मी नाशिकला १९६० मध्ये आलो.BYKcollege of commerce मध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून आलो होतो .त्यावेळचं  नाशिक फार लहान शहर होते.गोखले संस्थेच्या  कॉलेजचा परिसर गावापासून फार दूर वाटत असे.तेवढे एकच कॉलेज त्यावेळी गावात होते.HPT arts and science हे जुने कॉलेज होते . BYK college of commerce  नुकतेच सुरू झाले होते . सर्वजण सायकलीवर फिरत असत .बसने जाणे गैरसोयीचे होते .स्वयंचलित दुचाकी चारचाकी फारशा नव्हत्या .टांगा हेच वाहतुकीचे प्रमुख वाहन होते .सर्वजण सायकल वापरीत व प्रतिष्ठित किंवा सायकल न चालवता येणारी मंडळी टांगा वापरीत .पुण्यापासून मला सायकलीची सवय होतीच .मीही एक सायकल घेतली .छान चालले होते .स्कूटर घेण्याचा विचारही डोक्यात नव्हता .‍१९६६ मध्ये माझी नाशिकरोडला प्रमोशन मिळून बदली झाली . पहिली टर्म मी सायकल वरून जाऊन येऊन काढली .जाताना चढ असला  तरीही थंडीचे दिवस नाशिकची चांगली हवा यामुळे विशेष त्रास झाला नाही . दुसऱया टर्ममध्ये पाऊस व समोरून येणाऱा जोरदार वारा यामुळे सायकल चालवणे व कॉलेजमध्ये गेल्यावर लेक्चर्स घेणे शक्य नव्हते.त्यावेळी स्टॅन्ड भद्रकाली येथे होता .नाशिक रोडला जाणाऱ्या बस तेथून सुटत असत तर बाहेर गावच्या बस सीबीएस वरून सुटत .हल्लीचा जुना सीबीएस होण्याअगोदर तर भद्रकाली भाजी मार्केट जवळून सर्व बसेस शहरातील व बाहेरगावी जाणाऱ्या सुटत असत. भद्रकाली स्टॅण्ड जवळ एका ओळखीच्या ठिकाणी सायकल ठेवण्याची व्यवस्था केली . तेथून बसने नाशिक रोडला जाऊ लागलो .तेही वेळखाऊ व त्रासाचे होते . त्यामुळे स्कूटर घ्यावी असा विचार केला .

त्या वेळी हल्ली सारखी परिस्थिती नव्हती .मनात आले दुकानात गेले व   स्कूटर आणली.बँका फक्त उत्पादक कर्जे देत असत.उपभोग्य वस्तूंसाठी कर्ज मिळत नसे .गृह कर्जासाठी सुद्धा हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन नावाची मुंबईला एक सरकारी संस्था होती ती कडक अटीवर मर्यादित कर्जपुरवठा करीत असे. त्यामुळे गृहबांधणी ही फारच कमी प्रमाणात होती.पैसे साठवा व खर्च करा असा बाणा अशी अर्थव्यवस्था होती.ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत् हे त्याज्य  समजले जाई . स्कूटर मोटरसायकल उत्पादनावर नियंत्रण असल्यामुळे थोड्या संख्येने स्कूटर्स बाजारात येत असत .त्या वेळी नाशिकरोड कॉलेजमध्ये फक्त दोनच स्वयंचलित दुचाकी होत्या .माझी फँटॅबुलस व देवराज सरांची मोटारसायकल .डॉक्टर गाडगीळांची मोटार एवढीच वाहने होती .बाकी सर्व सायकलने किंवा बसने येत असत .बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे तीन चार हजार रुपये ते सुद्धा देणे फार कठीण होते .त्यावेळी मलाच चारशे साडेचारशे रुपये पगार होता .एवढी स्वस्ताई होती .उत्पादन नियंत्रण व कर्ज नियंत्रण यामुळे अॅटोमोबाइल मार्केट जवळजवळ नव्हतेच .  उत्पादक कंपन्या दोनच होत्या .स्कूटरसाठी अगोदर नंबर लावावा लागे.त्यासाठी थोडे डिपॉझिटही द्यावे लागे.लॅम्ब्रेटा व व्हेस्पा या दोन गाडय़ांमध्ये व्हेस्पाला जास्त मागणी असे.स्कूटर मिळण्यासाठी पाच पाच वर्षे ही लागत .निरनिराळ्या ठिकाणी एकाच कंपनीच्या गाडीसाठी उदारणार्थ वेस्पा नंबर लावायचे , गाडी मिळाल्यानंतर ती पैसे ऑन घेवून विकायची असा एक धंदाच होता .स्कूटर पहिले एक वर्ष विकता येत नसे.गाडीचे सर्व पेपर्स ज्याने विकत घेतली त्याच्या किंवा तिच्या नावावर असत.नंतर ती गाडी आपल्या नावावर करून घ्यावी लागे. तीन हजाराची व्हेस्पा स्कूटर  ऑन मनी देवून दहा हजारापर्यंत जात असे .पैसे व स्कूटर दोहोंचीही उपलब्धता असणे जरा बिकटच होते.पाच सात हजारापर्यंत पैसे उभे केले तरी स्कूटर उपलब्ध नव्हती.एका दुकानात नवी कोरी जरा वेगळ्या आकाराची स्कूटर चार हजार रुपयांपर्यंत मिळत होती .तिची किंमत जरी तीन हजार असली तरी तो चार हजार मागत होता .रॉयल एनफिल्ड कंपनीने ही स्कूटर बाजारात आणली होती .त्यासाठी नंबर वगैरे काही भानगड नव्हती .कंपनीचे नाव व स्वतःची निकड या दोन गोष्टी लक्षात घेऊन स्कूटर घेण्याचे ठरविले .तिचे नाव फँटॅबुलस् असे होते .गाडी छानच होती गिअर्स हातात नसून ते पायाने टाकावयाचे होते .इंग्लिश कंपनी असल्यामुळे ब्रेक डाव्या बाजूला  व रॉकिंग टाइप गिअर्स उजव्या बाजूला अशी रचना होती .पुढचे पायडल दाबले की पहिला गिअर पडे व खोटेने मागचे पायडल दाबल्यावर क्रमश:दोन तीन चार असे गिअर्स पडत .किक स्टार्ट व उजव्या हातांमध्ये गती नियंत्रक थ्रॉटल अशी रचना होती.फूट बोर्ड सपाट होता . तीन पायडल असल्यामुळे पायाजवळ सामान ठेवून जाता येत नसे एवढाच दोष होता. .त्या वेळी सेल्फ स्टार्ट गाड्या नव्हत्या .गाडी जड होती.सुरुवातीला वर्ष दोन वर्षे गाडीने मुळीच त्रास दिला नाही .ती गाडी वाटेल तिथे दुरुस्त होत नसे.ज्या दुकानात ती घेतली तिथे असलेला मेकॅनिकच ती दुरुस्त करू शकत असे .तो मेकॅनिक जिथेजिथे गेला तिथे तिथे माझी गाडी दुरुस्तीला जात असे .सर्व नाशिकमध्ये फँटॅबुलस ही एकमेव गाडी होती व ती मी फिरवित असे. १९७३/७४ पर्यंत ती गाडी माझ्याजवळ होती .शेवटी शेवटी ती गाडी फार त्रास देऊ लागली .एक दिवस मिसेससोबत जाताना त्या गाडीची चेसेस बरोबर मध्ये तुटली .आणि गाडी जी बसली ती बसलीच .गाडी बरोबर आरटीओच्या ऑफिस समोरच तुटली बसली.त्यावेळी आरटीओचे ऑफिस टिळकवाडी मध्ये होते.टिळकवाडीमधून त्र्यंबकरोडला जाताना ऑफिसवरून जावे लागे.सिव्हिल हॉस्पिटल ,गोल्फ क्लब  ग्राऊंड,पोहण्याचा तलाव , होण्या अगोदरची ही गोष्ट आहे .चेसिस वेल्डिंग करून जोडण्यात आले .परंतु गाडीचा बॅलेन्स गेला तो गेला .शेवटी ती गाडी येईल त्या किमतीला विकून टाकली .त्यावेळी सगळीकडे मी फँटॅबुलस मॅन म्हणून ओळखला जाई .ते पटवर्धन हो फँटॅबुलसवाले म्हणून उल्लेख केला जाई . त्या वेळी नाशि क फार लहान होते नाशिक व नाशिकरोड दोन अलग गावे होती.मध्ये आंबेडकर नगर छोटीशी कॉलनी व सिक्युरिटी प्रेस कॉलनी सोडली तर काहीही  वस्ती नव्हती . नाशिकमधला मी त्यांचा (फँटॅबुलस)बहुधा एकमेव ग्राहक होतो. आणखी एक गाडी गावांमध्ये आहे असे काही जणांकडून मी ऐकले परंतु ती गाडी मला कधी दिसली नाही .मी कोणाच्या ना अध्यात ना मध्यात .मी आणि माझे काम बरे असा स्वभाव परंतु त्या वैशिष्ट्यपूर्ण गाडीमुळे  मी नाशिकमध्ये त्यावेळी बराच प्रसिद्ध झालो होतो.गाडी विकल्यानंतर दहा पंधरा वर्षापर्यंत , दुसरीच गाडी माझ्याजवळ असूनही लोक मला फँटॅबुलस पटवर्धन म्हणून ओळखत !! एक्सलंट डिझायरेबल वंडरफुल असा यांचा अर्थ आहे !!.रॉयल एनफिल्ड सारख्या प्रसिद्ध ब्रँडला ,ज्यांच्या मोटर सायकली अजूनही प्रसिद्ध आहेत. मिलिटरीमध्ये त्याआजही वापरल्या जातात.लोकही मोठय़ा कौतुकाने ती गाडी लाखो रुपये देऊन घेतात . मोठाल्या लांबच्या टूरही करतात .अश्या ब्रॅण्डला स्कूटर का जमली नाही व त्यांनी ती ब्रँच का बंद केली काही कळत नाही.काही असो माझी ती गाडी आवडती होती .

पुन्हा आता काय करावे .येथून नाशिक रोडला रोज येणे जाणे कसे करावयाचे असा प्रश्न  शिल्लक होता . मी कोणत्याही गाडीसाठी नंबर लावलेला नव्हता.नाशिकमध्ये गाड्यांना नंबर लावता येत नसे . औरंगाबाद पुणे सातारा मुंबई येथे जाऊन डिपॉझिट भरून पेपर पूर्तता करुन नंबर लावावा लागे.एवढी भविष्यकाळाची चिंता व मेहनत घेण्याचा माझा स्वभाव नव्हता.असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ही माझी आवडती म्हण होती व आहे. त्या वेळी राजदूत मोटरसायकल्स प्रसिद्ध होत्या .त्यांनी स्कूटर काढली होती.तिचे रिपोर्टसही बरे होते .माझ्याजवळ दुसरा पर्यायही नव्हता .त्यामुळे मी राजदूत स्कुटर घेतली .ती सुमारे दहा वर्षे मी वापरली त्यानंतर तिला वारंवार दुरुस्ती लागत असल्यामुळे  ती विकून नवी स्कूटर घेणे भाग पडले .

अजूनही उत्पादन नियंत्रण व कर्ज नियंत्रण चालूच होते .अर्थव्यवस्था खुली नव्हती.परवाना राज चालू होते.वेस्पा नाव जाऊन आता ती गाडी बजाज १५० या नावाने मिळत होती .आॅन मनी प्रकरण चालूच होते.८३/८४ मध्ये ती गाडी तीन चार हजार रुपये अाॅन देऊन चौदा हजाराला घेतली .मी एकोणिसशे त्र्याण्णव मध्ये निवृत्त झालो. त्यानंतरही ती गाडी मी वापरीत असे.मुलाने स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यावरही सुरुवातीला तो काही वर्षे ती वापरीत असे .

गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात अर्थव्यवस्था खुली झाली व तिने एकदम प्रचंड वेग घेतला.उपभोग्य वस्तूंसाठी कर्ज मिळणे सुलभ झाले.

अनेक कंपन्या स्वयंचलित क्षेत्रात उतरल्या .चारचाकी व दोन चाकी गाडय़ांचे पेव फुटले .अनेक प्रकारच्या अनेक कंपन्यांच्या गाड्या बाजारात आल्या .टिकाऊ पेक्षा दिखावू प्रवृत्ती निर्माण झाली .पाच वर्षे गाडी टिकली म्हणजे खूप झाले .त्यानंतर नवी गाडी नवा ब्रॅण्ड असे सुरू झाले.प्राचार्यांजवळहि एकेकाळी चारचाकी नव्हती . अश्या परिस्थितीऐवजी प्राध्यापक मंडळी चारचाकीतून येऊ लागले व प्यून मंडळी तर स्वयंचलित दुचाकीवरून येऊ लागले . एवढेच नव्हे तर विद्यार्थिही चारचाकी व दुचाकीवरून येऊ  लागले.सायकली कुठेच दिसेनात . असल्यास रस्त्याने त्या चालवणे बिकट झाले.रस्ते लहान गाड्या पुष्कळ अशी परिस्थिती निर्माण झाली ट्रॅफिक जॅम होऊ लागला .सायकल चालवणे विद्यार्थ्यांना निदान कॉलेज विद्यार्थ्यांना तरी कमी पणाचे वाटू लागले .नाशिक शहर अस्ताव्यस्त प्रमाणात सर्व दिशांनी वाढले .काही प्रमाणात स्वयंचलित वाहन ही गरजेची गोष्ट झाली .दुचाकी स्वयंचलित वाहन ही अभिमानाची गोष्ट न राहता ते गरिबीचे लक्षण ठरू लागले.सोयीसाठी स्वयंचलित दुचाकी वाहन वापरले तरीही घरात एक चारचाकी पाहिजे अशी प्रवृत्ती निर्माण झाली .एवढेच नव्हे तर चारचाकीमध्ये जास्त उच्च ब्रॅण्ड पाहिजे असेही वाटू लागले .लोक चालणे व सायकल चालवणे विसरले .आता व्यायामासाठी ग्राऊंडवर लोकांची गर्दी होऊ लागली तर काहीजण व्यायाम म्हणून सायकल चालवू लागले .एके काळी सातपूरला इंडस्ट्रियल इस्टेटकडे सकाळी कामगारांचे थवेच्या थवे सायकलीवरून जात असत त्याऐवजी मोटारसायकली स्कूटर्स दिसू लागल्या .एखाद्याला सायकल चालवावयाची असली तरीही या गर्दीमुळे तिच्यावरून जाणे धोक्याचे ठरू लागले .टांगे अस्तंगत झाले . सायकलीही अस्तंगत झाल्या .  पुण्या खालोखाल सायकलींचे शहर हेही बिरुद नाहीसे झाले . बऱ्याच चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही आल्या.त्याला इलाज नाही कालाय तस्मैय नम:

३/८/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel