परन्तु आपल्या सभापरिषदांतून काय दिसतें ? आपल्या सर्व जीवनाची आज उलटापाल झालेली दिसून येते. इंग्रजी शिकलेले तेवढे आपले असें वाटूं लागलें आहे. शिकलेल्यांची एक स्वतंत्र जात जणुं आपण बनवितों. परन्तु जोंपर्येन्त लहानापासून थोरापर्यन्त, रावापासून रंकापर्यन्त, सर्व समाजाशीं आपण एकरुप होत नाही तोंपर्यन्त राजकारण म्हणजे केवळ बडबड आहे. आपल्या चर्चांतून बहुजनसमाज वगळला जातो. त्यांच्यांत आणि आपल्यांत एक प्रचण्ड पहाडच जणुं आपण उभा केला आहे. इंग्लंडचें हृदय जिंकून घेण्याचे आपण प्रथमापासून प्रयत्न चालविले. तितकेच प्रयत्न जर स्वजनांचे हृदय जिंकण्यासाठी केले तर ? इंग्लंडचे हृदय जिंकण्यापेक्षा आपल्या स्वदेशाचेंच हृदय जिंकणे हीच गोष्ट अधिक मोलाची व महत्त्वाची आहे.

सर्व जनतेच्या हृदयाचें ऐक्य करणें हें राजकीय आकांक्षाचें अंतिम ध्येय आहे. परकीयांचे हृदय जिंकून घेण्यासाठी केलेल्या खटपटींना राजकारण नांव देणे, असला प्रकार या आपल्या दुर्दैवी व अभागी देशांतच फक्त पहावयास मिळेल ! स्वजनांचे हृदय जिंकणे हे पहिलें कर्तव्य आहे. हें खंरें राजकारण. आणि यासाठी सर्व परकी पद्धतीचा आपण त्याग केला पाहिजे. आपल्या सर्व व्यवहारांत परकी पद्धतीचें स्तोम माजलें आहे. अशानें स्वजनांच्या हृदयाजवळ जाता येणार नाही. मायभूमीच्या हृदयाशीं घेऊन जाणारे ते जुने स्वदेशी मार्ग सुदैवानें अद्याप मोकळे आहेत. ते मार्ग पुन्हां आपलेसे करुं या.

आपला संदेह जर सर्व देशाला आपणांस द्यावयाचा होता तर त्यासाठीं काय केलें पाहिजे होतें ? इंग्रजी पद्धतीच्या टेबल खुच्याच्या परिषदा भरविण्यांऐवजी आपण मोठमोठे मेळे भरविले असते. या मेळ्यांतून गाणी, खेळ, उत्सव, प्रवचनें, कीर्तने, कुत्स्या वगैरेंचा अंतर्भाव केला असता. खड्यापाड्यांतून हजारों लोक तेथें धांवून आले असते. त्या ठिकाणी बाजार भरविले असते, प्रदर्शने मांडलीं असती, शेंकडो स्वदेशी वस्तु ठेविल्या असत्या. कवि, चित्रकार, शाहीर, यांना तेथें बक्षिसें ठेवलीं असतीं. सर्व राष्ट्रांत त्यांचा गोरव केला असता. आरोग्याचीं, सदीप व्याख्यानें करविली असतीं. शेतकीच्या गोष्टी सांगितल्या असत्या. स्वभाषेंत राष्ट्रहितासंबंधींच्या नाना प्रश्नांचा खल केला असता.

आपले कोट्यावधि बंधू खेड्यांतून पसरलेले आहेत. खेड्यांतील जनतेची बाहेरच्या विशाल जीवनाविषयीं असलेलीं तहानभूक या मेळ्यांच्या द्वारे तृप्त केली जाई. मेळ्यांतून बाहेरचें विविध असे वाढते, विराट् जीवन त्यांना दिसे. खेड्याने मेळा बोलावणे म्हणजे बाहेरच्या विशाल जगाला आपल्या चंद्रमाळी झोपडींत आमंत्रण देणें होय. खेड्यांत असा मेळा भरला म्हणजे जनतेचे हृदय उचंबळे. संकुचितपाणा नाहीसा होई. बाहेरच्या जगाच्या स्वागतार्थ सारें खेडें एका दिलाने उभे राही. पावसाळ्यामध्ये नद्या, नाले, ओहोळ भरून जाऊन एकमेकांस भेटतात. त्याप्रमाणे महान् मेळ्याचे प्रसंगी खेड्यांतील जनता आपसांत एक होऊन या विश्वगंगेस मिळे.

मेळी ही आपल्या देशांतील अभिजात अशी संस्था आहे. टेबलखुच्याची कोरडी सभा बोलाविली तर अनेकांना शंका व संशय येतात. जनतेची अंतःकरणे तेथे चटकन् फुलत नाहींत. परन्तु मेळे पहावयास येणारे मोकळ्या मनाने येतात. संशय दूर राहतात. हिंदुस्तानांत असा एकहि जिल्हा नाही कीं ज्यांत निरनिराळ्या वेळी वर्षांतील निरनिराळ्या दिवशी योग्य अशा ठिकाणी मेळे भरत नाहींत. शेकडो ठिकाणी यात्रा भरतात. त्यांच्या वेळा व त्यांची स्थाने यांचे टिपण आपणाजवळ हवे. या यात्रांच्या मार्गाने, तेथील मेळ्यांच्या मार्गाने बहुजनसमाजाच्या हृदयांत आपण शिरलें पाहिजे. या मार्गाचा आपण शीघ्र स्वीकर करु या. पुढारी जर कोरड्या व पोकळ राजकारणाचा शपथपूर्वक त्याग करुन या यात्रांतून व मेळ्यांतून नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन ध्येये घेऊन जातील तर नव चैतन्य उत्पन्न होऊन राष्ट्राची फार लौकर जागृति होईल. या मेळ्यांतून हिंदुमुस्लिम ऐक्य, अस्पृश्योद्धार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, गायराने, इत्यादि लहानमोठ्या गोष्टीसंबंधी संवाद करतील, गाणीं रचतील, तर हां हां म्हणतां राष्ट्र उभे राहिल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel