हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने एकूण सहा ठिकाणे प्रसिद्ध आहेत.शिमला कुलू मनाली व धर्मशाला,  डलहौसी व चंबा खोरे.

आम्ही एकदा शिमला कुलू मनाली ही पूर्ण केली तर दुसऱ्यांदा वैष्णोदेवी धर्मशाला डलहौसी चंबा येथे गेलो . 

पर्यटकांमध्ये शिमला मनाली ही अतिशय प्रसिद्ध आहेत .शिमल्याला हिल स्टेशन्सची राणी असे संबोधले जाते .असंख्य चित्रपट शिमला येथे चित्रीत झालेले आहेत .त्यातून तेथील माल रोड, डोंगरावरती एकमेकांना समांतर असलेले रस्ते,त्यांना जोडणारे दगडी पायऱ्यांचे जिने डोळ्यासमोर उभे रहातात.त्याचबरोबर जुन्या जमान्यातील कुदरत, मौसम, यासारखे चित्रपट तर नव्या जमान्यातील थ्री इडियट्स,जब वुई मेट, गदर एक प्रेम कहानी  यांसारखे चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात .

१८०६मध्ये नेपाळी योद्धा  भीमसेन थापा याने प्रथम शिमला काबीज केले.पुढे ब्रिटिशांबरोबर झालेल्या करारानुसार शिमला ब्रिटिशांच्या ताब्यात आले . सुरुवातीला येथे फक्त घनदाट अरण्य होते .एका ब्रिटिश ऑफिसरने लाकडी झोपडी बांधली .नंतर पक्की घरे बांधण्याला सुरुवात झाली .

शिमला हिमाचल राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सिमला ही पंजाब राज्याची राजधानी होती.सिमलापेक्षा शिमला हे नाव जास्त योग्य आहे .श्यामलादेवीचे(कालीचा अवतार) मंदिर  येथे अतिशय प्रसिद्ध आहे.त्या देवीच्या नावावरूनच या प्रदेशाला व शहराला शिमला असे नाव पडले . सिमला याचे नाव श्यामला असे करावे अशीही एक चळवळ आहे.ब्रिटिशांनी उच्चार करता येत नाही म्हणून केलेला अपभ्रंश किंवा मुस्लिमांनी दिलेली काही नावे बदलावी अश्या प्रकारची ही चळवळ आहे. शिमला नावाचा जिल्हाही अाहे.हिमाचल राज्याचे हे सांस्कृतिक शैक्षणिक व व्यापारी केंद्र आहे. शिमल्याला हिलस्टेशनची राणी असे संबोधले जाते. अनेक हिंदी सिनेमातून शिमल्याची आपल्याला पूर्वीच ओळख झालेली आहे .

हल्लीचे सिमला शहर ज्या डोंगरांवर पसरलेले आहे तिथे पूर्वी अतिशय घनदाट असे अरण्य होते .तिथे जवळजवळ कोणतीही वस्ती नव्हती.सर्वत्र लहान लहान खेडी होती .जागतिकीकरणापासून व्यापारीकरणापासून शिमला अजूनही  दूर आहे .इतर राज्यांशी तुलना करता शिमल्याने अजूनही त्यांचा पारंपरिक गंध टिकवून धरला आहे.असेही म्हणता येईल.  पारंपरिक मूल्ये व आधुनिक विचार यांचा समतोल साधला आहे .शिमल्याचा सांस्कृतिक वारसा हा पारंपरिक व ग्रामीण आहे.शिमला शहर जिल्हा एकूणच हिमाचल प्रदेश भारतात तुलनात्मकदृष्टय़ा सुरक्षित समजला जातो

लहान लहान झोपड्यातून लोक रहातात.लहान लहान खेडी सर्वत्र पसरलेली आहेत .शेती व गुरे ढोरे पालन हा प्रमुख व्यवसाय आहे.जत्रा उत्सव नियमितपणे होत असतात त्यामध्ये त्यांची गाणी नृत्य संगीत वैशिष्टपूर्ण असते. 

१८१५च्या सुमारास ब्रिटिशांनी येथे आपला अंमल बसवला .ब्रिटिशांना इथल्या हवेचे आकर्षण वाटले.त्यांनी घनदाट जंगलात शिमला शहर वसविले.१८३० नंतर अनेक ब्रिटिशांनी येथे येऊन  जागा खरेदी केली.उन्हाळ्यात येथे येऊन राहण्याला सुरुवात केली .उन्हाळ्यात सपाटीवरील भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याशी शिमल्याची तुलना करता शिमला  म्हणजे एक स्वर्गच होता . दिल्ली कलकत्ता येथे प्रचंड उष्णता असल्यामुळे त्यांनी उन्हाळयाची राजधानी १८६३ मध्ये शिमला येथे हलविली.शिमला येथे पोचणे त्या काळात जरी कठीण असले तरी ही ब्रिटिश वर्षांतून दोनदा कलकत्त्याहून शिमल्याला राजधानी नेत असत.  लुधियाना ते शिमला हे अंतर फक्त १९०किलोमीटर आहे.बग्गी किंवा घोडय़ावरून चार दिवसात तेथे पोचता येते.  

स्वातंत्र्यापूर्वी येथे अनेक राजकीय करार व संमेलने झाली आहेत.स्वातंत्र्यानंतर अठ्ठावीस संस्थानांचे एकत्रीकरण करून हिमाचल प्रदेश निर्माण झाला.

स्वातंत्र्यानंतरही येथे महत्त्वाच्या  राजकीय घटना घडल्या आहेत .१९७२ मध्ये बांगलादेश निर्मितीनंतर पाकिस्तान व भारत यामध्ये झालेला सिमला करार प्रसिद्ध आहे .

येथील ब्रिटिश धर्तीच्या पुरातन बिल्डिंग्स पर्यटकांसाठी  एक खास आकर्षण आहे.चर्चेस व देवालये हीही खूप प्रसिद्ध आहेत.माल रोड तर फारच सुप्रसिद्ध आहे . दिव्यांसाठी उभारलेले लोखंडी खांबही शहराच्या आकर्षणामध्ये भर घालतात.

ब्रिटिशांनी बांधलेल्या कालका शिमला रेल्वे याला जागतिक वारसा स्थानांमध्ये यूनेस्कोने स्थान दिलेले आहे .ही रेल्वे १९०३मध्ये सुरू झाली .त्या काळातील इंजिनिअरिंगचे हे एक नवल समजले जाते.८०६ पूल व १०३ बोगदे आहेत.  रेल्वेमुळे शिमल्याला पोचणे जास्त सुलभ झाले.

शिमल्याचे आणखी दोन  गोष्टींसाठी महत्त्व अधोरेखित करता येते.

डोंगराचे तीव्र उतार असल्यामुळे येथे हिवाळ्यात बर्फावरील स्किइंग हा खेळ व स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतात   

मोटर बायकिंग रेस २००५पासून घेतली जाते.दक्षिण आशियातील ही सर्वात मोठी मोटरबाईकिंग रेस आहे .

उत्कृष्ट पर्यटन स्थळांबरोबरच येथे अनेक प्रगत संशोधन संस्था व शैक्षणिक संस्था आहेत .

पंजाब राज्याची शिमला ही राजधानी होती.चंदीगडच्या निर्मितीनंतर शिमला ही हिमाचल  राज्याची राजधानी झाली . 

मॉल रोडवर शिमल्यामध्ये पुढील वस्तू खरेदी करता येतील .

हस्त व्यवसाय निर्मित वस्तू .हँडीक्राफ्ट अतिशय प्रसिद्ध आहेत .

शाल व लोकरीच्या इतर वस्तू .

लाकडी वस्तू व पारंपारिक कला वस्तू .

हातकागद लाकडी टेबल वगैरे 

विविध प्रकारचे दागिने 

हिमाचली टोप्या 

आम्ही कुफ्रीला गेलो होतो . कुफ्री हे एक हिल स्टेशन आहे.शिमला ते कुफ्री अंतर वीस किलोमीटर आहे .ज्या कांचघरात १९७२ चा (बांगलादेश निर्मितीनंतरचा)प्रसिद्ध सिमला करार झाला तेही ठिकाण आम्ही पाहिले .तिथेच हिवाळ्यात स्किइंग खेळ खेळला जातो ती जागा आहे .उन्हाळ्यात गेलो असल्यामुळे अर्थातच बर्फ पाहायला मिळाला नाही.चित्रपटातील गाण्यांमधून बर्फ असतानची ती जागा अनेकदा सर्वांनी पाहिलेली आहे .

तिथून जवळच एक देवदार वृक्षांचे  जंगल आहे.तिथेही अनेकदा  चित्रपटांचे शूटिंग केले जाते .

एक दिवस मॉल रोड व खरेदी ,दुसरा दिवस कुफरी व इतर जवळीची ठिकाणे, तिसरा दिवस  म्युझिअम ख्रिस्त चर्च झू इ.पाहून आम्ही चौथ्या दिवशी मनालीकडे प्रयाण केले .

१७/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel