कलकत्त्याला निरनिराळ्या कारणांनी दोनदा जाणे झाले परंतु गंगा सागराला जाण्याचा योग आला नाही .तिसऱ्या वेळी मात्र काहीही झाले तरी गंगा सागराला जाऊन यायचेच असा निश्चय आम्ही केला .कलकत्याच्या दक्षिणेला सुमारे शंभर किलोमीटरवर गंगासागर आहे .काशी विश्वेश्वर बारबार गंगासागर एक बार अशी एक हिंदी म्हण प्रचलित आहे .ही म्हण बहुधा उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश यातील कुणी तरी तयार केलेली असावी.कारण या प्रदेशांपासून काशी विश्वेश्वर तुलनात्मक फार लांब नाही .परंतु गंगासागर मात्र भरपूर लांब आहे .पूर्वीच्या काळी वाहतुकीच्या सोयी फार नसल्यामुळे कुठेही जाणेयेणे दुरापास्त असे.आपल्याला काशी विश्वेश्वर काय आणि गंगासागर काय दोन्ही सारखेच लांब .
कोकणात एक गमतीशीर म्हण आहे."बापूस काशीस गेलोसे मामद्याचे नाहीतर बाराव्याचे वडे लागू" काही जणांना या म्हणीचा अर्थ कळणार नाही म्हणून जरा स्पष्ट करतो .कुणीहि काशीयात्रा करून आला की गावजेवण घालण्याची प्रथा आहे .होती असे म्हणूया.कोकणात पूर्वी आणि हल्लीही काही प्रमाणात दारिद्रय़ असल्यामुळे वडे खायला मिळणे कठीण असे. सर्वसाधारणपणे कोणत्याही गावजेवणामध्ये प्रमुख पक्वान वडे व काकवी हे असे . वडे(उडीद किंवा सर्व डाळी एकत्रित ) काकवीबरोबर लागतातही चांगले आणि पौष्टिकही असतात.जुन्या काळात अत्यंत बिकट वाहतूक परिस्थिती,ठगी,रोगराई यामुळे काशीयात्रेला गेल्यानंतर जिवंत परत येणे कठीण असे.त्यामुळे वडील वारले तर बाराव्याचे वडे निश्चित, वडील परत आले तर मामदे( काशीयात्रेहून परत आल्यावर घातलेले गावजेवण )वडे निश्चित !!!.असो.
टॅक्सीने सरळ दोन तीन तास प्रवास करायचा की गंगासागर आले असे आम्हाला वाटत होते .परंतु तसे नाही. सागर/सगर नावाचे दक्षिणेला बेट आहे .बहुधा चौवीस परगणा या जिल्ह्याचा तो एक भाग आहे . दोन तीन तास टॅक्सीतून प्रवास नंतर टॅक्सीतून पायउतार होऊन बोटीतून पुढे प्रवास करावा लागतो .हा सर्व प्रवास गंगा नदीतून होतो परंतु आपल्याला आपण सागरातून जात आहोत असे वाटते. इतके नदीचे पात्र विस्तीर्ण आहे.सुमारे अर्ध्या पाऊण तासामध्ये आपण सागर बेटावर पोहोचतो .तिथून पुन्हा टॅक्सी करून गंगासागर येथे जावे लागते .तो प्रवास सुमारे पंधरा वीस मिनिटांचा आहे . सागर बेट समुद्रामध्ये आहे की गंगेच्या प्रवाहामध्ये आहे ते कळले नाही .बहुधा गंगेच्या प्रवाहामध्ये असावे .गंगा जिथे सागराला मिळते तिथेच मुखाजवळ हे बेट आहे . सागर बेटाला गंगेने चारी बाजूंनी वेढा घातलेला आहे .निदान तीन बाजूंनी म्हणूया .चौथी बाजू समुद्राची.
गंगा सागराला मिळते ते स्थान म्हणून गंगासागर अशी आमची प्रथम समजूत होती.तसेही म्हणायला हरकत नाही .आणखीही एक व्युत्पत्ती आहे .या बेटावर आणि कदाचित पलीकडील भूप्रदेशांवरही सागर/सगर नावाच्या राजाचे राज्य होते .त्यांने अश्वमेध यज्ञाला सुरुवात केली.व वारू म्हणजे घोडा सोडला .त्याच्या रक्षणासाठी सागर/सगर राजाचे साठ हजार पुत्र( म्हणजे बहुधा साठ पुत्र व कित्येक हजार सैनिक असावेत )पाठीमागून जात होते .अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला तर मिळालेल्या पुण्यामुळे सागर/सगर राजा इंद्रपद आपल्याकडून हिसकावून घेईल अशी भीती नेहमीप्रमाणे इंद्राला वाटली .पुराणांमध्ये नेहमी इंद्र आपले स्थान कुणीतरी हिसकावून घेईल अशा भीतीने भयभीत झालेला व तसे होऊ नये म्हणून कारस्थाने करीत असलेला आढळतो .तर इंद्राने तो घोडा कपिलऋषींच्या आश्रमात पाठीमागे लपविला .सागर/सगर राजाचे साठ हजार पुत्र तिथे आल्यावर त्यांना, कपिल मुनीनी तो घोडा लपविला असे वाटले.त्यांनी कपिल ऋषींना अद्वातद्वा बोलण्यास सुरुवात केली .कपिलमुनींची समाधी भंग झाली.समाधी भंग झाल्यामुळे त्यांचा क्रोध अनिवार झाला त्यांच्या डोळ्यातून ज्वाला निघू लागल्या आणि त्यात ते साठ हजार पुत्र जळून भस्मसात झाले.(इंद्राचे काम झाले )ते सर्व पुत्र पुढे गतीला न जाता पाताळामध्ये अडकून पडले.त्यांना गती मिळण्यासाठी त्याच्या वंशजानी असफल प्रयत्न केले .
शेवटी भगीरथ नावाच्या एका वंशजाने उग्र तपश्चर्या केली.गंगा नावाची नदी स्वर्गामध्ये आहे .ती तू भूलोकावर घेऊन ये. ती नदी अत्यंत पवित्र आहे. कपिलमुनींच्या डोळ्यातून निघालेल्या ज्वाळांमध्ये भस्मसात झालेल्या सागर/सगर राजाच्या साठ हजार पुत्रांच्या अस्थीवरून ते पवित्र पाणी वाहात गेल्यावर त्यांना मुक्ती मिळेल असा वर विष्णूकडून मिळाला .पुढे भगीरथाने स्वर्गात जाऊन बरीच खटपट केली. शेवटी गंगा भूलोकावर येण्याला तयार झाली.स्वर्गातून पडताना तिचा वेग प्रचंड असल्यामुळे पृथ्वीला छिद्र पडेल असे तिने सांगितले.तो आवेग पृथ्वीला सहन होणार नाही .ते टाळण्यासाठी व ती पृथ्वीवरून प्रवाहित व्हावी यासाठी भगीरथाने शंकराची तपश्चर्या केली .शंकराने प्रसन्न होऊन गंगेला आपल्या डोक्यावर उडी मारण्यास परवानगी दिली . गंगा उडी मारल्यानंतर शंकराच्या जटामध्ये लुप्त झाली.आपल्या ताकदीचा गंगेचा गर्व नाहीसा झाला . पुन्हा शंकराची प्रार्थना केल्यानंतर त्याने गंगेला बाहेर येण्यास वाट दिली .अजूनही गंगेचा आपल्या ताकदीबद्दलचा गर्व नाहीसा झाला नव्हता.वाटेत जन्हु नावाचा ऋषी यज्ञ करीत होता .गंगेने आपल्या प्रवाहाने ती सर्व यज्ञ सामुग्री वाहून नेली .त्या ऋषीने गंगेला पिऊन टाकले. पुन्हा जन्हु ऋषींची भगीरथाने प्रार्थना केल्यावर त्यांनी तिला कानातून बाहेर प्रवाहित केले. जन्हुची मुलगी म्हणून जान्हवी असे गंगेचे नाव आहे.
ही गंगा पश्चिम बंगालमध्ये शिरल्यावर तिचे दोन भाग होतात.एक भाग पद्मा नदी या नावाने पूर्व बंगालमधून असंख्य धारांनी बंगालच्या उपसागराला मिळतो.दुसरा प्रवाह हुगळी नावाने पश्चिम बंगालमधून कलकत्त्यावरून पुढे जाऊन सागर बेटाला वळसा घालुन बंगालच्या उपसागराला मिळतो.
गंगासागर हे पवित्र तीर्थस्थान आहे .सागर/सगर राजाच्या साठ हजार पुत्रांच्या अस्थीवरून गंगा मकरसंक्रांतीला या ठिकाणी प्रथम वहात गेली आणि सर्वांना मुक्ती मिळाली.त्यामुळेही या स्थळाला गंगासागर असे म्हणतात. मकर संक्रांतीला इथे लक्षावधी लोकांचा मेळा भरतो.भारताच्या कानाकोपऱ्यातून एवढेच काय तर जगाच्या कानाकोपर्यातून हिंदू लोक व अन्य धर्मीयही इथे स्नानासाठी येतात. या दिवशी इथे स्नान करणे जास्त पुण्यप्रद समजले जाते .इथे कधीही स्नान केले तरी तुमचे सर्व पाप भस्मसात होते व तुमची मुक्ती निश्चित होते असा भाविक हिंदूंचा समज आहे .
या कथेमध्ये गंगेचे गर्वहरण कसे झाले तेही सांगितलेली आहे .गर्वाचे घर (कधीना कधी )खाली ही म्हण सुप्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे भगीरथाने चिकाटीने अथक प्रचंड प्रयत्न करून व सर्व संकटांवर मात करून गंगेला भूतलावर आणले . आपल्या पूर्वजांना मुक्ती दिली .त्यावरून कोणत्याही प्रचंड, अपरिमित,न भूतो भविष्यती, अश्या प्रयत्नांना भगीरथ प्रयत्न अशी संज्ञा दिली जाते .
गंगा सागराला कपिल मुनींचा आश्रम व मंदिर आहे .कपिलमुनी हे साक्षात विष्णूचा अवतार समजले जातात.त्या पाठीमागेही एक कहाणी आहे .या सागर बेटावरच कर्दम नावाचे एक मुनी होते.त्यांनी मृत्यू जिंकला होता .मानवाला मृत्यू नाही हे अमानवीय आहे तेव्हा तुम्ही मृत्यू स्वीकारा असे विष्णूने त्यांना सांगितले.कर्दमऋषींनी जर तुम्ही म्हणजे विष्णू, पुत्ररूपाने माझ्या घरी याल तरच मी मृत्यू स्वीकारीन असे सांगितले .विष्णू पुत्र रूपाने कर्दम ऋषींच्या घरी आले .तेच हे कपिल मुनी . म्हणजे साक्षात विष्णू होय .ु
हुगळी नदी हिलाच गंगेचा प्रमुख स्रोत समजले जाते.पद्मा नदीला गंगेचा मान नाही. या गंगेच्या प्रवाहाचा एवढा प्रचंड वेग आहे की समुद्रातील खारे पाणी कित्येक किलोमीटरपर्यंत समुद्रात ढकलले जाते .त्यामुळे इथे समुद्राचे पाणी गोड असते.असे मी ऐकले होते.
आम्ही सर्वांनी इथे व्यवस्थित स्नान केले.स्त्रियांना आडोशासाठी व्यवस्था आहे .येथे सागराचे पाणी गोड आहे.कारण ते पाणी गंगाच आहे .
*बंगालचा उपसागर,सागर बेटाला वेढून टाकणारा गंगेचा प्रचंड प्रवाह,(सागराचे) गोडे पाणी,विस्तीर्ण रुंद समुद्रकिनारा,कपिल मुनींचा आश्रम व मंदिर, अत्यंत देखणे सागर बेट ,सर्व काही स्वच्छपणे मन:पटलावर रेखाटलेले आहे.*
१/४/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com