सोमनाथहून साधारण दुपारी अकराच्या सुमारास आम्ही निघालो .सकाळचा वेळ पुन:एकदा सोमनाथ मंदिर, प्रभास तीर्थ ,भल्लाक तीर्थ देहोत्सर्ग वगैरे बघण्यात गेला .आणि नंतर सोमनाथहून आम्ही दुपारी दहाच्या सुमारास द्वारका येथे जाण्यासाठी निघालो.सोमनाथ ते द्वारका अंतर सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटर असावे .त्या वेळीसुद्धा गुजरातमधील रस्ते अतिशय चांगले वाटले .रस्त्यांवर हल्लीसारखी वाहनांची गर्दी फारशी नसे.तुरळक एखादे खासगी वाहन दिसत असे.रस्ता सिंगल असूनही द्रुतगतीने जाणे त्यामुळे शक्य असे.बराच रस्ता समुद्र किनाऱ्याने गेलेला आहे .एका बाजूला पांढरी शुभ्र वाळू व चकाकता समुद्र व दुसऱया बाजूला लांब अंतरावर शेतांच्या पलीकडे नारळा पोफळीच्या बागेमध्ये दडलेली घरे असा एकूण पॅनॉरोमिक सीन पाहात पाहात बराचसा प्रवास झाला .वाटेत एके ठिकाणी मोटार पंक्चर झाल्यामुळे थोडावेळ तप्त वाळूमध्येही जाऊन येता आले .

समुद्राकडे पाहताना नेहमीच एक विचार मनामध्ये येत असे.खुष्कीच्या मार्गाने एवढी संकटे सोसत आक्रमण करत लढत सोमनाथला येण्या ऐवजी गझनीचा महंमद  समुद्रमार्गाने का आला नाही.पाच दहा गलबते घेऊन यायचे लूट करायची लगेच समुद्र मार्गाने निघून जायचे असे का केले नाही .संभाव्य कारणे दोन वाटतात .एक आक्रमक दर्यावर्दी नव्हता .त्याला समुद्र किनारा नव्हता.दोन नौकानयन अचूक काटेकोर करण्याइतकी शास्त्रीय प्रगती झालेली नव्हती. असो.

वाटेत एके ठिकाणी आम्ही दुपारचे जेवण घेतले .आम्हाला गुजरातच्या सर्व प्रवासामध्ये धाब्यावर अतिशय सुंदर जेवण मिळत असे.त्यावेळी महाराष्ट्रामध्ये धाब्यावर जेवणाचे जे दर होते त्यांच्याशी तुलना करता ते अतिशय स्वस्त होते .आणि त्याची प्रतही कितीतरी पटीने चांगली होती .भाकरी किंवा पोळी साजूक तूप व उत्तम प्रतीचा गूळ एखादी दुसरी भाजी घट्ट गोड दही व हवे असल्यास ताक तेही उत्तम प्रतीचे मिळे.आम्ही प्रथम तूप गूळ घेत नसू .तो मिळतो हेच आम्हाला माहीत नव्हते . एके ठिकाणी ड्रायव्हरने आम्हाला घी गूड घी गूड घ्या असे  म्हटले आम्हाला प्रथम तो काय म्हणत आहे तेच कळेना प्रत्यक्ष बघितल्यावर काय ते कळले .आमचे मराठी हिंदी उच्चार व त्याचे गुजराती हिंदी उच्चार यामध्ये बरीच तफावत होती .प्रत्येक ठिकाणी शीतपेटीत  दही ताक वगैरे ठेवलेले असे .हॉटेलमध्ये तर जेवण चांगले मिळत असेच पण किमतीची आणि दर्जाची तुलना करता धाब्यावरील जेवण जास्त सरस वाटले .

संध्याकाळी चार साडेचारच्या सुमारास आम्ही द्वारका येथे पोचलो .कुठेही रिझर्वेशन्स आगाऊ केलेली नसल्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावर बऱ्यापैकी हॉटेल शोधीत असू.तिथे सामान टाकून फ्रेश होऊन नंतर फिरण्यासाठी बाहेर पडत असू .मोटार व ड्रायव्हर गुजरातमधीलच असल्यामुळे त्याला सर्व रस्ते व हॉटेल्स माहित होते आणि त्यामुळे कुठेही काही अडचण निर्माण होत नसे.परंतु द्वारकेला आम्हाला प्रत्येक ठिकाणी जागा नाही म्हणून सांगण्यात येऊ लागले .सौ. मोटारीत बसून असे व मी अाणि ड्रायव्हर  हॉटेलमध्ये चौकशी करण्यासाठी जात असू.गर्दीचा सिझन होता यात्रेचा सीझन होता तरीही एक सुद्धा खोली मिळू नये याचे आम्हाला आश्चर्य वाटत होते .गावाबाहेरील दोन तीन हॉटेल्समध्ये असा अनुभव आल्यानंतर आमच्या ड्रायव्हरने वेगळी स्ट्रॅटेजी सांगितली .तो मोटरमध्ये बसून राहिला आणि मी व सौ चौकशी करण्यासाठी गेलो .आम्हाला तात्काळ जागा मिळाली .

नंतर हॉटेल मालकाजवळ बोलत असताना आम्हाला कुठेही जागा मिळत नव्हती असे सांगितले .त्यावेळी त्याने मीही तुम्हाला जागा दिली नसती जर तुम्ही ड्रायव्हर बरोबर आला असता असे सांगितले .ड्रायव्हर मुस्लिम आहे त्याबरोबर तुम्ही एकटेच आहात .खोलीमध्ये तुम्ही दोघे राहणार आहात असा ग्रह झाल्यामुळे कुणीही तुम्हाला जागा देत नव्हता .जर तुम्ही बाईंबरोबर गेला असता तर जागा लगेच मिळाली असती .आमचा ड्रायव्हर मुस्लिम आहे हे आम्हाला माहीत होते .आमच्या भाचीने व जावयाने आम्हाला टुरिंग टॅक्सी करून दिली त्यावेळी तो अतिशय प्रामाणिक सज्जन व खात्रीचा आहे असे सांगितले होते .तो खरोखरच अतिशय सज्जन होता. आम्हाला त्याच्यामध्ये मुस्लिमपणाची एकही खूण दिसत नव्हती .दाढी टोपी उर्दूमिश्रित हिंदी इ.तो अर्थातच गुजराती सफाईने बोलत होता . तो मुस्लिम आहे हे प्रत्येक ठिकाणी हॉटेलवाले कसे ओळखीत होते ते आम्हाला मुळीच कळले नाही!! तो मुस्लिम असला तरी हॉटेलमध्ये जागा न देण्याचे कारण काय तेही लक्षात आले नाही.परंतु ते कारण ड्रायव्हरने ओळखून मला व सौ.ला जागा आहे का हे विचारण्यासाठी पाठविले.सर्व प्रवासामध्ये फक्त द्वारकेलाच असा अनुभव आला .

हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आम्ही द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी बाहेर पडलो .द्वारकाधीशाचे मंदिर संध्याकाळी पाच नंतर उघडते असे आम्हाला ड्रायव्हरने अगोदरच सांगितले होते.मंदिर भव्य व छान आहे पायऱ्या चढून उंचावर जावे लागते.मंदिर स्वच्छ होते . विशेष गर्दी नव्हती .रेखीव देखणी परंतु  काळी कुळकुळीत अशी द्वारकाधीशाची मूर्ती आहे .दूरवर कठडा होता उंचावर द्वारकाधीश होते .मधल्या भागामध्ये पुजारी होते .पुजारी उघडेबंब परंतु दागिन्यानी लगडलेले होते. सात आठ बोटांमध्ये अंगठ्या सोन्याचे सलकडे गळ्यांत जाडसर चेन वगैरे .द्वारकाधीशाचे पुजारी जर इतके श्रीमंत तर द्वारकाधीश किती श्रीमंत असतील !

मूर्ती पाहात असताना मला श्रीकृष्णाचे सर्व चरित्र आठवत होते .लहानपणी मी मामाकडे शिकण्यासाठी असताना तिथे करमणुकीला काहीही साधन नव्हते .श्रीकृष्ण चरित्राचे जाड टाइपमधील एक जाडजूड पुस्तक होते .त्यांची असंख्य पारायणं केलेली होती .त्यामुळे श्रीकृष्ण चरित्र अगदी तोंडपाठ होते .मथुरेहून पळून श्रीकृष्ण द्वारकेला आल्यामुळे त्याला रणछोडदास असे  म्हणतात. जावयाला (कंसाला)ठार मारल्यामुळे राग येवून जरासंधाने मथुरेवर अनेक स्वाऱ्या केल्या .दर वेळी त्याचा पराभव होत असे.शेवटी कंटाळून मथुरेतील लोकांना त्रास नको म्हणून श्रीकृष्णाने द्वारका नगरी वसवली . मथुरा कायमची सोडून द्वारकेला आपली राजधानी बनविले .

निरनिराळी पौराणिक ठिकाणे पाहात असताना आणखी एक विचार मनामध्ये येतो .त्याकाळी रथातून नेहमी प्रवास करीत असत .द्वारका मथुरा हस्तीनापूर  विदर्भ या ठिकाणांमधून प्रवास  करीत असताना रस्ते खूप चांगले असणे आवश्यक होते .तरीही हस्तिनापूर ते द्वारका या प्रवासाला किती वेळ लागत असेल .हा प्रवास एका दिवसात केला अशी वर्णने असंभाव्य वाटतात .

गोमती नदी आता जिथे समुद्राला मिळते त्यापेक्षा ती पुढे दोन चार किलोमीटर अंतरावर समुद्राला श्रीकृष्णाच्या काळात मिळत असावी(गोमती नावाची नदी उत्तर प्रदेशातही आहे ती गंगेला मिळते) .गोमती नदीच्या दोन्ही तीरांवर द्वारका त्या वेळी पसरलेली असावी .असा एक अंदाज आहे . श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर द्वारका बुडाली .त्यामुळे नदीचे मुख हल्ली जिथे आहे तिथे मागे आले असावे.या पुराणातील माहितीला पाठिंबा देणारे पुराणवस्तूखात्याचे संशोधन आहे.अर्थात नेहमी मतभेद असतात त्याप्रमाणे येथेही मतभेद आहेत . भूकंप झाला असावा किंवा अकस्मात बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असावी.त्यामुळे द्वारका बुडाली असावी. गोमती नदीच्या काठावर गायत्री मंदिर आहे .रुक्मिणीचे मंदिर तीनचार किलोमिटर लांब अंतरावर आहे .कदाचित जुनी श्री कृष्णकालीन द्वारका नगरी हल्लीच्या द्वारकापासून द्वारका बेटापर्यंत असावी आणि काही कारणाने मधील भाग पाण्यामध्ये बुडाला असावा . दुसर्‍या दिवशी आम्ही द्वारका बेटावर गेलो .तो परिसर बराच मोठा आहे. तिथे मंदिरांची एकच गर्दी आहे .इथेही श्रीकृष्णाचे दर्शन घोळका पद्धतीने झाले.इथे सुदाम्याचेही मंदिर आहे .

द्वारकेला मोक्षाचे द्वार समजले जाते .चारी धाम यात्रेमधील एक महत्त्वाचे धाम द्वारका  होय.चार धाम यात्रा दोन प्रकारच्या आहेत .पहिली बद्रीनाथ,द्वारका, जगन्नाथपुरी व रामेश्वर.दुसरी उत्तरांचलमधील चारधाम केदारनाथ, बद्रीनाथ, जमनोत्री व गंगोत्री होय.आमच्या दोन्ही चारधाम यात्रा झालेल्या आहेत.

१५/१२/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel