माझा मेहुणा मोहन कोलकत्याला गेली सुमारे पन्नास वर्षे राहत आहे.हल्ली प्रकृतीच्या कारणास्तव इकडे येणे जाणे कमी झाले असले ,तरी पूर्वी वर्ष दोन वर्षांनी तो  सर्वाना भेटण्यासाठी इकडे आवर्जून येत असे .आल्यानंतर दादा ताई तुम्ही तिकडे केव्हा येता असे तो नेहमी विचारीत असे.तिकडे जायचे म्हणजे बरेच दिवस रहाता आले पाहिजे असे वाटत होते .मला प्रवासाची खूप आवड आहे .तेव्हा कोलकत्त्याच्या  जवळच्या जगन्नाथ पुरी , दार्जिलिंग , शांतीनिकेतन सह  कलकत्ता ही संपूर्ण  पहायचे होते.त्याचा तिथे भरपूर दिवस रहाण्याचा आग्रह आणि कोलकात्यासह पुरी दार्जिलिंग पाहणे यासाठी भरपूर वेळ पाहिजे होता .  कौटुंबिक जबाबदाऱ्या, आमच्या दोघांच्याही नोकऱ्या ,हे सर्व लक्षात घेऊन एवढा मोकळा वेळ मिळणे कठीण होते .१९९३ मध्ये मी निवृत्त झालो व १९९५ मध्ये सौ. निवृत्त झाली .‍ १९९६मध्ये आम्ही जाण्याचे ठरविले .एक दोन महिने इथे या आराम करा असा त्यांचा आग्रह होताच.महाराष्ट्रात जसा गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा केला जातो, त्याचप्रमाणे बंगालमध्ये नवरात्रीमधे दुर्गापूजा व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो .त्यावेळेलाच आम्ही तिकडे यावे असा त्यांचा आग्रह होता .त्या निमित्ताने आम्हाला कोलकत्त्याचा दुर्गापूजा उत्सव व दुर्गा विसर्जन पहाता आले असते. सप्टेंबर महिना हा प्रवासालाही योग्य असतो .पाऊस कमी झालेला असतो किंवा नसतो .ऑक्टोबर हीट यायची असते थंडी तर लांबच असते उन्हाळाही  नसतो .

कोलकात्याजवळील दार्जिलिंग व पुरी या दोन ठिकाणी आपण जावे असे आम्ही नक्की केले.त्याप्रमाणे तिथली हॉटेल बुकिंग व रेल्वे बुकिंग त्याने करावी असे त्याला सांगितले .नवरात्रीचा संपूर्ण काळ कोलकत्ता येथे राहावे .नंतर एखादाआठवडा कोलकत्ता व नंतर चार सहा दिवस कुठेतरी प्रवास असे एकूण नियोजन केले होते.

मोहन कलकत्त्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये काम करीत होता. त्याला तिथेच  राहण्यासाठी इशापूरला सरकारी जागा मिळाली होती .तिथून मुंबईप्रमाणेच कोलकात्याला जाण्यासाठी लोकल्स होत्या. मुख्य कोलकत्त्यामध्ये  जाण्यासाठी टॅक्सीने दोन तास लागत .टॅक्सी कुठेही फिरण्यासाठी सोयीची होती .

मोहन स्वतः हावडा स्टेशनवर आम्हाला उतरुन घेण्यासाठी आला होता .त्यांच्या कारखान्याच्या दोन टॅक्सीज होत्या .जर कारखान्याचे काम नसेल तर त्या टॅक्सी पैसे देऊन उपलब्ध होत असत .अशी एक टॅक्सी आम्ही तिथे होतो तोपर्यंत आमच्या संपूर्ण दिमतीसाठी मोहनने  निश्चित केली होती .रस्त्यावर गर्दी प्रचंड असे. त्या गर्दीला कोणत्याही प्रकारची शिस्त नसे.

सिनेमांमध्ये बंगालमधील लेखक दिग्दर्शकांनी दुर्गापूजा अनेक वेळा दाखविलेली आहे त्यामुळे दुर्गा पूजेबद्दल व बंगाल बद्दलही उत्सुकता होती .आठ दहा दिवस दुर्गापुजेच्या उत्सवाचा आम्ही आनंद लुटला .प्रत्येक ठिकाणी भव्य मंडप भव्य दुर्गामातेच्या मूर्ती इतर डेकोरेशन गर्दी हे सर्व येथील गणेशोत्सवाप्रमाणेच आढळून आले . फक्त आपल्या येथे काही करमणुकीचे व सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्याचा तिथे अभाव वाटला . या सर्व काळात मोहन आमच्या बरोबर असे. उत्साहाने तो आमच्या बरोबर सर्वत्र फिरून वर्णन करून सर्व व्यवस्थित दाखवित असे.दुर्गा पूजे अगोदर तो आम्हाला गंगेकाठी जिथे दुर्गेच्यामूर्ती तयार केल्या जातात तिथेही घेऊन गेला होता .मूर्ती तयार करताना वारयोषिता  वस्तीमधील माती  आणून त्यामध्ये  मिसळली जाते असे सिनेमात पाहिले होते  . त्याची आठवण झाली .रजा घेऊन, सुटीच्या दिवशी  दोघेही(मोहन व वर्षा) आमच्या बरोबर कलकत्ता दर्शनासाठी हौशीने येत असत .हावडा ब्रिज, गंगा नदी ,दुर्गा पूजा, यांचा उल्लेख व दर्शन सिनेमातून अनेकदा झालेले असल्यामुळे ते प्रत्यक्ष पहाण्याची  उत्सुकता होती .आपल्या इथे सार्वजनिक गणेशोत्सव असला तरी घरीही प्रत्येकजण गणपतीची स्थापना करतो . गणपती विसर्जनही दीड दिवस पाच दिवस दहा दिवस असे असते.कोलकत्याला ठिकठिकाणी गणपती उत्सवातील मंडपासारखे मंडप ,देखावे व इतर गोष्टी आणि गर्दी तशीच असली , तरी घरोघर दुर्गेची मूर्ती आणून त्यांची पूजा वगेरे निदान मला दिसली नाही .

गोड दही मातीच्या भांड्यातून मिळते त्याला मिष्टी दही असे म्हणतात .ते मला फार आवडले. मोहन रोज ते घेऊन येत असे .मला गोड फार आवडते  तेव्हा तो कोणती ना कोणती बंगाली मिठाई घेऊन  रोज येत असे .सर्व बंगाली मिठाया दूध फाडून त्यापासून केलेल्या असतात व,प्रचंड गोड असतात. मुख्य शहरांमध्ये (कोलकत्ता) भारतातील सर्व प्रकारच्या मिठाया खारे पदार्थ कदाचित मिळत असतीलहि परंतु  मोहन रहात होता ,तिथे तरी केवळ बंगाली मिठाई मिळत होती  त्याने त्याच्या मित्रांबरोबर ओळखी करून दिल्या .त्यांनीही आम्हाला घरी जेवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे इतर काही कार्यक्रम असले तर त्यासाठी आग्रहाने बोलावले .त्या मुळे बंगाली लोक ,बंगाली पदार्थ, बंगाली सभ्यता, बंगाली  भाषा, सर्वांचीच ओळख झाली .मला भेटलेले लोक तरी प्रेमळ,व आदरातिथ्यशील  होते .मोहन दीर्घ काळ बंगालमध्ये राहिल्यामुळे बंगाली बाबू झाला आहे . बंगालमधील सर्व मंडळी मत्स्याहारी व काही मांसाहारीसुद्धा . काही पूर्ण शाकाहारी असतील सुद्धा परंतु त्यांची संख्या नगण्य आहे .ग्रामीण भागांमध्ये कशी परिस्थिती आहे ते न फिरल्यामुळे सांगता येणार नाही .तेथे दुर्गा पूजा प्रत्येक गावात सार्वजनिक असते ,घरोघरी मूर्ती आणल्या जातात कि नाही काही कल्पना नाही .कोलकाता समुद्रापासून जवळ असल्यामुळे तेथील हवामान कोकण सदृश्य आहे .लोकही काळेसावळे कोकणाप्रमाणेच वाटले .सपाट प्रदेश व हिमालयाची जवळीक यामुळे जेव्हा हिमालया वरून वारे येतात तेव्हा गारवा भरपूर असतो . तिथे पाऊसही ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांचा दोनदा पडतो. बंगाली लोक बोलणार नाही इतक्या सफाईने मोहन योग्य उच्चारासह बंगाली बोलतो .त्याची बायको वर्षाही अस्खलित बंगाली बोलते .मुलाचा तर प्रश्नच नाही.  दार्जिलिंग गंगटोक येथे जाण्यासाठी जेव्हा आम्ही निघालो  तेव्हाही दोघे स्टेशनवर आम्हाला निरोप देण्यासाठी आले होते.आमचा तेथील निवास  आनंददायी व्हावा यासाठी दोघेही  मन:पूर्वक प्रयत्न करीत होते .बंगाली काय आणि गुजराती काय  या भाषा  संस्कृतोत्पन्न  असल्या मुळे जर त्यांची लिपी वेगळी नसती(देवनागरी असती ) तर त्या समजणे सहज शक्य झाले असते.महिना दीड महिना तिथे राहूनही मला बंगालीतील एकही शब्द बोलता येत नाही .बंगाली कानाला गोड वाटते.त्यामध्ये वर्ण वगैरे मृदू आहेत .सौ.ला काही समजते व एखादे वाक्य बोलताही येत असे.सुरवातीला एक महिना तिथे राहू अशा तर्‍हेने नियोजन केले होते .बंगाल सरकारतर्फे नेपाळ दर्शनासाठी दर आठ दिवसांनी ट्रीप्स जात होत्या .आम्ही नेपाळला जाण्याचे ठरविले त्याप्रमाणे पूर्ण पैसे भरून बुकिंग केले .बुकिंग उशिराचे मिळाल्यामुळे आणखी काही दिवस कोलकत्त्याला राहण्याचे ठरविले .स्वाभाविक कोलकत्ता दर्शन आणखी झाले.पुरेसे प्रवासी न मिळाल्यामुळे ट्रीप रद्द करण्यात आली .पैसे परत मिळाले परंतु त्यासाठी ज्या ऑफिसला जावे लागले   तो प्रवास संस्मरणीय होता. कलकत्त्यात काही विभागांमध्ये प्रचंड गर्दी असते .बस, ट्रक, ट्रॅम ,हातगाड्या,टॅक्सी ,खासगी मोटारी ,स्वयंचलित दुचाकी, पादचारी ,माणसांनी ओढायच्या  रिक्षा ,या सगळ्यांची एकच भाउगर्दी झुंबड असते .त्यामुळे कुणीच पुढे सरकू शकत नाही .पैसे परत घेण्याच्या वेळी ऑफिसमध्ये जाताना तशी परिस्थिती उद्भवली .आमची मोटार चक्रव्यूहामध्ये सापडलेल्या    अभिमन्यूप्रमाणे होती .दुसऱ्या दिवशी सुट्टी होती नंतर आमचे परत येण्याचे रिझर्वेशन होते.पैसे तर घेणे अत्यावश्यक होते .आमच्याबरोबर अमित(मोहनचा मुलगा ) होता. त्याने मानवी रिक्षा करण्याचे ठरविले. माणसांनी ओढण्याच्या रिक्षा त्याकाळी उत्तर भारतात साधारणपणे सर्वत्र दिसत .त्या मागची काही कारणे व रिक्षावाल्यांची परिस्थिती- दो बिघा जमीन- या सिनेमामध्ये बिमल रॉय यांनी चित्रित केली आहे .आपण रिक्षामध्ये बसावयाचे व माणसाने ती ओढायची हे बरे वाटत नाही. रिक्षामध्ये आपण असतो तोपर्यंत ती त्यामुळे (माणूस ओढीत असल्यामुळे) सारखी खुपत असते.आम्ही मानवी रिक्षामध्ये बसून गल्ली बोळातून  ऑफिस बंद होण्याच्या पांच दहा मिनिटे  अगोदर पोचलो. (पैसेही मिळाले) कलकत्त्यात त्यावेळी जवळजवळ सगळीकडे हीच परिस्थिती दिसत असे . टॅक्सी घेऊन कुठेही अंतर्भागात फिरणे फार कठीण असे .तिथे त्यावेळी आणखीही एक गंमत पाहिली आमचा टॅक्सीवाला गव्हर्मेंटचा असल्यामुळे---ऑन सेंट्रल गव्हर्मेंट सर्व्हिस डिफेन्स--- अशी एक पाटी त्याने करून घेतली होती .कुठेही गर्दीमध्ये वहातुक नियमांचे उल्लंघन करायचे असल्यास तो ती पाटी बाहेरून दिसेल अशी ,काचेमागे  ठेवीत असे .पोलिसही काही करीत नसत .एवढेच नव्हे तर आम्हाला आग्रक्रम दिला जाई .तो टॅक्सी हवीतशी पुढे काढीत असे .ही सोय नसती तर आम्हाला आणखीच वेळ  लागला असता .या नेपाळ बुकिंगमुळे आम्हाला पंधरा दिवस ग्रेस मिळाले .त्यामुळे कोलकत्यात व कोलकात्याजवळील काही  ठिकाणांना भेट देता आली .ग्रामीण भागात फिरताना कोकण सदृश्य , भाताचे मळे, भाताच्या उडव्या, माणसे, हवामान व झाडेही आढळली ..  मोहन कडे जास्त आराम करता आला. सिनेमामुळे कलकत्ता  एवढा ओळखीचा झाला होता कि त्या मुळे पुनर्दर्शनाचा आनंद मिळत होता .

विवेकानंद , रामकृष्ण परमहंस, ही सर्व बंगालची दैवते आहेत .प्रत्येकाच्या घरात देवघरामध्ये ,हॉलमध्येही त्यांच्या तसबिरी लावलेल्या असतात .रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या कथा वाचलेल्या असल्यामुळे जेव्हा आम्ही दक्षिणेश्वरला गेलो त्यावेळी मन:चक्षूसमोर त्या काळात तिथे काय घटना घडत असतील त्याची  चित्रमालिका दिसत होती. दक्षिणेश्वरला मन प्रसन्न झाले.

काली घाटावर काली मातेचे देऊळ आहे नवरात्र संपल्यानंतर एक दोन दिवसानी आम्ही तिथे गेलो होतो .देऊळ स्वच्छ  धुतलेले होते. तरीही तिथे इतक्या प्राण्यांच्या हत्या झालेल्या असाव्यात की  देवळात शिरण्याच्या अगोदर बाहेरच्या परिसरामध्येच चपला जमिनीला चिकटत होत्या.कुबट वास आसमंतात दरवळत होता .आम्हाला देवळात जावे असे वाटेना .आम्ही बाहेरूनच नमस्कार करून तिथून निघालो.

.हा हा म्हणता दीड महिना केव्हा संपला ते कळलेच नाही आणि निघण्याची वेळ आली .आम्हाला  रॉयल ट्रिटमेंट मिळाली होती.आभार मानणे औपचारिक ठरले असते कौतुक मात्र जरूर केले  .अमित त्यावेळी एमबीएला होता. तोही जेव्हा जेव्हा वेळ मिळे तेव्ह़ां तेव्हां आमच्या बरोबर येत असे.कलकत्त्याला आवर्जून पुन्हा पुन्हा यावे असे वाटत होते .आम्ही मेट्रो ट्रॅम लोकल्स या सर्वांमधून प्रवास केला.माझ्या माहिती प्रमाणे त्यावेळी मेट्रो व ट्रॅम फक्त कोलकत्यामध्ये होती. ट्रॅम मुळे वाहतूकीला अडथळा  होत असला तरी ती शहराची शान आहे असे माझे मत आहे . ते गरिबांचे वाहनही आहे .आम्हाला निरोप देण्यासाठी व पुन्हा अवश्य लवकर या असे आग्रहाने सांगण्यासाठी दोघे हावडा स्टेशनवर आले होते. 

दोन हजार साली आम्ही ऑक्टोबरमध्ये नेपाळला गेलो होतो.मोहनने नवीन ब्लॉक घेतला होता तो पाहण्यासाठी त्याने बोलावले होते .त्याचा आग्रह मोडणे शक्य नव्हते . आम्ही केसरी बरोबर मुंबईला परत न येता विमानाने कलकत्त्याला गेलो.तिथेही दोघे (मोहन व वर्षा )आम्हाला नेण्यासाठी टॅक्सी घेऊन आले होते .विमान काही कारणाने दोन ते तीन तास लेट झाले होते .तरीही ती दोघे तिथे थांबून होती .विमानतळापासून त्यांचे घर जवळ होते .दोन चार दिवस तिथे राहिलो फक्त दक्षिणेश्वरला जाऊन आलो आणि मग परत रेल्वेने नाशिकला आलो.

त्यानंतर पुन्हा जाण्याचा योग(२००२) त्यांचा मुलगा अमित याच्या लग्नामध्ये आला .मुलगी बंगालची असल्यामुळे जी विवाह पद्धती आम्ही दोन चारदा सिनेमांमध्ये पाहिली होती ती प्रत्यक्ष अनुभवली . कलकत्यातील राहण्यामध्ये गंगा सागराला जायचे राहून गेले होते .गंगा सागर बद्दल बरेच वाचनात आले होते.--सब तीर्थ बार बार गंगासागर एक बार-- असा वाक्प्रचार आहे .एवढे गंगासागरमध्ये स्नानाचे पुण्य आहे .कलकत्त्याहून गंगा सागरला जाताना प्रथम टॅक्सीने दोनतीन तास प्रवास नंतर बोटीने अर्धा पाऊण तास प्रवास व पुन्हा टॅक्सीने अर्धा तास प्रवास केल्यावर आपण गंगा सागराला पोचतो.स्नानाची पर्वणी नसल्यामुळे विशेष गर्दी नव्हती.विशेष म्हणजे तिथे देवळांचे अवडंबर नाही . त्याचप्रमाणे पांडे किंवा  तत्सम गुरुजी मंडळींची गर्दीही आढळून आली नाही . स्नान अतिशय व्यवस्थित झाले. कोकणात कुठेही समुद्र स्नान करताना लाटा मोठ्या असतात पाणी खारे असते तसे तिथे काहीही नव्हते.गोड्या नदीमध्ये स्नान करीत आहोत असे वाटले . लाटाही बिलकूल नव्हत्या.गंगा नदीच्या प्रवाहाचा वेग इतका आहे की समुद्रात दोन चार मैल पाणी गोडे असते असे ऐकून होतो .त्याचा अनुभव आला .या वेळी प्रभंजन  दीपाली व  वेद बरोबर होते .या वेळी  महत्त्वाच्या जुन्या काही  स्थळांबरोबरच नवीन झालेल्या  गोष्टी पहिल्या .दक्षिणेश्वरला आवर्जून गेलो होतो .

या सगळ्या प्रवासामध्ये शांतिनिकेतनमध्ये जायचे मनात होते परंतु ते राहून गेले .

त्या नंतर पुन्हा कोलकत्याला जाण्याचा योग आला नाही .हल्ली प्रकृती ठीक नसल्यामुळे आम्ही नाशिकमध्येही कुठे विशेष जात नाही .कोलकत्त्याला पुन्हा जायला आवडेल हे नक्की .

१३/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

या सगळ्या प्रवासामध्ये शांतिनिकेतनमध्ये जायचे मनात होते परंतु ते राहून गेले .

त्या नंतर पुन्हा कोलकत्याला जाण्याचा योग आला नाही .हल्ली प्रकृती ठीक नसल्यामुळे आम्ही नाशिकमध्येही कुठे विशेष जात नाही .कोलकत्त्याला पुन्हा जायला आवडेल हे नक्की .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel