आपल्यांतील काही सुशिक्षितांना वाटत की हिंदुस्थानांतील अनेक जाति, धर्म व पंथ यांच्यांत जे ऐक्य घडवून आणावयाचे आहे, ते केवळ राजकीय सत्ता मिळविण्यासाठी म्हणून होय. परन्तु असे मानण्याने मोठ्या वस्तुला आपण लहान वस्तूची पूरक बनवित आहो ! आपण पुष्कळ वेळा असे करतो. परन्तु आपल्या ऐक्याने जे साधणार आहे किंवा मिळणार आहे, त्यापेक्षा ऐक्य ही कितीतरी अधिक मोलाची वस्तु आहे. ऐक्य हेंच मानवजातीचे खरे कार्य आहे. यातंच सर्व परिश्रमांची परिसमासि व्हावयाची आहे. आपणांमध्ये ऐक्य होत नाही. याचे कारण आपल्यांत मूळातच कोठेतरी महान् दोष असला पाहिजे. आणि त्यामुळे जिकडेतिकडे आपणांस आपल्या शक्तीचा अभाव दिसून येतो. आपल्याच पापाने आपला धर्म नष्ट होतो. व धर्म नष्ट झाला म्हणजे सर्वनाशाहि निश्चित.

सत्यधर्माला डोळ्यांसमोर ठेवून जर ऐक्याचे प्रयत्न आपण करू, तर ते यशस्वी होतील. मुत्सद्देगिरीने व आपमतलबीपणाने हे ऐक्य निर्माण करता येणार नाही. संकुचित व क्षुद्र वातावरणांत सत्य व न्याय्य गोष्टी जगूच शकत नाहीत. तात्पुरती गरज काय, इकडे सत्याचे लक्ष नसत. आपल्या वर्तनाचा सत्य जर ध्रुव तारा होईल, तर आपल्या प्रयत्नांत केवळ हिंदुस्थानांतलच निरनिराळे पंथ व जाती सामील होतील असे नाही तर या सत्कर्मास इंग्रजहि हातभार लावतील.

असे जर आहे तर मग आज इंग्रज व हिंदी, सुशिक्षित व अशिक्षित ही जी द्वैते दिसतात, हे जे विरोध दिसतात, त्यांचे काय करावयाचे ? हे विरोध का केवळ काल्पनिक आहेत ? या विरोधांचे मुळाशी का काहीच सत्य नाही ? भारतीय इतिहासांत आज पर्यंत ज्या अनंत घडामोडी झाल्या, ज्या अनेक क्रियाप्रतिक्रिया झाल्या, त्या सर्वांपेक्षा हा प्रस्तुतचा विरोध का काही वेगळा आहे ? या विरोधाचे स्वरूप तरी काय ? ते समजून नको का घ्यावयाला ?

आपल्या धार्मिक वाङमयांत विरोध हाहि एक भक्तीचा प्रकार मानला आहे. रावणाने जी लढायी केली, तिनेच त्याला मोक्ष मिळाला. याचा अर्थ हा की सत्याशी पुरुषार्थपूर्वक झगडा करून शेवटी आपला पराजय मान्य करणे, म्हणजेच सत्याशी अधिक यथार्थपणे एकरूप होणे होय. ताबडतोब एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणारा ताबडतोब ती गोष्ट सोडीलही. असला स्वीकार खरा स्वीकार नव्हे. यासाठीच सर्व शास्त्रे संशयावर उभारतात. शंका घ्यावयाची व तिचे निरसन करावयाचे. शास्त्राचा जन्म संशयांत आहे. स्वतःच्या सर्व शंका आशंका फेडून घेऊन मग एखाद्या तत्त्वाचा जेव्हा आपण स्वीकार करतो, तेव्हा ते मग एकाएकी आपण सोडीत नाही.

पाश्चिमात्यांशी संबंध येताच आपण स्वतःची सारी विवेकशक्ति गुंडाळून ठेवून जे जे पाश्चिमात्यांचे दिसेल ते ते मूर्खपणे, भिका-याप्रमाणे, अधाशासारखं घेत सुटलो. परन्तु अशा घेण्याने खरे हित होत नाही. ज्ञान असो वा राजकीय हक्क असोत. कष्टाने प्राप्त करून घेतले पाहिजे. विरोधी शक्तीशी यशस्वी रीतीने झगडून या वस्तू मिळवायच्या असतात. स्वातंत्र्याची वा ज्ञानाची जर कोणी आपणांस भीक घातली तर त्या वस्तूंबद्दल आपणांस अभिमान वाटणार नाही. झोळीत मिळालेल्या तुकड्यांबद्दल का अभिमान वाटतो? भिक्षांदेहीचे स्वातंत्र्य आपल्या ख-या मालकीचे होणार नाही. वाटेल तो येईल व थोबाडीत मारून ही झोळी हिरावून नेईल. स्वतःला लाचार करून काही मिळवणे यात काय पुरुषार्थ ? ज्यांत आपली मानखंडना आहे, अशा स्वरूपांत कोणतीहि वस्तु स्वीकारणे यात काही अर्थ नाही. त्यांत आपले नुकसान आहे, नाश आहे. आणि हे जाणूनच युरोप व युरोपची ध्येये यांच्याशी आपण झगडत आहोत. आपला अभिमान खंडित झाला आहे व म्हणून पुन्हा आपल्या घरांत परत येऊन आपण बसलो आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel