऊन संपूर्ण पर्वत बर्फमय होणे व नंतर तो क्रमशः  वितळत जाऊन झाडी पुन्हा दिसायला लागणे, हे सर्व दृश्य मनोहारी होते .

थंडीच्या दिवसांत उणे सात डिग्री सेंटिग्रेड यापेक्षाही खाली उष्णतामान जाते.तर उन्हाळ्यामध्ये तीस डिग्री सेंटिग्रेडपर्यंत कमाल उष्णतामान जाते.परंतु रात्री  दहा डिग्री सेंटिग्रेड पर्यंत उतरत असल्यामुळे दिवसभर चांगलाच गारवा जाणवतो . 

आम्ही एक दिवस रोहटांग पासकडे बसने गेलो. आम्ही ज्या बसने ग व अत्यंत बिकट रस्ता असल्यामुळे येथीलच बस घेणे सक्तीचे असावे .  मे महिना असल्यामुळे आम्ही रोहटांग पासपर्यंत  जाऊ शकलो नाही.जिथे रस्ता बर्फाने पूर्णपणे व्याप्त केलेला होता तिथपर्यंत आम्ही बसने गेलो .पुढे जाणे रस्ता बर्फमय असल्यामुळे शक्य नव्हते .रस्ता बंद होता .जूनमध्ये बर्फ बाजूला करून रस्ता मोकळा केला जातो व तो मोकळा राहतोही.जे जूनमध्ये जातात त्यांना रोहटांग पासपर्यंत जाता येते असे कळले . तिथेच आम्ही बर्फावरील खेळ मनमुराद खेळलो.भुसभुशीत बर्फामध्ये पाय रुपत जातात.एकेक पाऊल उचलून पुढे टाकताना, ज्याप्रमाणे चिखलातून पुढे जाताना त्रास होतो, त्याप्रमाणेच त्रास होतो .तोच बर्फ थोडा कडक झाल्यावर इतका सुळसुळीत होतो की आपण कितीही तोल संभाळण्याचा व जपून न पडता जाण्याचा  प्रयत्न केला तरी केंव्हा धाडकन आडवे होतो ते आडवे झाल्यावरच कळते .अश्या  वेळी फ्रॅक्चर होण्याचा संभव असतो .रोहटांग पास कडे जाताना रस्ता इतका वळणा वळणाचा आहे की तो प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्याची कल्पना येणार नाही .सतत चढत उंचावर गेल्यावर मागे वळून पाहिले तर रस्ता म्हणजे एक नागमोडी रेषा दिसते.खोल खोरे पाहून छातीवर दडपण येते .हिमालयातील सर्वच रस्ते थोड्या बहुत फरकाने असेच भीतीदायक आहेत .

(क्रमशः)
२६/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel