ताजमहाल हा जगातील जी अनेक आश्चर्ये आहेत त्यातील सर्वात सुंदर आश्चर्य आहे.अनेकजण जगातील सात आश्चर्यामध्ये त्याचा समावेश करतात .ताजमहाल प्रत्यक्ष पाहण्यापूर्वी त्याची भेट अनेक ठिकाणी झाली होती.जुन्या, ताजमहाल सिनेमामध्ये अनेक कोनातून ताजमहाल पाहिला होता.त्याशिवाय काही सिनेमांमध्ये ताजमहाल निरनिराळया कारणांनी दाखविलेला होता.चित्रांमध्ये, छोट्या प्रतिकृतींमध्ये, काचेच्या हंडीखाली, ताजमहाल अनेकदा पाहिलेला होता.औरंगाबादचा बीबीका मकबरा पाहताना ताजमहालची छोटीशी झलकही पाहिली होती .त्याशिवाय ताजमहालबद्दल माहितीही अनेकदा वाचनात आलेली होती.ताजमहालला भेट द्यावी असे अनेक वर्षे मनात होते परंतु योग येत नव्हता.उत्तर हिंदुस्थानामध्ये अनेकदा जाणे झाले.परंतु गेलो ते एकदम हिमालयामध्ये गेलो.काश्मीर वैष्णोदेवी डलहौसी धर्मशाळा सिमला कुलू मनाली उत्तरांचल छोटा चारीधाम नेपाळ दार्जिलिंग गंगटोक इत्यादी ठिकाणी जाताना बर्याचवेळा जरी आग्र्यावरून गेलो असलो तरी तिथे थांबलो नाही. हिमालयामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये प्रवास व भर उन्हाळ्यामध्ये आग्र्याला उतरणे योग्य वाटत नव्हते.मे जून महिन्याच्या पंचेचाळीस डिग्री उष्णतामान असलेल्या जागी नाशिक सारख्या तुलनात्मक थंड ठिकाणाहून आलेल्या आम्हाला आग्रा व परिसर पाहताना त्रास झाला असता. चाळीस पंचेचाळीस डिग्री उष्णतामान हे ऐकूनच त्रास होत होता. शेवटी आग्र्याला केवळ ताजमहाल पाहण्यासाठी जानेवारी अखेरीला मुद्दाम जाण्याचे ठरविले.(२००४)या वेळी थंडीचा कडाकाही नसतो आणि उन्हाळाही सुरू झालेला नसतो .
ताजमहाल प्रेम व प्रणय याचे प्रतीक आहे असे समजले जाते.ताजमहाल ही मुघल साम्राज्याने ज्या अनेक सुंदर इमारती बांधल्या (त्या संदर्भात वाद आहे.त्याचा ओझरता उल्लेख मी पुढे करणार आहे . )त्यातील सर्वात सुंदर , उत्कृष्ट,व अतुलनीय इमारत आहे.
मोगल बादशहा शहाजहान याचे त्याची पत्नी मुमताज महल हिच्यावर निरतिशय प्रेम होते .इ.स.१६३१ मध्ये चौदाव्या अपत्याला जन्म देताना तिचा मृत्यू झाला .तिच्या मृत्यूमुळे शहाजहान अतिशय दुःखी झाला .ताजमहालसारखी अप्रतिम कलाकृती निर्माण करून त्याने ती आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मुमताज महलला अर्पण केली .ताजमहालच्या बांधणीनंतर मुमताजचे शव तिथे दफन केलेले आहे.
इ.स.१६३२ मध्ये शहाजहानने त्याच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून अद्वितीय इमारत निर्माण करण्याचे ठरविले .सतत एकवीस वर्षी ताजमहालचे बांधकाम चालले होते .इ.स.१६५३ मध्ये ताजमहालचे बांधकाम पूर्ण झाले नंतर तिथे मुमताजचे शव नेण्यात आले.
नटवरलाल( मिथिलेश कुमार श्रीवास्तव) नावाच्या एका भामट्याने हा ताजमहाल अनेकदा विकला अशी नोंद आहे.त्यामुळे कोणत्याहि भामट्याला अनेकदा नटवरलाल असे म्हटले जाते.भामट्याला नटवरलाल हा शब्द बर्याच वेळा समानार्थी वापरला जातो.
ताजमहालच्या पायामध्ये अतिशय जुने व जून असे सागाचे लाकूड वापरलेले आहे असे सांगितले जाते .शेजारीच असलेल्या यमुना नदीमुळे ताजमहालचा पाया व त्यामुळे ताजमहाल आर्द्र व बळकट राहतो असे स्थापत्य शास्त्रज्ञांचे मत आहे . जर यमुना नदी तिथे नसती तर हा ताजमहाल शुष्क पडून पत्थराचे तुकडे तुकडे झाले असते.इतका दीर्घ काळ त्याचे सौंदर्य अबाधित राहिले नसते .वाहती परंतु स्तब्ध नितळ यमुना नदी तिचे भरलेले पात्र व त्यात ताजमहालचे पडलेले प्रतिबिंब हे दृश्य अप्रतिम असणार यात शंकाच नाही .आम्ही गेलो त्यावेळी प्रदूषित शुष्क आटलेली केवळ एखाद्या धारेसारखी दिसणारी अशी यमुना नदी होती.कसले प्रतिबिंब नि कसले काय !!
भारतीय, पर्शियन व इस्लामिक वास्तुकलेचे या बांधणीमध्ये प्रतिबिंब पडलेले आढळून येते .उस्ताद अहमद लाहोरी या नावाचा एक प्रसिद्ध पर्शियन वास्तुकलातज्ञ रचनाकार त्या वेळी होता.या इमारतीच्या रचनाकारांमध्ये तो प्रमुख होता.
त्या वेळी ताज महाल बांधण्यासाठी तीन कोटी वीस लाख भारतीय रुपये खर्च आला. हल्लींच्या किमतीमध्ये त्याचे परिवर्तन निरनिराळ्या प्रकारे केले जाते.त्यातील एक अंदाज साठ बिलियन रुपये आहे.
राजस्थान पंजाब लंका तिबेट चीन अफगाणिस्तान पर्शिया अशा अनेक ठिकाणाहून त्याच्या बांधणीसाठी संगमरवर व मूल्यवान दगड आणण्यात आले. पांढऱ्या शुभ्र संगमरवरामध्ये एकूण अठ्ठावीस प्रकारचे निरनिराळे मूल्यवान दगड बसवलेले आहेत.त्यातील कित्येक मूल्यवान दगड ताजमहालच्या रचनेमध्ये आता अस्तित्वात नाहीत.ते तेथून खरवडून काढल्यासारखे वाटतात. अठराशे सत्तावन्न सालच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी त्यातील कित्येक मूल्यवान खडे काढून घेतले असे सांगण्यात येते .
भारत पर्शिया ऑटोमन साम्राज्य व युरोप या ठिकाणाहून एकूण वीस हजार कारागीर आणले होते व ते सतत तेवीस वर्षे काम करीत होते.त्याचप्रमाणे एक हजार हत्तींचा वापर वाहतुकीसाठी केला गेला . ही माहिती वाचल्यावर बादशहा शहाजहानने या इमारतीच्या निर्मितीसाठी किती योजनाबद्ध खर्च केला व कष्ट घेतले ते लक्षात येते.त्याचे सल्लागारही किती जाणते होते ते लक्षात येते. या सर्वामागे किती नियोजन, किती सल्लागार, किती रचनाकार, असतील ते लक्षात येते .एक अद्वितीय सुंदर इमारत आपल्या प्रिय पत्नीसाठी उभी करायचीच या कल्पनेने शहाजहान भारून गेलेला होता आणि त्यासाठी वाट्टेल ते कष्ट व खर्च करण्याला तो तयार होता असे लक्षात येते .
दिवसाच्या निरनिराळ्या कालखंडांमध्ये ताजमहालचे रंग बदलत जातात .मंद करडा यापासून पीत मोतिया ते शुभ्रधवल यापर्यंत हे रंग बदलत जातात असे सांगतात .मोंगल बादशहाच्या राणीचे बदलते मूड यातून प्रतिबिंबित होतात असे म्हटले जाते. आम्ही फक्त एकदाच दुपारी ताजमहाल बघितला त्या वेळी तो शुभ्रधवल होता. पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताजमहालची शोभा अवर्णनीय दिसते असे म्हणतात. आम्ही गेलो त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव रात्रीचे पौर्णिमेच्या चांदण्यातील ताजमहाल दर्शन बंद होते . हल्लीही बहुधा तीच पद्धत चालू असावी.
ही वास्तू केवळ प्रचंड आहे .यमुनेच्या दक्षिण तीरावर ताजमहाल बांधलेला आहे .बत्तीस एकरावर ही वास्तू विस्तारलेली आहे.दक्षिणेकडून उत्तरेकडे यमुना नदीच्या बाजूला या वास्तूला उतार आहे .
मुख्य घुमटाची उंची दोनशे चाळीस फूट आहे .चार मिनार एकशेतीस फूट उंचीचे आहेत .वीस मजली इमारतीपेक्षाही घुमट जास्त उंच आहे असा अंदाज करण्यात आलेला आहे .
अशी वास्तू पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कारागीरांचे हात तोडण्यात आले ही केवळ अफवा आहे.
ताजमहाल मुमताजसाठी बांधण्यात आला. तिची कबर तिथे आहे. शुभ्रधवल ताजमहालाच्या शेजारी एक काळ्या रंगात ताजमहाल बांधावा अशी शहाजहानची इच्छा होती.त्यामध्ये स्वतःची कबर असावी असे शहाजहानला वाटत होते .दुर्दैवाने त्याची ती इच्छा पूर्ण झाली नाही.नाहीतर आपल्याला आणखी एक सुंदर इमारत पाहायला मिळाली असती .कृष्णवर्ण ताजमहालच्या शेजारी शुभ्रधवल ताजमहाल आपल्याला पाहायला मिळाला असता . या दोन्ही इमारती एकमेकांच्या पार्श्वभूमीवर उठून दिसल्या असत्या . शहाजहानचीही कबर ताजमहालामध्ये मुमताज महलच्या शेजारी आहे.मोठी कबर शहाजहानची व लहान कबर मुमताज महलची आहे . कबरीच्या भोवती कॅलिग्राफीमध्ये अल्लाची नव्याण्णव नावे कोरलेली आहेत .
शेजारीच वाहणाऱ्या यमुना नदीमुळे ताजमहालला आर्द्रतेचा लाभ सतत होत राहावा अशा कल्पनेने ताजमहाल यमुनेच्या काठी बांधण्यात आला.प्रदूषणामुळे व इतर कारणामुळे यमुना नदी कोरडी पडत आहे त्याचा वाईट परिणाम ताजमहालवर होत आहे .शुभ्रधवल संगमरवर आता प्रदूषणामुळे हळूहळू पिवळा पडत आहे असे काही जणांचे मत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे . आम्ही ताजमहाल बघितला तेव्हा यमुना नदीचे पात्र प्रदूषणग्रस्त व आकुंचन पावलेले दिसून येत होते.
एकशे तीस फूट उंचीचे चार मिनार जमिनीला काटकोनात नाहीत.ते बाहेरच्या बाजूला कललेले आहेत.त्याचे कारण जर भूकंप झाला तर ते मिनार मुख्य घुमटावर पडू नयेत हे आहे.
पु ना ओक नावाच्या एका महाराष्ट्रीय व्यक्तीने ताजमहाल नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.त्यात त्यानी ताजमहाल हा शहाजहानने बांधलेला नसून ते मुळात शिवालय शिव मंदिर होते असा सिद्धांत मांडला अाहे. जयसिंग नावाच्या राजाने हे मंदिर बांधलेले होते.तेजो महालय नावाचा राजवाडा होता. ही जागा शहाजहानने रजपूत राजांकडून शक्तीच्या जोरावर बळकाविली आणि ते मंदिर व राजवाडा यांचे रूपांतर कबरीमध्ये केले.महाल हा शब्द राजवाडा दर्शवितो कबर कधीही नाही . काही पाश्चात्य प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञांचा उल्लेख करून त्यांची अवतरणे देऊन ओक साहेब असे म्हणतात कि ताजमहालची रचना हिंदू मंदिराप्रमाणे आहे.जावातील एक मंदिर हुबेहूब ताजमहालप्रमाणे आहे.अष्टकोनी रचना हिंदू वास्तुशास्त्र रचना आहे .अष्टकोनी रचना अष्टदिशा व त्यांची विशिष्ट नावे हे फक्त हिंदूमध्ये आहे. अष्टकोनी रचनेला हिंदू वास्तूशास्त्रांमध्ये महत्त्व आहे.ताजमहालचा घुमट हिंदू मंदिरांवरील घुमटा प्रमाणे आहे .घुमटावरील त्रिशूळ नारळ आंब्यांची पाने हे सर्व हिंदूंमध्ये पवित्र समजले जाते .ताज महालमध्ये काही खोल्या बंद आहेत त्यामध्ये शिवलिंग आहे त्याचप्रमाणे मंदिरातील दागिने व इतर अवशेष त्यामध्ये सापडतील.तसे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलेले आहे .
मुमताज महलचे शव त्यांमध्ये नाही असेही ओक लिहितात.यमुना नदीच्या बाजूला एक दरवाजा आहे त्याचे रेडिओ कार्बन डेटिंग पुरावा म्हणून ओक साहेब देतात.
या संदर्भात कोर्टात अनेक केसेस गेलेल्या आहेत आणि कोर्टाने त्या धुडकावून लावलेल्या आहेत .२०१७ मध्ये पुराणवस्तू संशोधन खात्याने केलेल्या एका पाहणीमध्ये तिथे मंदिर असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही असा अहवाल दिलेला आहे .
भारतीय संसदेकडे बंद खोल्या उघडण्याची व कबरही उघडण्याची परवानगी मागण्यात आली होती ही मागणी फेटाळण्यात आली .
कबर व खोल्या उघडण्यात आल्या तर वाद मिटेल यात शंका नाही . त्याचे राजकीय परिणामही लक्षात घेतले पाहिजेत .तज्ञांचे बहुमतसुध्दा तिथे मंदिर होते या बाजूने नाही.(ओकसाहेब व त्यांचे अनुयायी यांनी केवळ ताजमहालबद्दलच नव्हे तर इतर अनेक मुगल कालीन इमारतीबद्दल आक्षेप घेतले आहेत .एवढेच नव्हे तर जगात फक्त हिंदू धर्म होता मुसलमान धर्म व ख्रिश्चन धर्म हे त्यातून निर्माण झाले असे त्यांचे मत आहे .त्याबद्दल पुन्हा केव्हातरी .जैन व बौद्ध धर्माचा तर प्रश्नच नाही. )
ओक साहेबांच्या म्हणण्यावर एक मुद्दा मांडता येईल.विविध देशांतील विविध धर्मातील वास्तुशैलींचे एकत्रीकरण करून एक आकर्षक भव्य सुंदर इमारत शहाजहानला निर्माण करायची होती .त्यामुळे रचनाकाराला व शहाजहानला, हिंदू स्थापत्य शास्त्रातील आवडलेला भाग घेतला गेला.अष्टकोनी रचना ,हिंदू शैलीचा घुमट ,आंब्याची पाने, नारळ,इत्यादी गोष्टी त्यामुळे आल्या.असे स्पष्टीकरण देता येईल.ताजमहाल नावाचेही तसेच स्पष्टीकरण देता येईल असो.
आत जाताना कडक सुरक्षा व्यवस्था आहे .आपल्याजवळील सर्व सामान बाहेर ठेवून टोकन घेवून जावे लागते .पाण्याची बाटली सुद्धा नेऊ देत नाहीत.मधुमेह पीडित,आजारी व्यक्ती, रक्तदाब पीडित, अशा काही व्यक्तींना एखादा बिस्कीटाचा पुडा, पाण्याची बाटली, मोठ्या मुष्कीलीने व सुरक्षा रक्षकांच्या कृपेने आत नेता येते .
आत गेल्यावर यमुना नदीच्या काठापर्यंत उतार आहे हे लगेच लक्षात येते.दोन्ही बाजूंनी पायवाट, मध्ये लांबलचक काटकोनाकृती तलाव,त्यांत
कारंजी व वाहते पाणी, कारंजाच्या दोन्ही बाजूने जाणाऱ्या पायवाटांच्या बाजूला बागा व हिरवळ, नंतर चबुतरा व चबुतऱ्याच्या चार कोपऱ्यांत चार मिनार व मध्ये ताजमहालची मुख्य इमारत,अशी रचना प्रवेशद्वारातून आत गेल्याबरोबर दिसते.पॅनोरॅमिक दृश्य मन उल्हासित करते.सर्व दृश्य भव्य व मनावर छाप पाडील असेच होते .आम्ही गेलो तेव्हा तलाव कारंजी कोरडी ठाक पडली होती. त्यामुळे सिनेमातील दृश्यांवर समाधान मानून घ्यावे लागले .वाहते पाणी,उंच उडणारी कारंजी व नंतर ताजमहाल हे दृश्य कसे दिसले असते ते मन:चक्षूंसमोर आणले.समोर चबुतरा मिनार ताजमहाल बागा हिरवळ दिसतच होत्या. फक्त कल्पनेने भरपूर पाणी व कारंजी आणली.
सर्व दृश्य मनोहारी आहे .भर दुपार असूनही आम्हाला वास्तूमध्ये फिरताना उन्हाचा त्रास जाणवत नव्हता.
मुख्य भाग अष्टकोनी आहे .मनोरे किंचित बाहेरच्या बाजूने कललेले आहेत .याचा उल्लेख वर केलाच आहे .वास्तुशास्त्रातील आम्हाला विशेष काही कळत नाही .दुर्बिण असल्याशिवाय छताच्या आतील,छतावरील, भिंतीवरील, कलाकुसर व्यवस्थित दिसत नाही.जेवढे साध्या डोळ्यांनी दिसते तेवढ्यावर समाधान मानावे लागते.आमच्याजवळ दुर्बिण किंवा अन्य दूरचे पाहायचे साधन नव्हते.खरे सांगायचे म्हणजे दुर्बिण वगैरे घेऊन एवढी कलाकुसर पाहण्यात मन रमत नाही हेच खरे .त्यासाठी कलाकुसर जाणारा रसिक पाहिजे .असा रसिक कोणत्याही कलाकृतींमध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाहात राहील व आनंदही घेत राहील.
मुख्य वास्तूशास्त्रकाराचा शहाजहानशी काहीतरी मतभेद झाला आणि त्याने छतामध्ये एक लहान छिद्र ठेवले व त्यातून कबरीवर पाणी पडते हीही लोणकढीच आहे.
एखाद्या वास्तूबद्दल खूप काही ऐकलेले असले की अपेक्षा खूप उंचावलेल्या असतात .त्या अपेक्षांची पूर्ती झाली तरीसुद्धा ती वास्तू उत्कृष्ट आहे असे आपण चटकन म्हणत नाही.असे काहीसे झाले असावे असे म्हणता येईल .कदाचित मी रसग्रहणामध्ये कमी पडलो असेन.जेवढा आनंद व समाधान मला अपेक्षित होते तेवढा आनंद व समाधान मिळाले नाही असे वाटते .
आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शहाजहान बंदिवासात होता.तेथील एका दालनातील गवाक्षातून तो ताजमहालकडे पाहात असे .आपली शेवटची वर्षे त्याने तशीच बंदिवासात घालविली.
मुलाकडून बंदिवास ,प्रिय पत्नीचा मृत्यू ,अनेक नातेवाईकांचा विरह , अमर्याद सत्ता उपभोगल्यानंतर क्षणात ती सत्ता नष्ट होणे, या पार्श्वभूमीतून विचार करता ,गवाक्षातून ताजमहाल व यमुना नदीकडे पाहात असताना शहाजहानला काय वाटत असेल त्याची कल्पनाच करावी.
करुणेने हृदय निश्चित भरून येईल . कालाय तस्मै नम:
दोन तीन तास फिरत, मधून मधून बसत,विश्रांती घेत ,गप्पा मारीत, ताजमहालचे निरीक्षण करीत घालविला.एवढा वेळ केव्हा गेला ते कळलेच नाही .पुरेसे समाधान झाल्यावर ताजमहालचा निरोप घेतला .
ती कलाकृती कुणीही रचलेली असो . एक अद्वितीय अद्भूत सात आश्चर्यातील एक अशी कलाकृती बघितल्याचे समाधान अंतरंगात साठवून आम्ही तेथून निघालो .
२३/६/२०१९©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com