मी नाशिकला नोकरीला आल्यावर दोन मोठ्या सुट्या असल्यामुळे  व आई वडील कोकणात गुळे मुक्कामी असल्यामुळे, दोनदा गावी जाणे होई .ते इकडे आल्यावर स्वाभाविकच नियमितपणे जाणे कमी झाले .त्या वेळी रेल्वे नव्हती. खासगी बसेसही  नव्हत्या .स्लीपिंग कोच आरामदायी सीटस् एसी वगैरे काहीही नव्हते.एसटीच्या लाल गाड्या होत्या आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:ची मोटारही नव्हती .रात्रीच्याही गाड्या  नसत .सर्व प्रवास दिवसा करावा लागे.सर्व स्टॉप्सवर गाड्या थांबत असल्यामुळे प्रवास कंटाळवाणा त्रासदायक व वेळकाढू  होई.नाशिक ते रत्नागिरी अशी डायरेक्ट बस नव्हती .त्यामुळे व्हाया पुणे व्हाया कर्‍हाड किंवा व्हाया मुंबई जावे लागे .रिझर्वेशन शिवाय जाणे शक्य नसे.रिझर्व्हेशनसाठी एक अापण प्रत्यक्ष जाणे किंवा दुसऱ्याला पत्र पाठवून रिझर्व्हेशन करावयाला सांगणे एवढाच मार्ग उपलब्ध होता.निघाल्यापासून साधारणपणे तीन दिवस गुळ्याला पोहचण्यासाठी लागत असत .एक दिवस पुणे ,दुसरा दिवस रत्नागिरी व तिसरा दिवस गुळे, किंवा मुंबई वरूनही असाच मुंबई रत्नागिरी गुळे तीन दिवस लागत .दिवसाचा प्रवास गाडी तापलेली उन्हाच्या झळा माणसांचा कलकलाट धूळ अशा  थाटात प्रवास करावा लागे .लहान मूल बरोबर असेल तर आणखीच धांदल उडे.

प्रत्येक ठिकाणी सामानाची चढ उतार मोजदात हमाल टांगा किंवा  रिक्षा पाहणे या सगळ्यामध्ये स्वाभाविकपणे मनुष्य कातावून जाई.रत्नागिरी ते गुळे हा प्रवास आणखीच बिकट असे .प्रथम चालत किंवा सारवट (बैलगाडीला छानपैकी कव्हर करून व त्याला आत चढण्यासाठी दरवाजा करून त्याला खिडक्या ठेवून छानपैकी दिलेले रूप रत्नागिरीत टांगे कधीच नव्हते व रिक्षाही त्यावेळी नव्हत्या)  करून राजीवड्या वर यावे लागे.तिथून गरम वाळूमधून चालत होडी, नंतर पुन्हा वाळूमधून बसस्टँड, नंतर बसमधून पावस(गावाचे नाव) आल्यावर सामान स्वतः उचलून किंवा 

कोणाकडे तरी ठेवून चालत गुळे येथे जावे लागे. त्यासाठी एक डोंगर चढून उतरावा लागे .नंतर कोणीतरी पाठवून सामान आणावे लागे.परत जातांना जर पाऊस भरपूर असेल तर पावस गोळप येथील नद्या भरून वाहत असत व गोळपपर्यंत चालत जावे लागे  एकूण हाल त्रास कष्ट  यातना याशिवाय .प्रवास पार पडत नसे. घरी जाण्याच्या आनंदा पुढे त्याचे काहीच वाटत नसे.हल्लीचा सुखदायक प्रवास पाहिल्यावर तो आता कष्टमय भासतो त्यावेळी प्रवास म्हणजे हे असेच असायचे अशी ठाम समजूत होती .त्यामुळे त्रास होत नसे शेवटी शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रासच जास्त वैताग आणतो .कधी काळी गुळ्यापर्यंत मोटार जाईल व आपण मोटारीतून पाय घरात ठेवू असे स्वप्नात सुद्धा आले नव्हते.

आतेभाऊ  कर्‍हाड येथे असल्यामुळे केव्हातरी कऱ्हाड वरून जाणे होई . मुंबई येथून जाताना बॉम्बे सेंट्रल किंवा ठाणे येथे बसावे लागे .कुणाकडे तरी उतरणे ट्रेनचा प्रवास किंवा टॅक्सी एकूण  चांगलीच हबेलंडी उडे. प्रत्येक ठिकाणी कोणाकडे तरी उतरावे लागे. सामान उलगडणे व पुन:काही न विसरता पॅक करणे म्हणजे एक मोठी कसरतच असे .अर्थात आपली माणसे भेटत गप्पा होत स्नेह बंधने जास्त दृढ होत .अर्थात काही वेळा काही ठिकाणी आपले आगमन स्वागतार्ह नसे तो भाग वेगळा .अशा वेळी आम्ही पुन्हा तिथे जाणे टाळत असू.

बोटीने जाणे म्हणजे आणखी एक मोठी कसरत असे .व्ही.टी.ला जाऊन टॅक्सी करून भाऊचा धक्का किंवा एकदम टॅक्सीने भाऊचा धक्का .बोटीमध्ये केबिन नसत एक मोठा हॉल असे त्यामध्ये पथारी टाकून बसावे लागे.काही जणांना बोट लागत असे त्यामुळे दुर्गंधी सुटे .खारा वारा घाम बोटीमधील हॉटेलमधून येणाऱा अन्नाचा वास आणि इतर असंख्य प्रकारचे वास यामुळे डोके उठून जाई .रत्नागिरीला धक्का नव्हता बोट लांब समुद्रात उभी राही. तिला खपाटे(रुंद होडी) येऊन लागत. खपाटे व बोट सतत हालत असे .बोटीला शिडी अडकवलेली असे त्यावरून उतरून खपाट्यात यावे लागे .खलाशी एकेकाला धरून खेचत परंतु खपाटा व बोट यांमध्ये आपण पडणार किंवा चिरडणार नाही ना अशी सतत भीती वाटत राही .एका मार्गापेक्षा दुसरा मार्ग बरा असे प्रत्येक वेळी  वाटत राही .पूर्वीच्या लोकांनी अप्रवास गमनं सुख:असे का म्हटले ते लक्षात येई .असा प्रवास वर्षातून दोनदा होई सवईमुळे त्याचे काही विशेष वाटत नसे.

आता सर्वत्र चांगले रस्ते पूल झालेले आहेत रेल्वेही कोकणात गेली आहे सकाळी नाशिकरोड येथे बसले की संध्याकाळी गुळे येथे पोचता येते.मोटारीनेही सकाळी निघून संध्याकाळी पोचता येते.तीन दिवसांचा प्रवास दुसऱ्यांच्या घरी उतरल्यामुळे त्यांना व आपल्याला होणारी गैरसोय   यातील आता काहीच उरले नाही .तरीही वयामुळे  कोकणात जाणे होत नाही .

प्रवासातील काही आठवणी 

रत्नागिरीहून निघताना एकदा बोट उशिरा आल्यामुळे जवळचे दूध नासून गेले .आमची तीन वर्षांची मुलगी भुकेने जोरजोरात रडू लागली. बोटीवरील कॅन्टीनमधील सर्व अन्न संपून गेले होते कारण बोटीला उशिर झाला होता .सुदैवाने कॅन्टीनमधील एक मुलगा ओळखीचा निघाला. त्याने थोडेसे दूध दिले व आमची मुलगी शांत झाली .दुसऱ्या दिवशी आमचे कॉलेज सुरू होते त्यामुळे आम्हाला त्याच दिवशी नाशिकला पोहोचणे आवश्यक होते .बोट सकाळी यावयाची त्याऐवजी दुपारनंतर मुंबईला आली .त्यानंतर दादरला आमच्या काकांकडे यायला जवळजवळ चार वाजले.आम्ही रात्री नाशिकला जाण्यासाठी ट्रेनने निघालो  चुलत भाऊ ट्रेनवर सोडण्यासाठी आला होता .ट्रेनला खूप गर्दी होती .आम्ही  रिझर्वेशनच्या  डब्यात चढलो  नाशिक म्हटल्यावर कंडक्टर थोडे जादा पैसे घेऊन जाऊ देईल असे वाटले होते .कंडक्टर काहीही ऐकायला तयार नव्हता. त्या वेळी गाडीचे डबे एकमेकांना जोडलेले नसत.त्याने आम्हाला चालत्या गाडीतून जबरीने उतरवून दिले .घाईने उतरताना आमचा होल्डाॅल ज्यात तपासलेले पेपर्स होते तो गाडीत राहिला .मोठी पंचाईत होती नोकरीला मोठा डाग लागला असता .ती गाडी पुढे कल्याणला थांबणार होती. आम्ही पटकन निर्णय घेऊन तो व मी कंट्रोलरच्या ऑफिसमध्ये गेलो .त्याला सर्व हकीगत सांगितली .त्याने लगेच  फोन करून कोणत्या डब्यात कुठे कोणती वस्तू राहिली आहे ते मला विचारून बरोबर सांगितले.वो तो होल्डाॅल काढून ऑफिसमध्ये कल्याणला नेऊन ठेवण्यास सांगितले .आम्ही मागच्या गाडीने कल्याणला पोचलो.चांगली जागा मिळालेली असूनही आम्ही लगेच प्लॅटफॉर्मवर सामानासह उतरलो .चुलत भाऊ आमच्या बरोबर कल्याणपर्यंत आला .आम्ही लगेच धावत जाऊन कल्याण ऑफिसमध्ये चौकशी केली. सुदैवाने आमचा होल्डाॅल बरोबर काढून ऑफिसमध्ये अाणला होता.ओळख पटवून त्याने आम्हाला  तो होल्डॅाल लगेच दिला. त्यानंतर त्याच गाडीतून त्याच सीट्सवर बसून आम्ही नाशिकला मध्यरात्रीनंतर केव्हा तरी पोहोचलो . रेल्वेची कार्यतत्परता बघून आम्ही अचंबित झालो .त्यानंतर आत्तापर्यंत जवळजवळ सर्व भारताचा प्रवास झाला परंतु सुदैवाने कुठे काही हरवले राहिले असे झाले नाही .

आणखी एक प्रवासातील असाच लक्षात राहणारा प्रसंग . कोकणात जात असताना आंबा घाट उतरल्याबरोबर आमची दोन वर्षांची मुलगी मोठमोठ्याने रडू लागली .गाडीतील सहप्रवासी तिचे रडू थांबवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते .ती काही केल्या थांबत नव्हती .

पत्नीच्या लक्षात तिच्या रडण्याचे कारण अाले.फ्रॉक काढल्याबरोबर तिचे उकडणे व गुदमरणे थांबून ती लगेच हसायला लागली  .घाटावरील कोरड्या हवेतून एकदम सर्द हवेत आल्ल्यावर जीव घाबरणे स्वाभाविक होते.आमचाही जीव घाबरला होता आम्हालाही रडावे असे वाटत होते !!! लहान मुलीने मोकळेपणाने भावनांचा अविष्कार केला .आम्ही मात्र गुपचूप बसून होतो . 

१५/६/२०१८ ©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel