जहालपणाविषयी एक गोष्ट अशी आहे की जहालपणा लौकर निर्माण होतो, परन्तु तो कह्यांत ठेवणे कठीण असते. आपले राज्यकर्तेहि जहाल आहेत. परन्तु यामुळेच त्यांचा अंत होणार आहे. त्यांच्या लक्षांत अजून ते आले नाही. हिंदुस्थानांत खालचे अधिकारी जे अत्याचार व जुलूम करतात, ते कदाचित् वरिष्ठ सरकारला संमतहि नसतील. खालचेच बेजबाबदार लोक विकारशील असल्यामुळे अतिरेक करित असतात.
हे जसे सरकारचे बाजूने म्हणता येईल, तसेच लोकांच्याहि बाजूने म्हणता येईल. जहालांनी अत्याचार केले असे म्हटले म्हणजे कोणत्या पुढा-याला दोष द्यावा हे कळत नाही. ते अत्याचार, तो अतिरेक जहाल पुढा-यांस मान्यहि नसेल. हे सारे बेशिस्त प्रकार विकारवश व उतावळ्या अनुयायांकडून होतात. कारण त्यांना जबाबदारीची जाणीव नसते. शिवाय नेमस्त व जहाल या विभागणीच्या रेषा सरकारने स्वतःसाठी आखल्या आहेत. त्याचीच री आपण काय म्हणून ओढावी ?
जहालांचा असा विशिष्ट पक्ष देशांत नाही की जो खड्याप्रमाणे निराळा काढून सरकारने चिरडून टाकावा. राष्ट्रीय चळवळीच्या ह्या खुणा आहेत. आणि जो पर्यंत देशांत दुःख व दारिद्र्य आहे, दास्य व असंतोष आहे, तोपर्यंत सरकारने राष्ट्रीय चळवळ कितीही दाबली व दडपली तरी या ना रुपाने ती पेटतच राहणार ! किंवा योग्य संधीची वाट पहात राष्ट्राच्या पोटांतच घुमसत राहणार. ती मरणार नाही.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे होणा-या या सहज गोष्टीवर “ह्या काही विशिष्ट पंथाच्या आहेत” असा शिक्का कोणी मारतात. कारण त्या त्यांना नको असतात. १८ व्या शतकात युरोपमध्ये धर्म म्हणजे पोटभरू स्वार्थी लोकांनी निर्मिलेले थोतांड असा धर्मावर शिक्का मारला गेला. आपल्याकडेहि हिंदुधर्म काही ब्राह्मणांनी पोटासाठी निर्माण केला, त्यांना हद्दपार करा, असे काही म्हणतात. त्याचप्रमाणे जहालपणाहि कोठे तरी गुप्त प्रयोगशाळेत निर्माण होत आहे, त्याच्या मुळाशी काही असंतुष्ट गुंड आहेत, त्यांचे पुढारी न्यायासनासमोर खेचून ही चळवळ दडपून टाकावी असे ह्या सरकारलाहि वाटू लागले आहे.
असे करण्यांत सरकारला काय वाटत असेल ते वाटो. परन्तु सरकारप्रमाणेच आपणहि बरळू लागू नये व शिक्के मारीत सुटू नये. आपण जरा खोल पहाण्याचा प्रयत्न करावा. आज दळणवळण वाढले आहे. दूरचे प्रांत जवळ आले आहेत. सरकार आज एक आहे. आपण राष्ट्राचा इतिहास अभ्यासून राहिलो आहोत. राष्ट्रीयसेभेचे जोराचे प्रयत्न चालू आहेत. ह्या सर्व गोष्टींमुळे हे राष्ट्र एक आहे, हा देश एक आहे, असे दिव्य विचार मधूमधून आपल्या हृदयाकाशांत प्रकट होऊ लागले आहेत. सुखदुःखात आपण सारे भारतवासी एक, आपले भवितव्य एक, ध्येय एक, असे विचार मनांत येत आहेत. अशा वेळी प्रेमाची व स्नेहाची बंधने अधिक बळकट करून जर आपण परस्परांस अधिक एकत्र आणणार नाही तर हे उत्पन्न होणारे मंगल विचार पुन्हा मावळतील. आणि मग ध्येयभूत राष्ट्रीय ऐक्य कसे व्हावयाचे ? ऐक्याची भावना दृढमूल करण्यासाठी आपण कायावाचामने प्रयत्न चालवले नाहीत. ऐक्याची भावना निर्माण करण्यांत आपले हृदय नाही व नव्हते. हे कठोर व कटु सत्य जितक्या लौकर आपण साक्षात्कारू तितके अधिक चांगले.
सत्याच्या अविष्कार आश्चर्यकारक असतो. सत्य आश्चर्यकारक रीतीने प्रकट होत असते. एके काळी जे विचार मोठेमोठे लोक सांगत होते, परन्तु ज्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही, तेच विचार आज सामान्य लोकांच्याहि बोलण्यांत प्रकट होत आहेत. प्रत्येक जण दुस-याला म्हणत आहे “होय हे खरे आहे, नाही का रे ? गुलामगिरीपेक्षा स्वावलंबन व कष्ट यांत श्रेष्ठपणा आहे. तुला नाही असे वाटत ?” नोकरीशिवाय ज्यांना काही दिसत नसे, त्यांनी वरील उद्गार काढावे हे आश्चर्य नाही का ? श्रीमंताचा मुलगा विणकाम शिकायला जातो ; सभ्य गृहस्थाचा मुलगा कपड्याचे गांठोडे डोक्यावर घेऊन फेरीला निघतो ; ब्राम्हणाचा मुलगा अभिमानाने नांगर धरतो ; हा चमत्कार नाही का ? पूर्वी केवळ शब्द कोणाला पटत नव्हते. परन्तु सत्याचे दर्शन होताच कृति होऊ लागली. सत्यदर्शन विजयी असते.