आम्ही संध्याकाळी सुमारे सहा वाजता वेरावळ येथे पोचलो .सोमनाथ पट्टन जिथे सोमनाथाचे मंदिर आहे ते येथून पाच सहा किलोमीटरवर आहे .हॉटेलमध्ये फ्रेश होऊन लगेच आम्ही सोमनाथ मंदिराला जाण्यासाठी निघालो .मंदिर समुद्राच्या जवळ आहे .समुद्राच्या बाजूने मंदिराला तटबंदी केलेली आहे .तटबंदी फार उंच नाही .त्यावर बसूनही समुद्राची शोभा पाहता येते.येथे शहाळी फार स्वस्त मिळाली त्या वेळी नाशिकला एक दोन रुपयाला मिळणारी शहाळी केवळ वीस पंचवीस पैशांमध्ये मिळत होती .
१९९५ मधील आम्ही पाहिलेली मंदिराची स्थिती सांगत आहे .हल्ली काही बदल झाला असला तर मला माहित नाही .
मंदिरांमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती परंतु फार नव्हती .मंदिर भव्य व छान बांधलेले आहे .मावळत्या सूर्य किरणांमध्ये मंदिर आकृती मनःपटलावर छानपैकी ठसली.
नेहरू मंदिर बांधणीच्या विरुद्ध होते .डॉक्टर राजेंद्रप्रसाद यांनी उद्घाटनाला जाऊ नये असे त्यांचे मत होते .वल्लभभाई पटेल यांनी पुनर्निर्माणाचे कार्य हाती घेऊ नये असेही त्यांचे मत होते .नेहरूंचा विरोध डावलून वल्लभभाई पटेल यांनी पुनर्निर्माण केले .ज्यावेळी हा विषय कॅबिनेट मीटिंगमध्ये आला त्यावेळी नेहरूनी विरोध केला .या गोष्टीचा किती तरी निष्कारण मोठा बाऊ केला जातो .फाळणीच्या जखमांमधून राष्ट्र सावरत आहे .आपले राज्य निधर्मी आहे म्हणजेच सर्व धर्म समान आहेत .अशा वेळी मंदिर पुनर्निर्माण केल्यास जखमेवरील खपली काढली जाईल असे त्यांचे मत होते .नेहरू सच्चे लोकशाहीवादी असल्यामुळे त्यांनी बहुमत मान्य केले.मंदिर पुनर्निर्माण समिती स्थापन झाली .पैसा वर्गणी रूपाने जनतेकडून गोळा केला गेला .मंदिर पूर्ण होण्याच्या अगोदरच सरदार पटेल यांचा मुंबईमध्ये मृत्यू झाला .उद्घाटनाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद गेले होते.त्यावेळी ते राष्ट्रपती होते आणि नेहरूंचा सल्ला डावलून ते गेले होते .मंदिराच्या बाहेर मंदिराच्या प्रांगणात सरदार वल्लभाई पटेल यांचा सुबक पुतळा आहे .मंदिर सुबक सुंदर रेखीव आटोपशीर मनावर ठसा उमटवणारे आहे.मंदिर चालुक्य शैलीने बांधलेले असावे .दर्शन रांग लावून सुलभ पद्धतीने झाले.
दक्षिणेकडची मंदिरे उत्तरेकडील मंदिरांपेक्षा जास्त भव्य असतात . त्यांमध्ये शिस्तही जास्त आढळून येते.आम्ही प्रवास केला त्या वेळी गुजरात व राजस्थानमध्ये सर्वत्र देवदर्शनासाठी घोळका पद्धती होती .गर्दीमध्ये नीट दर्शन होत नसे .मंदिर मधूनमधून किंवा दीर्घकाळ दुपारी बंद ठेवण्याचीही प्रथा दिसुन आली.एका मंदिरात तर दरवाजे उघडल्यानंतर घोळक्यामधून आम्ही आत गेलो व दुसऱ्या दरवाज्याने दर्शनाशिवाय ढकलाढकलीत घोळक्याबरोबर झटक्यात बाहेर आलो.काही ठिकाणी दिवसभर मधून मधून देव पडदानशीन का केले जातात ते कळत नाही.त्यामुळे दर्शन व्यवस्थित होत नाही. ढकला ढकली होते.घोळका निर्माण होतो .रांग लावून नीट दर्शन घेण्याची पद्धत आढळुन आली नाही .सोमनाथला रांगेत दर्शन झाले .
*मंदिराबाहेर एक दगडी स्तंभ आहे त्यावर संस्क्रृतमध्ये बाणस्तंभ असा उल्लेख आहे.* दक्षिण ध्रुवापर्यंत सुमारे दहा हजार(९९३६) किलोमीटर पर्यंत सरळ रेषेमध्ये जमीन नाही .शास्त्रीयदृष्ट्या मध्ये अडथळा नसलेले सर्वात लांब असलेले हे एकमेव जगातील स्थान आहे असे वाटते .या ठिकाणी हे मंदिर बांधलेले आहे .म्हणूनही ते कदाचित ज्योतिर्लिंगांमध्ये अग्रस्थानी असावे . या तीर्थस्थानाची हीही एक उल्लेखनीय गोष्ट वाटते *अंटार्क्टिकापर्यंत सरळ रेषेमध्ये कोणताही अडथळा नसलेले सर्वात लांब अंतरावर असलेले हे जगातील एकमेव स्थान, त्याला भेट देईपर्यंत हे आम्हाला माहीत नव्हते .
१०२४ ते १०३०गझनीचा मोहम्मद दरवर्षी सोमनाथवर स्वारी करीत होता.आणि प्रत्येक वेळी भरपूर प्रमाणात लूट घेऊन जात होता .प्रत्येक वेळी मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करीत होता व आपण ते पुन्हा बांधीत होतो . असे इतिहासात आढळते .एवढी लूट त्याला मिळाली हे एक आश्चर्य . त्याला थोपवण्याचा कुणी प्रयत्न केला नाही हे दुसरे आश्चर्य .आपली मंदिर उभारण्याची चिकाटी व त्यासाठी उपलब्ध केला जाणारा विपुल पैसा हेही एक आश्चर्यच .पेशावरपासून सोमनाथ मंदिरापर्यंत सर्व राजे काय करीत होते असा प्रश्न पडतो.कुठचा गझनीचा महमूद काही हजार सैन्य घेऊन येतो व निर्धास्तपणे पेशावरपासून वेरावळ पर्यंत मार्गक्रमण करतो त्याला कुणीही प्रतिबंध करीत नाही .गझनीच्या महमूदला थोपविण्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न न होणे हेही एक आश्चर्यच. एकूण आनंदी आनंदच होता असे दिसते .
सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ हे अग्रभागी आहे .दक्ष प्रजापतींच्या सत्तावीस मुलींबरोबर चंद्राचे लग्न झाले .चंद्राने सर्व पत्नीना समान वर्तणूक दिली नाही .तो आपला सर्व वेळ रोहिणी बरोबरच दवडीत होता .स्वाभाविक त्याच्या इतर पत्नींनी वडिलांकडे तक्रार केली. दक्ष प्रजापतीने सांगूनही त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे दक्ष प्रजापतीने त्याला तू तेजोहीन होशील असा शाप दिला .पृथ्वीवरील चंद्र प्रकाश नाहीसा झाल्यामुळे देव व मानव हवालदिल झाले.दक्ष प्रजापतीने उ:शाप देता येणार नाही .त्याने शंकराची तपश्चर्या करून शापमुक्त व्हावे असे सुचविले. गुन्ह्याला काहीतरी शिक्षा हवी. पापक्षालनासाठी काही पुण्य संपादन आवश्यक . तेज कमी होत होत अस्तंगत होण्याची वेळ आली .
शंकराची तपश्चर्या कर म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने तू शाप मुक्त होशील असे त्याला सांगण्यात आले .प्रभास पट्टण तीर्थांमध्ये त्याने उग्र तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले.शंकराने त्याला वर देऊन शापमुक्त केले .चंद्र पूर्णपणे शापमुक्त झाला नाही .त्याच्या कला(तेज) पंधरा दिवस वाढत जातात व नंतर पंधरा दिवस कमी होत जातात .व एक दिवस अमावास्येला त्याचे तेज संपूर्णपणे नाहीसे होते.शापाचा एवढा परिणाम तरीही शिल्लक राहिला.असे होईल हे साक्षात शंकरानेच त्याला सांगितले .त्याच्या गुन्ह्याला पूर्ण शिक्षा मुक्त करणे शक्य व इष्ट नव्हते .(त्याला व बहुपत्नी असलेल्या इतरांना धडा मिळणे आवश्यक होते )महिना भर त्याला सर्व पत्नीना समान वेळ द्यावा लागतो .शंकराने चंद्राला दर्शन दिल्यानंतर त्याने शंकराला तू आता इथेच वास्तव्य कर अशी विनंती केली व भोळ्या सांबाने ती मान्य केली. अशाप्रकारे या ज्योतिर्लिंगाच्या निर्माणाची कथा सांगितली जाते. ग्रह तारे चंद्र सूर्य यांची आकाशातील काही विशिष्ट स्थिती कोणे एके काळी होती व नंतर काही कारणाने त्यात हल्ली आपण पाहतो तसा बदल झाला.आणि त्यामुळे ही अशाप्रकारची कथा निर्माण झाली की काय ते कळत नाही.ज्योतिर्लिंग बारा आहेत .शंकराची मंदिरे असंख्य आहेत .ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी ज्वाला वरती येत असतात असे म्हणतात .अध्यात्मिक प्रगती झालेल्या व्यक्तीला तिथे ज्वाला वर येताना दिसतात असे म्हणतात .कदाचित कोणे एके काळी तिथे स्वयंभू ज्वाला असाव्यात व हल्ली त्या गुप्त स्थितीमध्ये भूगर्भामध्ये असाव्यात असे म्हणता येईल .
येथील समुद्र किनारा फार सुंदर आहे .जवळ हिरण नावाची एक नदी समुद्राला मिळते .त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. हेही तीर्थस्थान व स्नानाची जागा आहे त्याला लागूनच काही समुद्राच्या भागाला प्रभासपट्टणतीर्थ असे म्हटले जाते.हे तीर्थ कृष्ण काळाच्या (द्वापारयुगाच्या ) अगोदरपासून अस्तित्वात होते असे दिसते .त्या काळी द्वापर युगामध्ये सोमनाथ मंदिर नव्हते असे वाटते .पुराणे केव्हा लिहिली गेली ते माहीत नाही. पुराणात असा उल्लेख आहे की चंद्राने हे मंदिर प्रथम सोन्याने बांधिले.नंतर सत्ययुगामध्ये रावणाने ते मंदिर चांदीने बांधले. कृष्णाने द्वापारयुगात ते लाकडाने बांधले .नंतर कलियुगात एका राजाने ते दगडाने बांधिले इ.महाभारतात कौरव पांडव कृष्ण इत्यादी या सोमनाथच्या दर्शनाला गेल्याचा उल्लेख मी तरी वाचला नाही. मंदिराच्या अस्तित्वाचा ,दर्शन घेतल्याचा, उल्लेख कुठे आढळत नाही.प्रभासपट्टण तीर्थावर स्नानासाठी आलेले असताना दारू पिऊन यादवांमध्ये कलह निर्माण झाला व त्याचा शेवट हाणामारीमध्ये होऊन यादव कुळाचा नाश झाला अशी कथा आहे .या विश्वामध्ये कोणाच्याही यशाचा आलेख सतत वर जावू शकत नाही जिथे चढ आहे तिथे उतारही आहे . जिथे आपण असामान्य अजिंक्य असल्याचा गर्व आहे तिथे तो गर्वाचा फुगा फुटणेही अपरिहार्य आहे.केव्हाही गर्वोन्मत्त होणे योग्य नाही(हे सर्वकालीन सत्य आहे आणि कोणी काही बोध घेत नाही हेही सर्वकालीन सत्य आहे !!) हीच गोष्ट अधोरेखित केली जाते.चंद्र काय आणि यादव काय हीच गोष्ट अधोरेखित होते .
वेरावळ येथे कृष्ण देहोत्सर्ग(जिथे कृष्ण निजधामाला गेले)व जिथे कृष्णाच्या पायाला भिल्लाचा बाण लागला ते स्थान भल्लाक तीर्थ म्हणून ओळखले जाते.तिथे मंदिरात कृष्ण भिल्ल यांच्या मूर्ती आहेत . कृष्ण निजलेला आहे व त्याच्या पायाला भिल्ल बाण मारीत आहे अशा मूर्ती आहेत.
बदल हा प्रकृतीचा नियम आहे .जिथे वृद्धी आहे तिथे क्षयही आहे .जिथे आरंभ आहे तिथे शेवटही आहे .केव्हाही कुणीही गर्वोन्मत्त होणे योग्य नाही .गर्वाचे घर नेहमी खाली असते.मदोन्मत्ततेमुळे शेवट होतो. या माहित असलेल्या गोष्टी या तीर्थस्थानाला भेट देवून पुन्हा अधोरेखित झाल्या .
११/१२/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@ gmail.com