गणेशगुळे हे आमचे वडिलोपार्जित गाव .रत्नागिरीपासून समुद्र किनार्याने पाच सहा किलोमिटरवर व रस्त्याने अठरावीस किलोमीटरवर ते आहे .त्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे.आपले मूल आपल्याला नेहमीच सुंदर दिसते .!गाव जरी माझे असले तरी तिथे मी वयाच्या तेराव्या वर्षी प्रथम गेलो .हल्ली ठिकठिकाणी पूल झाल्यामुळे गावाला रत्नागिरीशी कनेक्टिव्हिटी चांगली आहे .पूल होऊन सुमारे पंचवीस वर्षे झाली .त्याच्या अगोदर गावाला पोहोचायला कमीत कमी तीन चार तास लागत असत. पावसपासून .त्या वेळी सुमारे तीन ते चार मैल अंतर चालत जावे लागे पावसपासून .एक डोंगर चढावयाचा तोच पुन्हा समुद्राच्या किनाऱयाच्या दिशेने उतरावयाचा.डोंगर चढताना वारा नसल्यामुळे व समुद्राची हवा असल्यामुळे नुसते घामाघूम व्हायला होत असे.एकदा चढ संपला व अापण उताराला लागलो मग मात्र आनंदीआनंद असे.समोर विस्तीर्ण समुद्र किनारा दिसत असे. तो अगदी गावात उतरेपर्यंत दिसत राही.डावीकडे पूर्णगडाचा डोंगर व उजवीकडे रनपारचा डोंगर दिसत राही. डावीकडे पूर्ण गडाच्या डोंगरापासून आमच्या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत लहानलहान दोन तीन डोंगर दिसत .समोर गुळ्याचा समुद्र किनारा ,किनाऱयाच्या दोन्ही बाजूला दोन डोंगर ,दोन डोंगरामध्ये दिसणारा फेसाळणारा समुद्र, पांढरी शुभ्र वाळू ,त्यानंतर भंडारवाडा ,लहान लहान दिसणारी सर्वत्र पसरलेली घरे, घरांच्या दोन्ही बाजूला नारळी पोफळीच्या घनदाट बागा .त्यानंतर भातशेती केली जाणारी कुर्याठे त्यानंतर घनदाट झाडी त्यांमध्ये आमची व कुणब्यांची घरे लपलेली असत . समुद्रावरून येणारा वारा अंगाला सुखवीत असे व घाम सुकवीत असे.उतारावरून घरंगळत जातांना श्रम होत नसत व गार वारा अंगाला सुखावत असे.समोर मनोहर दृश्य सतत दिसत असे .डोंगर उतारावरून घाटीवर पोचेपर्यंत हे दृश्य सतत दिसत असे.घाटी उतरताना दोन्ही बाजूला दाट झाडी होती व घाटी उतरल्यावर समोर आमचे घर दिसू लागे.मी हा डोंगर सकाळपासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत अनेकदा पार केलेला आहे व प्रत्येक वेळी दिसणारे दृश्य तेच असले तरी त्याची गम्मत प्रत्येकवेळी निरनिराळी असे.विशेषतः संध्याकाळी सूर्य पश्चिमेला बराच खाली गेल्यानंतरचे दृश्य फारच आकर्षक असे .काळोख्या रात्री सर्वत्र चमचमणारे तारे समोर समुद्राच्या किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटां,तर चांदण्या रात्री समुद्र व इतर झाडी डोंगर यांची एक वेगळीच शोभा दिसते.निरनिराळ्या ऋतूत व निरनिराळया प्रहरी डोंगर उतरताना वेगवेगळी शोभा दिसते.ती शोभा प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे .डोंगराच्या कोणत्याही घाटीवरून गाव दरीला उतरले तरी शोभा थोड्या बहुत फरकाने तशीच दिसते .दुसरी घाटी म्हणजे गणपतीची घाटी सडय़ावर स्वयंभू गणेशाचे स्थान आहे तिथून आमच्या गावाकडे येताना जी घाटी लागते ती गणपतींची घाटी .नारायणाच्या देवळाच्या जवळ जी घाटी उतरते तिला नारायणाची घाटीअसे म्हणतात .ही घाटी आमच्या घराजवळ उतरत असल्यामुळे बहुतेक वेळी आम्ही त्याच घाटीने येत असू.
हल्ली गावात मोटार यायला लागल्यामुळे चालत मुद्दाम आले तरच, ते होत नाही.त्यामुळे निरनिराळ्या ऋतूतील निरनिराळ्या प्रहरातील या अनुपम सौंदर्याला आपण स्वाभाविकपणे मुकतो .आणखी एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे काही झाडे रात्री स्वयंप्रकाशने चमकत असतात .
दिवसा व रात्री बहुतेक प्रहरात आम्ही समुद्रावर फिरायला गेलोआहोत .प्रत्येक वेळी समुद्राचे सौंदर्य निरनिराळे दिसते. आवडती व सोयीची वेळ म्हणजे संध्याकाळ व रात्रीचा पहिला प्रहर .तर स्नानासाठी सकाळी नऊ ते दुपारी एक होय .रात्रीच्या वेळी विशेषत: भरती असताना समुद्राच्या लाटा चमकत असतात .त्यांची चमकती किनार आपल्याकडे लाटेबरोबर येताना व लाट फुटताना सुरेख दिसते. समुद्राची गाज म्हणजेच गर्जना आवाज कमी जास्त प्रमाणात नेहमीच असतो .परंतु विशेषता रात्रीच्या वेळी तो घरातून जास्तच जाणवतो. काही पाहुणे त्यामुळे नीट झोप लागली नाही असे म्हणत असत.
.समुद्रावर गेल्यावर उजव्या बाजूच्या डोंगराला तांबुसकडा म्हणतात.याची माती तांबडी लाल असल्यामुळे याला तांबुसकडा म्हणतात.
मातीच्या भिंती सारवण्यासाठी या मातीचा उपयोग केला जातो . त्यामुळे भिंती सुरेख लाल भडक दिसतात .हा कडा रनपार बंदरापर्यंत पसरलेला आहे .या कड्याच्या पलीकडे समुद्रापर्यंत बराच खडकाळ भाग आहे .त्यात एक बऱ्यापैकी उंच भाग आहे .अमावास्या व पौर्णिमा यांच्या मागे पुढे एक दोन दिवस समुद्राचे खारे पाणी यावर जाते व खोलगट भागात पसरते .पुढील बारा तेरा दिवस ते उन्हाने सुकून मीठ तयार होतॆ.हे नैसर्गिक मिठागर आहे फार पूर्वी त्याचे मीठ आणून वापरले जात असे ,असे म्हणतात .
पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्र तांबडा लाल होतो .नंतर पाऊस येतो असे जुने लोक म्हणत असत.आमच्या लहानपणी तांबूस कड्या जवळच्या किनाऱ्याला बऱ्यापैकी रुंदी होती .हळूहळू समुद्र आत घुसल्यामुळे हल्ली किनाऱ्याची रुंदी फारच कमी झाली आहे. समुद्र किनारा धुपून जाऊ नये म्हणून आता समुद्र किनारपट्टीला सुरूची झाडे मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत. त्यामुळे आता किनारा टिकला आहे।किनाऱ्याला लांबी विशेष नाही. एखादा किलोमीटर जेमतेम असेल.डाव्या बाजूचा डोंगर समुद्रात बराच घुसलेला आहे. त्याच्या पलीकडे शांत सरोवरासारखा समुद्र आहे. तिथे स्नान करावयाला सुरक्षित व छान जागा आहे .ब्राह्मण कुणबी यांची घरे डोंगराच्या पायथ्याशी तर भंडाऱ्यांची घरे समुद्र किनाऱ्याला अशी सर्वसाधारण रचना आहे. डोंगरापासून समुद्र किनारा सूमारे एका किलोमीटरवर आहे .
पूर्वी छोटी छोटी चार गावे होती. आगरगुळे माडबनगुळे गावडेगुळे व फडकेवाडा .सडय़ावर स्वयंभू गणपती मंदिर असल्यामुळे ही चारी गावे एकत्र करून त्याला गणेशगुळे असे नाव देण्यात आले .माडबनगुळ्यांमध्ये केवळ भंडाऱयांची वस्ती ,तर इतर ठिकाणी संमिश्र वस्ती आहे .कोकणातील बहुतेक गावांप्रमाणे वस्ती वाढली, मर्यादित उत्पन्नात भागेना ,त्यामुळे मंडळी हळूहळू मुंबई व इतर शहरांच्या दिशेने जाऊ लागली .त्यातील काहींचा गावाशी संबंध उरला, तर काहींचा संबंध पूर्णपणे दुरावला .विशेषत: ब्राह्मणांचे कित्येक चौथरे ओस पडलेले दिसतात. घरे केव्हाच पडून गेली.लोक परागंदा झाले गावाशी त्यांचा संबंध पूर्णपणे तुटला व मूळगावही माहीत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली .माझ्या लहानपणीची गोष्ट आहे. सर्कस वाले देवल हे मूळचे आमच्या गावचे,त्यांना अागरगुळे आपले मूळ गाव असे ऐकून माहिती होते.त्यांच्या सर्कसचा एक लहानसा भाग कोकणात आला होता .सावंतवाडीपासून जिथेजिथे ते तंबू टाकत, त्या त्या ठिकाणी आगरगुळे कुठे ,अशी चवकशी करीत ,शेवटी त्यांना रत्नागिरीला इथून जवळच आहे असे कळले. ते आगरगुळ्याला आले, देवावर त्यांनी अभिषेक केला ,गावांमध्ये तंबू टाकला व एक दिवस सर्वाना मोफत खेळ दाखविला. नंतर ते मार्गस्थ झाले. तेव्हा आम्हा सर्वांना सर्कसवाले देवल हे सांगलीचे नसून आपल्या गावचे आहेत हे कळले .
आता गावात चांगला टा्ररोड झालेला आहे. रत्नागिरीला भाट्ये खाडीवर पूल झाल्यामुळे व इतर नद्यांवर पूल झाल्यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी रत्नागिरीशी आहे. गावात रत्नागिरीहून पाच सहा वेळा एसटीच्या गाड्या येतात.गावात अनेक जणांकडे मोटारसायकलीही आहेत. शिवाय कारही आहेत .गावात अनेक जणांनी रहाणेची व जेवणाची व्यवस्था केलेली आहे .समुद्र किनारी थ्री स्टार हॉटेलही निघाले आहे .तिथे आधुनिक पद्धतीने राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही आहे .गाव बदलले आहे परंतु अजूनही घाटी कोणतीही उतरली की मोबाईल रेंज जाते व फोन (लॅण्डलाइन) एवढेच संपर्क साधन( कनेक्टिव्हिटी) राहते .
३/६/२०१८ ©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com