धर्मशाळा ते डलहौसी हे अंतर रस्त्याने सुमारे एकशे पंचवीस किलोमीटर असावे .अत्यंत वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे वेळ जास्त लागतो. तीन ते चार तासात पोचता येते .आम्ही जिथे हॉटेल बुकिंग केले होते ते शोधत गेल्यावर असे आढळून आले की त्या ठिकाणी मोटार जाऊ शकत नाही .एक बऱ्यापैकी उतार उतरून तिथे जावे लागते .रस्त्यावर परत येताना जाताना असलेला उतार आता चढून यावा लागेल.ज्या ट्रॅव्हल कंपनी मार्फत आम्ही बुकिंग केले त्यांनी आम्हाला ही कल्पना देणे आवश्यक होते .

आमच्या ग्रुपमधील काही मंडळी ज्याना गुडघ्याचा त्रास आहे,बी.पी.किंवा हार्ट ट्रबल आहे अशी होती स्वाभाविक आम्ही त्या हॉटेलात जाऊन राहू शकत नव्हतो .सुदैवाने आमची अडचण सांगितल्यावर त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाने  एका हॉटेलला फोन करून आमची तिथे व्यवस्था केली.आम्हाला पुन्हा पैसे भरावे लागले नाहीत .त्या हॉटेलात पुढच्या बाजूच्या जागा गेलेल्या असल्यामुळे आम्हाला मागची बाजू मिळाली.दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढची बाजू  मिळाली .

आम्ही सकाळी धर्मशाळा येथून निघालो ते दुपारी डलहौसी  येथे पोहोचलो .काश्मीरला ज्याप्रमाणे भारताचे स्वित्झर्लंड असे म्हटले जाते त्याप्रमाणेच काही वेळा डलहौसीलाही स्वित्झर्लंड असे म्हटले जाते . डलहौसी मिनी काश्मीर  किंवा मिनी स्वित्झर्लंड  नक्की आहे .  कुणीही उठावे आणि कशालाही काही म्हणावे काश्मीर ते काश्मीर व डलहौसी ते डलहौसी.(दुसऱ्या एखाद्या म्हणेल स्वित्झर्लंड  ते स्वित्झर्लंड  व काश्मीर ते काश्मीर )

हिमाचल प्रदेश राज्यामध्ये धौलहर पर्वतरांगांच्या जवळ पाच टेकडय़ांवर डलहौसी शहर वसलेले आहे .ईस्ट इंडिया कंपनी व नंतर ब्रिटिशांचे राज्य असताना डलहौसीला वस्ती करण्यासाठी ब्रिटिशांकडून प्राधान्य दिले गेले .अठराशे मधील व त्यानंतरच्या काळातील कित्येक  ब्रिटिशकालीन बिल्डिंग्ज येथे पाहायला मिळतात .सेंट फ्रान्सिस व सेंट जॉन ही चर्चेस प्रसिद्ध आहेत .दैनीकुंड शिखर येथील ट्रेक प्रसिद्ध आहे .तिथे प्रसिद्ध  फोलानी देवी मंदिर आहे .

आम्ही सप्टेंबर महिन्यांमध्ये गेलो होतो .नाशिकचे असूनही थंडी भरपूर वाजत होती .अर्थात नाशिकची थंडी ज्याने पाहिली त्याला उन्हाळ्यातील काश्मीरही काही विशेष नाही .आम्ही एकोणीसशे एक्याऐशीमध्ये मे महिन्यात काश्मीरला गेलो होतो .आम्ही श्रीनगरला पोचलो तेव्हा पाऊस पडत असल्यामुळे प्रचंड गारठा होता .स्थानिक लोक कांगडी गळ्यात घालून होते .आम्ही जम्मूहून आलेले असल्यामुळे गरम कपडे बॅगेत होते .मुंबईच्या मंडळींची थंडीमुळे दाणादाण  उडाली होती.आम्हाला गारठा जरूर जाणवत होता परंतु थंडीमुळे आम्ही कोलमडलो नव्हतो .सेप्टेंबर किंवा मे जूनमध्ये हिमालयात फिरताना आम्हाला नेहमीच गारठा सहज सह्य होता. एकोणीसशे साठ सत्तर या काळात नाशिकला थंडी जशी असे तशी थंडी हल्ली पडत नाही .किमान उष्णतामान बऱ्याच वेळा खाली जाते परंतू कमाल उष्णतामानही जास्त असल्यामुळे दिवसा तशी थंडी वाजत नाही .नाशिकच्या पूर्वीच्या आणि आताच्या थंडीबद्दल उन्हाळ्याबद्दल एकूणच हवामानाबद्दल पुन्हा केव्हा तरी . असो. 

डलहौसीला जाण्यासाठी एकूणच हिमालयात कुठेही जाण्यासाठी सप्टेंबर अखेर व ऑक्टोंबर सुरुवात किंवा मे जून  हा काळ उत्तम होय.बर्फवृष्टी जर अनुभवायची असेल स्केटिंग इत्यादी खेळात भाग घ्यायचा असेल तर मात्र  डिसेंबर जानेवारी हे महिने उत्तम आहेत.जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये येथे भरपूर पर्जन्यवृष्टी होते.  

डलहौसी सृष्टीसौंदर्याने नटलेले आहे .पर्वत उतारावर पाईन देवदार वृक्षांचे दाट जंगल,सर्वत्र लांबवर पसरलेली हिरवळ,आजूबाजूच्या सर्व पर्वत शिखरानी धारण केलेले बर्फाचे मुकुट मनाला मोहित करतात.ब्रिटिशांचे आवडते ठिकाण असल्यामुळे व्हिक्टोरियन कालीन मोठमोठे बंगले बाहेरूनही  पाहताना मन गुंग होते .

डलहौसीजवळ आल्यावर,    डलहौसीमध्ये फिरताना, डलहौसीपासून जवळच्या प्रेक्षणीय स्थळांकडे जाताना व येताना, डलहौसी ते चंबा आणि चंबा ते डलहौसी हा प्रवास करताना,वारंवार काश्मीरची आठवण येत होती .निसर्ग सौंदर्याने नटलेला हा प्रदेश पर्यटकांचे आवडते स्थान आहे. दरवर्षी येथे हजारो पर्यटक येतात . 

नेहमीच्या कंटाळवाण्या एकसुरी जीवनापासून दूर निसर्गाच्या अंगाखांद्यावर फिरताना खेळताना  मन उल्हसित होते . समाधीमग्न होते. एखाद्या ठिकाणी जाऊन तेथील प्रसिद्ध ठिकाणे पाहताना मन आनंदित होतेच परंतू घरातून निघाल्यापासून तिथे जाईपर्यंतचा प्रवासही मोठा मनोरंजक आल्हाददायक असतो.केवळ चौदा चौरस किलोमीटर प्रदेशात दोन हजार मीटर उंचीवर हे शहर वसलेले आहे.

प्राचीन संस्कृती ,प्राचीन देवळे, प्राचीन हस्तकला वस्तू येथे पहायला मिळतात .आपल्या उज्ज्वल भूतकाळाच्या  पाऊलखुणा येथे सापडतात .गिर्यारोहण, अरण्य प्रवास,  अशी ठिकाणे  प्रेक्षणीय आहेत .अमुक एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून सर्वत्र फिरले तरी मन सुखावते .डलहौसीच्या रस्त्यावरून घरंगळत फिरावे. गांधी चौक किंवा अन्यत्र रस्त्यावर मिळणारे चमचमीत चटकदार खुसखुशीत पदार्थ खावेत .अरण्य सफर करावी. देउळे पाहावीत. हस्तकौशल्याच्या वस्तू पाहाव्यात. तिबेटियन मार्केट पहावे,परवडतील त्या वस्तू विकत घ्याव्यात.ताजी शुद्ध हवा फुप्फुसात भरून घ्यावी.मनात आले तर डलहौसी ते चंबा फेरी मारून यावे .अजून तरी दहशतवादामुळे काश्मीर मुक्तपणे फिरता येणार नाही .डलहौसी हे मिनी काश्मीर आहे असे म्हणता येईल .

फक्त सोळा किलोमीटरवर खज्जियार हे सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे . येथे तलाव आहे .येथे एकाच वेळी सुंदर तलाव,पर्वत उतारावरील घनदाट अरण्य, आणि लांबवर पसरलेले कुरण, ही तीनही एकत्र पाहायला मिळतात.

पंचपुला हा प्रमुख जलस्रोत आहे .दयाकुंडमधून निर्माण झालेला हा जलप्रवाह  डलहौसी मधून वाहणाऱ्या अनेक जलप्रवाहांचा मुख्य स्रोत आहे .हे एक पाहिलेच पाहिजे असे ठिकाण आहे .डलहौसीच्या मुख्य भागापासून केवळ तीन किलोमीटरवर तो आहे .

दैनकुंड शिखर , सचपास,फोलोनी देवी मंदिर,सतधारा धबधबा, अशी काही ठिकाणे ज्याना वेळ आहे आणि पायात बळ आहे अश्या लोकांसाठी आहेत . सतधारा जलप्रवाहामध्ये औषधी गुणधर्म आहेत असे ऐकले. पॅट्रिक चर्च ,माल रोड ,बारकोटा हिल्स प्रेक्षणीय आहेत .रॉक गार्डन हेही एक प्रेक्षणीय स्थळ आहे .आणखीही बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत म्हणून आम्हाला सांगण्यात आले .कुठेही गेले की परिसरामध्ये काही ना काही प्रेक्षणीय जागा असतात .आपल्या जवळ उपलब्ध वेळेनुसार आपण काही पाहतो तर काही सोडून देतो .

कोणत्याही हिलस्टेशनला मिळतात त्याप्रमाणे येथे गरम कपडे शाली व गालीचे मिळतात .पठाणकोटच्या रस्त्यावर गंजी पहाडी म्हणून एक टक्कल पडलेला डोंगर आहे तो प्रेक्षणीय स्थळ म्हणून दाखविला जातो .रंगमहाल हे एक म्युझियमसारखे प्रेक्षणीय स्थळ आहे .येथे तैल चित्रे राजेराजवाड्यांचे भरजरी कपडे दागिने इत्यादी पाहायला मिळते.मुळात येथील राजाने राजघराण्यातील स्त्रियांसाठी हा महाल बांधला होता.  

सुभाष भावली हे एक ऐतिहासिक रम्य ठिकाण आहे .येथे सुभाषचंद्र बोस ध्यानधारणेसाठी येत असत .डलहौसीपासून फक्त एक किलोमीटरवर ही जागा आहे .उंच उंच पाईन वृक्षांनी ही जागा घेरलेली आहे.  सुभाषबाबूंच्या देशसेवेचा आदर करण्यासाठी या जागेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

गिर्यारोहणासाठी दूरदूरहून येथे गिर्यारोहक येतात त्यांच्यासाठी किती तरी गिर्यारोहणयोग्य डोंगर आहेत .

आम्ही एक दिवस चंबाला जाऊन आलो .तोही प्रवास संस्मरणीय होता.चंबा शहर जे काही आम्ही  पाहिले ते आम्हाला आवडले.रावी नदीच्या किनाऱ्यावर चंबा शहर वसलेले आहे .तेथून रावी नदीचा उगम जवळच असल्यामुळे रावी नदी छोटीशी दिसत होती .शिवालिक पर्वतरांगांच्या मध्ये चंबा शहर वसलेले आहे .येतांना व जाताना प्राचीन मंदिरे, कितीतरी मनोरम्य कुरणे,तलाव, पाहायला मिळाले. चंबा शहराजवळ अभयारण्य आहे. वेळेअभावी आम्ही तेथे गेलो नाही .रावी नदीवर धरण बांधले आहे .त्यामुळे चमेरा लेक निर्माण झाले आहे .आम्ही ते दुरूनच चंबाहून परत येताना  उंचावरून पाहिले.

डलहौसीहून पठाणकोट केवळ ऐशी किलोमीटरवर आहे.आम्ही जम्मू तावी ते पुणे या गाडीचे तिकीट काढलेले होते.आम्ही पठाणकोटला गाडीत चढण्याचे ठरविले.ठरल्याप्रमाणे नाशिकला परत आलो .

१/१०/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel