गंगा म्हटले की विविध भावना विविध दृष्ये विविध माहिती यांचा एक कोलाज,एक संमिश्र चित्र मनांमध्ये निर्माण होते.गंगा नदीचे पावित्र्य, गंगेचा अहंकार, गंगा भूतलावर आणण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा,गंगेकाठची सभ्यता व संस्कृती जिला काही वेळा भारतीय संस्कृती म्हणूनही संबोधिले जाते , मी स्वतः घेतलेले गंगेचे विविध ठिकाणचे दर्शन ,गंगे काठचा कुंभमेळा, गंगेची विविध नावे ,गंगेचे प्रदूषण व त्या प्रदूषणाबद्दल चाललेली चर्चा,प्रदूषण दूर करण्यासाठी केलेले विविध प्रयत्न ,प्रदूषण दूर करण्यासाठी सुचविलेले विविध उपाय ,अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात .यातून कोणत्या गोष्टींवर लिहावे व किती लिहावे असा प्रश्न पडतो .एका लहानश्या लेखात जेवढे काही सांगता येईल तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे .
गंगा म्हणजे मूर्तिमंत पावित्र्य, गंगा म्हणजे मूर्तिमंत निर्मळपणा, असे भारतात प्राचीन काळापासून सर्वत्र समजले जाते.पावित्र्य व निर्मळता यांचे वर्णन करताना गंगेसारखे निर्मळ गंगेसारखे पवित्र असे वाक्प्रचार वापरले जातात .आपल्या गावच्या लहानश्या नदीलाही आपण गंगा म्हणून संबोधतो.पूर्वीच्या काळी घरी स्नान करताना हर गंगे भागीरथी म्हणून डोक्यावर तांब्या ओतला जात असे.केवळ नामोच्चाराने गंगेचे पावित्र्य त्या जलामध्ये येते अशी समज होती. गंगेचे नाव घेणे हेही पुण्यप्रद समजले जात असे. गंगा ही इतकी पुण्यशील आहे की त्यात अस्थी विसर्जन केल्यास मोक्ष मिळतो अशी समज आहे.गंगोत्री,उत्तर काशी ,देवप्रयाग, ह्रषिकेश, हरिद्वार, प्रयागराज, काशी,गंगासागर ,अशा काही ठिकाणी केलेले स्नान पुण्यप्रद तर आहेच परंतु गंगेत कुठेही केलेले स्नान पुण्यप्रद आहे.असे स्नान मोक्षप्रद होय अशी समजूत आहे.गंगाजलामध्ये कृमी( बॅक्टेरिया) निर्मूलन करण्याचे सामर्थ्य आहे .गंगाजल अनेक वर्षे आहे त्या स्थितीतच टिकते.गंगाकाठी तीर्थस्थानी गंगाजलाच्या सीलबंद छोट्या लोट्या मिळतात.त्या आणून नातेवाईकांमध्ये भेट म्हणून देण्याची एकेकाळी प्रथा होती .मृत्यूसमयी ती लोटी उघडून गंगाजल मुखांमध्ये टाकले तर त्या व्यक्तीला मुक्ती मिळते असा समज आहे .
जन्माला येऊन एकदा तरी काशी यात्रा करावी, गंगास्नान करावे, गंगा पाहावी,असे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते.आता पूर्वी असे,असे म्हणूया.कदाचित अजूनही परिस्थितीत फरक पडलेला नसावा .काशी जावे नित्य वदावे असा एक वाक्प्रचार प्रचलित होता.असे सतत म्हणत राहिले म्हणजे एकना एक दिवस आपल्याला काशीला जाता येईल.काशी विश्वेश्वराचे दर्शन होईल .पूर्वीच्या काळी प्रवास बिकट असताना ही गोष्ट अत्यंत कठीण असे .तरीही रामेश्वर कन्याकुमारीपासून असंख्य लोक कष्ट सोसत, वेळप्रसंगी प्रवासात मृत्यू येण्याची शक्यता असली तरी,गंगा दर्शनासाठी आतुर होऊन पायी प्रवास करीत असत.दक्षिणेकडील लोकांना एवढा लांबचा प्रवास करणे कठीण असल्यामुळे,त्याना दर्शनाचा लाभ व्हावा,स्नानाचा लाभ व्हावा,स्नानाची संधी मिळावी, म्हणून गंगेने साक्षात दक्षिणेला आगमन केले त्यालाच दक्षिण गंगा गोदावरी असे नाव आहे.
आपण नद्यांना माता असे म्हणतो .अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुलींची नावे ठेवताना नद्यांची नावे ठेवली जात .सर्वच नद्या पवित्र आहेत.घरी केलेल्या स्नानापेक्षा नदीतील स्नान जास्त पवित्र मंगलमय समजले जाते.भारतात नद्या अनेक आहेत .गंगेहून मोठ्या असलेल्या ब्रम्हपुत्रा सिंधू अशा नद्या आहेत .आता सिंधू नदीचा उगम जरी भारतात असला तरी तिचा मुख्य प्रवाह पाकिस्तानात आहे.त्या लांबीनेही मोठ्या आहेत.जरी त्या सर्व दृष्टींनी मोठ्या असल्या तरी गंगेचे सामर्थ्य,गंगेची पुण्यप्रदता,गंगेची महानता,गंगेचा नावलौकिक , त्यांच्यामध्ये नाही.गंगा ती गंगाच एकमेवाद्वितीयम् .
गंगेची नावे अनेक आहेत .
१. 'गंगा' शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ
अ. गमयति भगवत्पदम् इति गङ्गा ।
अर्थ : (स्नान करणार्या जिवाला) भगवंताच्या चरणांपर्यंत पोहोचवते, ती गंगा.
आ. गम्यते प्राप्यते मोक्षार्थिभिः इति गङ्गा ।
अर्थ : मोक्षार्थी म्हणजे मुमूक्षू जिच्याकडे जातात, ती गंगा होय.
२)ब्रह्मद्रवा
ब्रह्मदेवाने गंगेला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. त्यामुळे तिला 'ब्रह्मद्रवा' असे म्हणतात.
३)विष्णुपदी किंवा विष्णुप्रिया
गंगा विष्णुपदाला स्पर्शून भूलोकी आल्याने तिला 'विष्णुपदी' किंवा 'विष्णुप्रिया' हे नाव मिळाले.
४)भागीरथी
राजा भगीरथाच्या तपश्चर्येमुळे गंगा नदी पृथ्वीवर अवतीर्ण झाली; म्हणून तिला 'भागीरथी (भगीरथाची कन्या)' असे म्हणतात.
५)जान्हवी
हिमालयातून खाली उतरतांना गंगेने राजर्षी आणि तपोनिष्ठ अशा जन्हुऋषींची यज्ञभूमी वाहून नेली. या गोष्टीचा राग आल्याने जन्हुऋषींनी तिचा सगळा प्रवाहच पिऊन टाकला. मग भगीरथाने जन्हुऋषींची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गंगेचा प्रवाह स्वतःच्या एका कानातून बाहेर सोडला. त्यावरून तिला 'जान्हवी (जन्हुऋषींची कन्या)' हे नाव मिळाले.
६)त्रिपथगा
भूतलावर अवतरित झाल्यानंतर गंगेची धारा शिवाने जटेत अडवली. त्या वेळी तिचे तीन प्रवाह झाले. या प्रवाहांपैकी पहिला स्वर्गात केला, दुसरा भूतलावर राहिला आणि तिसरा पाताळात वहात गेला; म्हणून तिला 'त्रिपथगा' किंवा 'त्रिपथगामिनी' असे म्हणतात. ७)त्रिलोकांतील नावे
गंगेला स्वर्गात 'मंदाकिनी', पृथ्वीवर 'भागीरथी' आणि पाताळात 'भोगावती' म्हणतात.
८)'गँजेस्' – पाश्चात्त्यांनी दिलेले विकृत नाव.बहुधा पाश्चात्यांना गंगा हा साधा सरळ सोपा उच्चार असलेला शब्द उच्चारता येत नसावा म्हणून ते असा उच्चार करीत असावेत
ग्रीक, इंग्रजी आदी युरोपीय भाषांमध्ये गंगेचा उच्चार 'गँजेस्' असा विकृतपणे केला जातो. इंग्रजाळलेले भारतीयही तिला याच नावाने उच्चारतात.
'शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात', हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत आहे. 'गंगा' हा शब्द अयोग्य पद्धतीने उच्चारणार्यांना गंगेच्या स्मरणाचा आध्यात्मिक लाभ कसा होणार ? म्हणूनच परकीय भाषेत बोलतांना आणि लिहितांना तिला 'गंगा' या नावानेच संबोधित करा !असे बऱ्याच जणांचे मत व आग्रह आहे .
गंगाजलाला अंतरिक्ष जल असेही संबोधले जाते .सूक्ष्म जलीय कवच म्हणजे गंगा .
हिंदु धर्मशास्त्रानुसार ब्रह्मांड हे भूलोकादी सप्तलोक आणि सप्तपाताळ अशा १४ भुवनांचे बनते. ब्रह्मांड लंबवर्तुळाकार असून त्याच्या बाहेर चारही दिशांनी अनुक्रमे सूक्ष्म-पृथ्वीय, सूक्ष्म-जलीय, सूक्ष्म-तेज, सूक्ष्म-वायू, सूक्ष्म-आकाश, अहंतत्त्व, महत्ततत्त्व आणि प्रकृती अशी ८ कवचे असतात. या कवचांतील~~ 'सूक्ष्म-जलीय कवच' म्हणजे गंगा'.~~ म्हणूनच आयुर्वेदात गंगाजलाला 'अंतरिक्षजल' म्हटले आहे .
गंगा नदीच्या निर्मितीबद्दल पुढील कथा आहे.
वामन अवतारात विष्णूने दानशूर बलीराजाकडे भिक्षा म्हणून तीन पावले भूमीदान मागितले. वामन म्हणजे विष्णू असल्याचे ठाऊक नसल्याने बलीराजाने त्या क्षणी वामनाला तीन पावले भूमी दान दिली. वामनाने विराट रूप धारण करून एका पावलात संपूर्ण पृथ्वी आणि दुसर्या पावलाने अंतरिक्ष व्यापले. त्यांपैकी दुसरे पाऊल उचलतांना वामनाच्या (विष्णूच्या) डाव्या पायाच्या अंगठ्याचा धक्का लागून ब्रह्मांडाचे सूक्ष्म-जलीय कवच फुटले. त्यातून गर्भोदकाप्रमाणे ब्रह्मांडाबाहेरचे सूक्ष्म-जल ब्रह्मांडात शिरले. हे सूक्ष्म-जल म्हणजे गंगा !
हा गंगेचा प्रवाह प्रथम सत्यलोकात गेला. ब्रह्मदेवाने तिला स्वतःच्या कमंडलूत धारण केले. नंतर सत्यलोकात त्याने स्वतःच्या कमंडलूतील पाण्याने श्रीविष्णूचे चरण धुतले. त्या जलातून गंगा उत्पन्न झाली. नंतर ती सत्यलोकातून अनुक्रमे तपोलोक, जनलोक, महर्लोकअशा मार्गाने स्वर्गलोकात आली.
गंगेच्या पृथ्वीवरील अवतरणाबद्दलची कथा पुढीलप्रमाणे आहे.
राजा अंशुमन,राजा दिलीप व राजा भगीरथ यांनी चिकाटीने केलेल्या सातत्यपूर्ण व अखंड प्रयत्नांची गाथा म्हणजे पृथ्वीवरील गंगावतरण होय . त्यामुळे गंगेचे स्मरण झाले तरी चिकाटीच्या अविरत अखंड प्रयत्नांचे स्मरण होते.त्यामुळेच भगीरथ प्रयत्न अशी संज्ञा अतुलनीय प्रयत्नांना दिली जाते.
भगीरथाच्या कठोर
तपश्चर्येमुळे गंगा पृथ्वीवर अवतरली.भगीरथाने ही तपश्चर्या आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून केली.
सूर्यवंशातील सगर राजाने अश्वमेध यज्ञ आरंभला. प्रथम त्याने दिग्विजयासाठी यज्ञीय अश्व पाठवला आणि त्याच्या रक्षणार्थ स्वतःच्या ६० सहस्त्र पुत्रांना पाठवले. या यज्ञाची धास्ती घेतलेल्या इंद्राने यज्ञीय अश्व पळवून कपिलमुनींच्या आश्रमाजवळ बांधला. नंतर सगरपुत्रांना तो अश्व कपिलमुनींच्या आश्रमाजवळ सापडला. तेव्हा 'कपिलमुनींनीच अश्व चोरला', असे समजून सगरपुत्रांनी ध्यानस्थ कपिलमुनींवर आक्रमण करण्याचा विचार केला. ही गोष्ट कपिलमुनींनी अंतर्ज्ञानाने जाणून डोळे उघडले अन् त्या क्षणी त्यांच्या नेत्रातील तेजाने सर्व सगरपुत्र भस्मसात् झाले. काही काळानंतर सगराचा नातू राजा अंशुमन याने सगरपुत्रांच्या मृत्यूचा शोध घेतला. त्या वेळी कपिलमुनींनी अंशुमनला सांगितले, '`स्वर्गातील गंगा भूतलावर आण. सगरपुत्रांच्या अस्थी आणि रक्षा यांवरून गंगेचा प्रवाह वहात गेला, तर त्यांचा उद्धार होईल !'' त्याप्रमाणे गंगा पृथ्वीवर येण्यासाठी अंशुमनने तप आरंभले.
त्याच्या मृत्यूनंतर त्याचा सुपुत्र राजा दिलीपनेही गंगावतरणासाठी तप केले. अंशुमन आणि दिलीप यांनी सहस्रो वर्षे तप करून गंगावतरण झाले नाही; पण तपश्चर्येमुळे त्या दोघांना स्वर्गलोक प्राप्त झाला.
राजा दिलीपच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र राजा भगीरथने कठोर तपश्चर्या केली. त्या वेळी प्रसन्न झालेली गंगामाता भगीरथाला म्हणाली, ''माझा प्रचंड प्रवाह पृथ्वी सहन करू शकणार नाही. त्यामुळे तू भगवान शंकराला प्रसन्न करून घे.'' पुढे भगीरथाच्या घोर तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. नंतर शंकराने गंगेचा प्रवाह जटेत अडवला आणि तो पृथ्वीतलावर सोडला. अशा प्रकारे हिमालयात अवतीर्ण झालेली गंगा नदी भगीरथाच्या मागोमाग हरिद्वार, प्रयाग आदी स्थानांना पवित्र करत सागराला (बंगालच्या उपसागराला) मिळाली.
गंगासागर येथे कपिल मुनींचा आश्रम आहे .गंगासागर येथील स्नान सर्वात पुण्यप्रद समजले जाते.बनारस काशी येथील अनेक गंगास्नानांची बरोबरी गंगासागर येथील एक स्नान करते अशी एक हिंदी म्हण प्रचलित आहे
येथे आवर्जून असे सांगितले पाहिजे की गंगोत्री येथे गंगेचा उगम झाला असे जरी समजले जात असले, तरी तिला गंगा हे नाव देवप्रयाग नंतरच प्राप्त होते.तोपर्यंत तिला भागीरथी असे संबोधले जाते .गंगोत्री येथे भगीरथाने हजारो वर्षे तपस्या केली असे समजले जाते .तेथे भगीरथाचे मंदिर आहे. गंगेच्या प्रवाहाचा आवेग पृथ्वीवर उतरताना पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून शंकराने तो आपल्या मस्तकावर घेतला .त्यातून गंगा अनेक मार्गाने मार्गस्थ झाली .त्यातील एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे गंगोत्रीचा उगम होय.खरा उगम गंगोत्रीपासून वरच्या बाजूला हिमालयात गंगोत्री ग्लेशियर मध्ये होतो.
उत्तरांचलमधील केदारनाथ येथे मंदाकिनीचा उगम होतो तर बद्रीनाथ येथे अलकनंदाचा उगम होतो.मंदाकिनी अलकनंदेला रुद्रप्रयाग येथे मिळते .त्या अगोदर मंदाकिनी व अलकनंदा याना अनेक नद्यांचे प्रवाह मिळतात .हे सर्व प्रवाह गंगेचे शंकराच्या जटेमधून प्रवाहित झालेले समजले जातात.त्यांचे पावित्र्य गंगे इतकेच आहे .
पुढे अलकनंदा व मंदाकिनी यांचा एकत्रित प्रवाह अलकनंदा या नावाने देवप्रयाग येथे भागीरथीला मिळतो.तिथून त्या प्रवाहाला गंगा असे नाम प्राप्त होते .
उत्तरांचलमध्ये महत्त्वाचे पाच प्रयाग आहेत .दोन नद्यांच्या संगमाला प्रयाग असे म्हटले जाते.नंदप्रयाग,कर्णप्रयाग,विष्णुप्रयाग, रुद्रप्रयाग व देवप्रयाग होय .
गंगा म्हटली की आठवतो तो अहंकार होय.आणि त्या अहंकाराचे पदोपदी गर्वहरण झालेले आढळून येते.
माझा आवेग पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून तिने भगीरथाला सांगितले .शंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केले त्यात गंगा लुप्त झाली .तिचे गर्वहरण झाले. भगीरथाच्या तपश्चर्येनंतर शंकर प्रसन्न होऊन ती पुन्हा जटेतून प्रवाहित झाली .
पुढे तिने उन्मत्तपणे जन्हु ऋषींचा आश्रम व यज्ञ उद्ध्वस्त करून टाकला.रागाने जन्हु ऋषीनी तिला पिऊन टाकले व नंतर भगीरथाच्या विनंतीवरून कानातून प्रवाहित केले.तिचे पुन्हा गर्वहरण झाले .
कुणीही कितीही मोठा असो त्याचे गर्वहरण वेळोवेळी झालेले पुराणात व इतिहासात आढळते.गर्वाचे घर खाली ही म्हण सर्वकाळ सत्य आहे.
गंगा भूलोकी अवतरित झाल्याचा दिवस.याबाबतीत मतभिन्नता आढळते
गंगावतरणाची तिथी काही पुराणांत वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, तर काही पुराणांत कार्तिक पौर्णिमा सांगितली असली, तरी बहुसंख्य पुराणांत 'ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमी' हीच गंगावतरणाची तिथी सांगितली आहे आणि तीच सर्वमान्य आहे.
असे सांगितले जाते की गंगाजलामध्ये अस्थी विरघळण्याचे सामर्थ्य आहे.गोदावरीच्या रामकुंडातील जलामध्येही तसे सामर्थ्य आहे असे म्हटले जाते.
कुंभमेळा एकूण चार ठिकाणी भरतो.उज्जैन,नाशिक व त्र्यंबकेश्वर,(या ठिकाणी एकाच वेळी कुंभमेळा भरतो ) प्रयाग राज व हरिद्वार.या चार स्थानातील दोन स्थाने हरिद्वार व प्रयागराज(अलाहाबाद ) गंगेच्या काठी आहेत. गंगा व यमुना यांचा संगम अलाहाबाद येथे होतो त्याला प्रयागराज असे म्हणतात.सर्व प्रयागांचा राजा तो प्रयाग राज. कुंभमेळ्यामध्ये त्या त्या ठिकाणी यात्रा भरते. तीर्थस्थानी लाखोंच्या संख्येने भाविक येतात व पर्वणीच्या स्नानाचा आणि एरवीच्याही स्नानाचा लाभ घेतात .
गंगेचे दर्शन आम्हाला अनेकदा अनेक ठिकाणी झाले .गंगा स्नानाचा लाभही घेता आला .गंगोत्री, उत्तरकाशी, देवप्रयाग, हृषीकेश, हरिद्वार,प्रयागराज(अलाहाबाद ),पाटणा कोलकाता व गंगासागर. प्रत्येक ठिकाणी पावित्र्य व आनंद या भावना निर्माण झाल्या.त्या प्रत्येक ठिकाणच्या आठवणी मी स्वतंत्रपणे लिहिल्या आहेत .केदारनाथ बद्रीनाथ या तीर्थांचे दर्शन घेतले परंतु तिथे स्नान केलेले नाही.तिथे उगम पावणाऱ्या अनुक्रमे मंदाकिनी व अलकनंदा हे गंगेचेच प्रवाह आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झपाट्याने औद्योगिकरण झाले. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली.गंगा नदीच्या काठी शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झाले .उद्योगांचा व माणसांचा सर्व प्रकारचा टाकाऊ माल नदीमध्ये सोडला गेला.त्यामुळे नदीचे प्रदूषण प्रचंड प्रमाणात झाले आहे .गंगाजलाचे पूर्वीचे सामर्थ्य व शुध्दता आता राहिलेले नाही .अशी वस्तुस्थिती असली तरी भाविकांच्या मनातील गंगेचे स्थान अढळ आहे .अशी स्थिती केवळ गंगेचीच नाही तर सर्वच नद्यांची झाली आहे .उद्योग व माणसे यांच्या टाकाऊ मालाचा पुनर्वापर जल व खत या रूपाने करणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रचंड प्रमाणात पैशांची आर्थिक सामर्थ्याची गरज आहे .शासनाने त्याकडे जरी लक्ष असले तरी अनेक कारणांनी झालेले काम नगण्य स्वरूपाचे व भावी काम प्रचंड अशी वस्तुस्थिती आहे .
गंगा या विषयावर मनामध्ये जो कल्लोळ कोलाज उठला तो शक्य तितक्या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी झाला ते वाचकच ठरवतील .
६/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com