दरवर्षी दोनदा सुट्ट्यांमध्ये गुळे येथे आम्ही जात असू .व्हाया पुणे,/ कराड,/ मुंबई /,यांचा थोडा कंटाळा आला होता .या वर्षी महाबळेश्वर वरून जावे असा विचार मनात आला .अजून पर्यंत महाबळेश्वर आम्ही पाहिलेले नव्हते .जाण्यांमध्ये म्हटल्या तर दोन अडचणी होत्या .आमची मुलगी स्वाती अडीच वर्षांची होती. तिला घेऊन एवढा प्रवास आम्हाला व तिला झेपेल का असा एक प्रश्न होता .दुसरा प्रश्न स्वातीला लहान (वय वर्षे अडीच)असल्यामुळे भातच लागत असे आणि त्यावेळी रेशनिंगमुळे तांदुळाच्या टंचाईमुळे मंगळवार शुक्रवार केवळ भगर हॉटेलातून दिली जात असे.स्वातीला मऊ भात लागत असे व तो हॉटेलात मिळणे दुरापास्त होते .यावर आम्ही असा तोडगा काढला की बरोबर स्टो व तांदूळ घेऊन जावे दूध हॉटेलमध्ये मिळेलच खोलीमध्ये भात शिजवून तिची खाण्याची व्यवस्था करावी .तिची प्रकृती पाहता तिला नक्की झेपेलअसे वाटले व आम्ही तिला हातातून आलटून पालटून नेऊ शकू असे वाटले . जाण्याचे निश्चित झाले व एका हॉटेलात खोली ही बुक केली.औषधे ,तीन महिने कोकणात रहावयाचे या दृष्टीने कपडे व इतर सामान आणि एका ट्रंकेत स्टोव्ह वगैरे अशी तयारी केली.
हिच्या शाळेतील ओळखीचे सर जेरेसर संस्कृतचे शिक्षक वाई येथे संस्कृत पाठ शाळेवर शिक्षक होते. ते अनेक वर्षे बोलवत होते त्यांच्याकडे दोन दिवस राहून नंतर महाबळेश्वर व नंतर गुळे असा एकूण कार्यक्रम ठरला .
हल्ली एसटीच्या गाड्याही विविध प्रकारच्या व चांगल्या असतात. त्याशिवाय खासगी बसेसही असतात. खासगी टॅक्सी व इतरही सोयी आहेत .स्वत:ची मोटारही असते. हल्ली पैसाही त्यावेळेपेक्षा मुबलक प्रमाणात असतो .
लाल गाडीतून थ्री बाय टू अशा सीट्स, घाम गाळत प्रवास, एसी वगैरेची तर बात दूरच, हल्लीच्या मुलांना एकूण त्यावेळच्या परिस्थितीची प्रवासातील कष्टाची व त्रासाची कल्पना येणे कठीण आहे .गर्दी मुळे रिझर्वेशन शिवाय प्रवास करणे अशक्य त्यासाठी स्टँडवर जाऊन लाईनमध्ये उभे राहून रिझर्वेशन करणे आवश्यक होते.(ऑनलाइन वगैरे रिझर्वेशनचा प्रकार हा हल्ली आला.) नाशिक--पुणे --वाई --महाबळेश्वर-- महाड-- रत्नागिरी व नंतर होडी वगैरेतून चालत पुढे अशी एकूण स्थिती होती .त्यात आमच्या जवळ स्टो वगैरे प्रचंड सामान .त्या काळी ठिकठिकाणी एकूण प्रवास टांग्यातून करावा लागे.रिक्षा जवळ जवळ नव्हत्या .प्रत्येक टप्प्यावर रिझर्व्हेशनसाठी त्या त्या स्टॅंडवर जावे लागे.एवढे सविस्तर वर्णन करतो कारण त्या वेळच्या बिकट स्थितीची कल्पना नीटपणे यावी .लहान मुलाला घेऊन असा टप्प्या टप्प्याने प्रवास फार कठीण होते असे आता वाटते .त्या काळी प्रवास हा असाच असायचा अशी धारणा असल्यामुळे त्याचा काही विशेष त्रास होत नसे.ही गोष्ट एकोणीसशे सहासष्ट मधील आहे म्हणजे सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची आहे .हल्ली प्रवास अत्यंत सुखकर आहे तरीही करणारे चिडचिड भरपूर प्रमाणात करतात .सुख व त्रास हा भौतिक परिस्थिती प्रमाणेच मानसिक स्थितीवरही अवलंबून असतो.त्या वेळी आम्ही हे सर्व सहज हसत हसत वआनंदाने केले असे आता लक्षात येते .असा प्रवास आनंदासाठीच चालला होता नाहीतर नेहमीच्या मार्गाने(तोही बिकट होता) जाता आले असते .
प्रवासाची सर्व तयारी झाली व आम्ही प्रथम पुणे नंतर वाई वरून( कोल्हापूर ऐवजी!) महाबळेश्वरला पोचलो .वाईला वारेशास्री यांच्याकडे अर्थात दोन दिवस राहिलो.वाईचा प्रसिद्ध गणपती व घाट पाहिला . महाबळेश्वरला सकाळी आम्ही सनराइज पॉईंट बघण्यासाठी टॉर्च वगैरे घेऊन निघालो .सूर्योदय पाहण्यासाठी तो चुकू नये म्हणून , घाईघाईने चालत असताना, पाठीमागून एक मोटार आली.मोटारीत ड्रायव्हर सोडून आणखी दोघे जण होते .त्यांनी आम्हाला तुम्ही कुठे चाललात असे विचारले .सनराइज पॅाइंटकडे चाललो आहोत असे सांगितल्यावर त्यांनी आम्हाला चला आम्ही तिकडेच चाललो आहोत असे सांगून मोटारीत बसण्यास सुचविले .आम्ही क्षणभर विचारात पडलो नंतर बसण्याचा निर्णय घेतला .जाताना सर्वसाधारण गप्पा झाल्या त्यातून आमचे नाव त्याना कळले असावे परंतु त्यांचे नाव कळले नाही .परत हॉटेलवर जाताना वाकडी वाट करून त्यानी आम्हाला हॉटेलवर सोडले.परत येताना त्यांचे नाव रणजीत देसाई आहे असे कळले .त्या वेळी त्यांची स्वामी ही कादंबरी गाजत होती. त्यांना न ओळखल्या बद्दल आम्ही दिलगिरीही प्रगट केली .आम्ही हॉटेलात गेल्यावर असे लक्षात आले की आमचा टॉर्च त्यांच्या मोटारीत राहिला.टॉर्च आता कसचा परत मिळतो असे आम्हाला वाटले .थोड्याच वेळात त्यांच्या ड्रायव्हरने येऊन टॉर्च परत दिला.त्यांच्या सर्वच वागण्यामध्ये नम्रता दिसत होती .त्यांची पुन्हा भेट सनसेट ( बॉम्बे पॉइंटवर ) झाली .ते समोरचे जावळीचे खोरे न्यहाळीत होते .आदल्या दिवशीच ते प्रतापगडावर जाऊन आले होते व जेथे अफजलखानाचा वध झाला ते ठिकाणही त्यांनी पाहिले होते .तिथेही ते हिंडले होते .त्यांच्या बोलण्यात अफजलखानाला गडाच्या पायथ्याशी झुलवत आपल्या टापूत बोलवण्याचे महाराजांचे कौशल्य व नंतर महाराजांची भेट इत्यादी विषय आले. महाराजांच्या जीवनावर एखादी कादंबरी लिहिण्याचे त्यांच्या मनात होते.त्या दृष्टीने ते प्रत्यक्ष पहाणी करून कादंबरीची कशी मांडणी करावी याचा विचार करीत होते असे लक्षात आले. त्यानंतर त्यांची श्रीमान योगी ही (प्रसिद्ध) कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या वेळी हल्लीसारखी महाबळेश्वरला गर्दी नसे.तिथल्या कठड्यावर बसून निवांतपणे सूर्यास्त पाहता येई. व्यवस्थित गप्पाही मारता येत .आम्ही पॉइंटवर गेल्यावर आम्हाला रणजीत देसाई लांबून दिसले व त्यांच्या जवळ जाऊन गप्पाहि मारता आल्या .आठ दहा वर्षांपूर्वी महाबळेश्वरला पुन्हा जाण्याचा योग आला .त्या वेळी सनसेट पॉइंटवर एवढा माणसांचा समुद्र होता आणि एवढे फोटो व सेल्फी काढल्या जात होत्या व बोलण्याचे एवढे आवाज येत होते की मुंबईच्या एखाद्या गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर गेल्यासारखे वाटले.कठड्यावर बसणे व जावळीचे खोरे निरखणे तर दूरच परंतु गर्दीत व कलकलाटात सूर्यास्त पाहणेही अशक्य होते.आपली माणसे गर्दीत हरवतील की काय असे वाटत होते . कमी जास्त प्रमाणात सर्वच पॉइंट्सवर प्रचंड गर्दी होती पूर्वीची शांतता व शांतपणे निसर्गाच्या भव्यतेचा व सौंदर्याचा आस्वाद घेणे केवळ अशक्य होते .खाण्या पिण्याच्या गाड्यांचीही प्रचंड गर्दी होती व त्यामुळे अस्वच्छतेचे प्रमाणही फार होते.पैसा आला, गाड्या आल्या ,परंतु सौंदर्य स्थळावरती व एकूणच शिस्त कशी ठेवावी, शांतता कशी राखावी ,स्वच्छता अस्वच्छता याचे भान कसे ठेवावे,केवळ निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ,इतर अनेक फालतू गोष्टींमध्ये आपलं मन ,इथे तरी रमू न देण्यासाठी काही एका स्वयंशिस्तीची व शिक्षणाची गरज वाटते .कमी जास्त प्रमाणात सर्वच रसिकांना असा अनुभव सर्वत्र येत असावा असे वाटते . धार्मिक स्थळेही याला अपवाद नाहीत .त्यामुळे एकूणच विषण्णता येते.
स्वतंत्रपणे टॅक्सी करून फिरणे खर्चिक असल्यामुळे आम्ही आमच्या हॉटेलातील एका जोडप्याबरोबर शेअर टॅक्सी केली व प्रतापगडला जाऊन आलो .त्या वेळी आम्ही निवांतपणे अफजलखानाची समाधी पाहू शकलो .तिथला परिसरही न्यहाळता आला .प्रतापगडावरही अगदी मामुली गर्दी होती. दुसऱ्या वेळी मात्र प्रचंड गर्दी होती.
सर्व महाबळेश्वर जवळ जवळ फिरलो तेवढ्यात वडील आजारी असल्याचा फोन आल्यामुळे लवकर निघावे लागले .महाड रत्नागिरी वगैरे टप्पे गाठीत घरी आलो .
२५/६/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com