वास्तुशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे. अगदी पौराणिक युगापासून ते प्रचलित आहे. भृगऋषी, अत्रिऋषी, वसीष्ठ ऋषी, विश्वकर्मा, मय, शौनक हे त्या युगातील वास्तुशास्त्राचे महान अभ्यासक आणि जनक होते. या महान ऋषींनी ग्रंथ लिहून ठेवले आहेत. अठरा पुराणांपैकी नऊ पुराणे, मानस, विश्वकर्माप्रकाश, बृहत्संहिता, वास्तुरत्नावली, मयमत हे ग्रंथ वास्तुशास्त्राचे आद्यग्रंथ आहेत.
हजारो वर्षांपूर्वीच्या या अनुभवसिद्ध शास्त्राची तुलना जेव्हा जेमतेम शे दोनशे वर्ष जुन्या अपुऱ्या माहितीवर आधारित वैज्ञानिक प्रयोगांवर होते तेव्हा अज्ञानाचे पितळ उघडे पडते. काही ‘तज्ज्ञ मंडळी’ या सिध्द असलेल्या शास्त्राची थट्टा करतात तेव्हा त्यांच्या विद्वत्तेची कीव करावीशी वाटते. याउलट काही दीडशहाणी अभ्यासू मंडळी आपले वारसा असलेले हे शास्त्र सोडून देऊन विलायती शास्त्रांच्या मागे धावून ‘प्रगती’ होते आहे असे भासवतात.
वास्तुशास्त्र हे अनुभवांवर आधारित आहे. प्राचीन काळापासून या अनुभवांचा परामर्श घेऊनच गाव, शहर, घर, मंदिर आणि राजप्रसाद निर्माण करत असत आणि नक्कीच ते सर्वजण आजच्या काळातील लोकांपेक्षा जास्त सुखी होते, आणि समृद्ध होते. त्यांचे आरोग्यही निरामय असायचे. कारण त्यांना मन:शांती प्राप्त होती.
पण आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात जो तो भरधाव वेगाने धावत सुटला आहे. पूर्वीच्या काळातील विद्वान महर्षींनी संशोधनाने प्रमाणित केलेल्या या शास्त्राची या कलियुगात मात्र मस्करी होत आहे. आपण आपल्या हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावत आहोत. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण व अतिशहाणपणा याचा हा परिणाम आहे.
वास्तुशास्त्राचे नियम जो कोणी अंमलात आणेल त्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि मन:शांती यांचा लाभ होईल. प्राचीन ऋषिमुनींनी हा आपल्याला दिलेला बहुमोल ठेवा एक प्रकारे त्यांचा आशीर्वादच आहे. हे शास्त्र सूत्रबद्ध आहे आणि ज्ञानाने परिपूर्ण आहे.
पंचमहाभूते निसर्गात सर्वत्र आहेत, वास्तूत देखील हि पंचमहाभूते वास करून असतात आणि मानवाच्या शरीरातही पंचमहाभूते असतात. या पाचही तत्त्वांचे अनुकूल प्रमाणात संतुलन होते तेव्हा जीवनात सकारात्मक घटना घडतात. निसर्ग हा वास्तूशी जोडलेला असतो. आणि वास्तू ही मानवाशी जोडलेली असते. हे संतुलन जेव्हा बिघडते तेव्हा मनुष्याला दोष आणि दु:ख यांना सामोरे जावे लागते, नैराश्य येते, अपयश येते, शरीराला निरनिराळे विकार जडतात.