निबंध ४ था.
विशाल भारतात पूर्व-पश्चिमेचा संगम.


हिंदुस्थानचा इतिहास म्हणजे कोणत्या लोकांचा इतिहास ? श्वेतवर्णी आर्य हिंदुस्थानांत आले, त्या वेळेपासून या देशाच्या इतिहासास सुरुवात होते. निसर्गाचे व मानवाचे सारे अडथळे दूर करून विजयी आर्यांनी भारतांत प्रवेश केला. अफाट जंगले त्यांनी तोडली. तेथील भूमी धनधन्याने फुलविली. त्यांच्या श्रमाने व कौशल्याने हिंदी संस्कृतीचा पाया घातला गेला. असे जे ते पहिले आर्य, त्यांनाहि “हिंदुस्थान हा फक्त आमचाच” असे म्हणता येणार नाही.

आर्य व अनार्य परस्परांत मिसळून गेले. विजयी आर्यांनी अनार्य कुमारिकांजवळ लग्ने केली. पुढे बुद्ध काळात तर जास्तच सरमिसळ झाली. मग जेव्हा ब्राह्मणसमाज आपल्या पडलेल्या भिंती पुन्हा दुरुस्त करू लागला तेव्हा त्यांनी त्या भिंती फारच दुर्भेद्य अशा केल्या. त्या पुनर्घटनेच्या काळांत ब्राह्मणांना अनेक गोष्टी दिसून आल्या. देशाच्या काही भागांत वैदिक विधि वगैरे करावयास शुद्ध बीजाचे ब्राह्मण उरलेच नव्हते. त्या भागात जरूर पडे तेव्हा अन्य भागांतून ब्राह्मण बोलावले जात, किंवा यज्ञोपवीते देऊन नवीन ब्राह्मण निर्माण करावे लागत. पूर्वी ब्राह्मण हे श्वेतवर्णी होते. परन्तु त्यांचा श्वेतवर्ण जाऊन ते पिगट वर्णाचे बनले. तसेच या नवीन सामाजिक रचनेत शूद्रांचाहि समावेश झाला. त्यांची दैवते, त्यांच्या चालीरीती, त्यांची ध्येये यांना सामाजिक पुनर्घटनेत स्थान मिळाले. अशा प्रकारे बृहद्भारत बनला. मोठा हिंदू समाज तयार झाला. वेदकाळातील आर्यांच्या समाजापेक्षा हा नवसमाज पुष्कळच बाबतीत भिन्न होता.

आर्य व अनार्य यांच्या संमिश्रणाने बनलेला जो हा मोठा समाज, त्या हिंदुसमाजाचा इतिहास म्हणजेच हिंदुस्थानचा इतिहास अशी मर्यादा घालता येईल का ? हिंदूचा इतिहास म्हणजेच हिंदुस्थानचा इतिहास असे छातीठोकपणे म्हणण्याची संधी देवाने आपणांस दिली आहे का ? नाही. कारण या हिंदु हिंदुस्थानांत रजपूत लोक अटीतटीने व ईर्षेने आपसांत भांडत असताना ज्या फटी उत्पन्न झाल्या, त्यांतून मुसलमानांचे लोंढे आत घुसले व ते सर्व देशभर पसरले. या हिंद भूमीवर जगून व येथेच मरून ती भूमि त्यांनीहि आपलीशी केली आहे. आता जर कोणी ओरडून म्हटले की “थांबा, आता तरी पुरे करा. हिंदूस्थानचा इतिहास म्हणजे हिंदु मुसलमानांचा इतिहास. कबूल.” तर तेहि सत्य नाही. परमात्मा मानव जातीचा इतिहास सारखा वाढवून राहिला आहे, रंगवून राहिला आहे. तो थोर विश्वकर्मा तुमच्या आमच्या अहंकारतृप्तीसादी स्वतःचे बेत व योजना का बदलणार आहे ?

हिंदुस्थान तुमचा आहे की माझा आहे  ; हिंदूचा जास्त की मुसलमानांचा जास्त ; का आणखी तिसरेच कोणी येऊन त्याच्यावर हक्क सांगतात ; ह्या गोष्टीशी सृष्टीचा इतिहास घडविणा-या त्या परमात्म्यास काही एक करावयाचे नाही. त्याच्या सिंहासनासमोर हिंदु, मुसलमान, पाश्चिमात्य, सर्वांनी आपापली बाजू मांडावी व ज्याच्या बाजूने न्याय मिळेल त्याने आपला विजयध्वज येथे रोवावा, असे ह्या प्रश्नाचे स्वरुप नाही. परस्परविरोधी समाजाचा हा झगडा आहे असे जे आपण मानतो, ती आपली चूक आहे. तो खोटा अभिमान आहे. झगडा जो आहे, तो सत्य व असत्य याचा आहे. अनादि काळापासून जे दैवी आहे. त्याचा जे आसुरी आहे त्याच्याजवळ सारखा झगडा सुरू आहे. झगडा समाजाचा नसून तत्त्वांचा आहे. जगातील झगड्याचे हे असे आंतर स्वरूप आहे.

आपण परिपूर्णतेचे शेवटचे म्हणून जे ध्येय ठरविणार, त्याचा संबंध सर्वात्मकतेशीच असणार. प्रत्येक अडथळा व विरोध यांतून मार्ग काढीत पूर्णता चालली आहे. पुढे जात आहे. पूर्णतेची जी ही प्रगति होत आहे, सत्याची जी ही धडपड चालली आहे, तिच्याशी ज्या मानाने आपण आपले प्रयत्न एकरूप करू, त्या मानाने आपल्या प्रयत्नास यश येण्याचा संभव आहे. तुमचे प्रयत्न परिपूर्णतेच्या प्रगतिपर ध्येयाशी एकरूप नसतील तर ते अपयशी होतील. आपले तेवढेच घोडे पुढे दामटावयाचे, दुस-याचे काही का होईना अशा प्रकारचे प्रयत्न व्यक्ति, व्यक्तींनी बनलेली राष्ट्रे जर करतील, तर त्या प्रयत्नांना ईश्वराच्या कार्ययोजनेत स्थान नाही. अलेक्झांडरला सारा ग्रीस देश स्वतःच्या सत्तेखाली आणता आला नाही व त्याची महत्त्वाकांक्षा सफळ झाली नाही. अलेक्झांडरची इच्छा विफळ झालेली दिसावयास मर्त्यलोकी काही काळ लागला ; परन्तु ईश्वराच्या घरी ती महत्त्वाकांक्षा अलेक्झांडरने मनात धरताच त्याज्य ठरविली गेली होती. कारण त्याच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्णतेने जगाच्या हितात, जगाच्या मंगलात का भर घातली जाणार होती ? तसेच रोमन लोकांना जागतिक साम्राज्य स्थापावयाचे होते. परन्तु रानटी लोकांनी त्यांच्या आशा धुळीत मिळविल्या. रोमचा गर्व मातीत गेला. परन्तु त्यासाठी जग अश्रु ढाळीत बसले नाही. रोमन सामाज्र्य जगभर झाल्याने जग का सुखी झाले असते ? रोमन साम्राज्याचा जगाच्या सुखाशी काय संबंध होता ? ग्रीक व रोमन लोकांत जे थोडे फार चांगले होते, ते काळपुरुषाने आपल्या गलबतांना घेतले आहे, परन्तु ग्रीक व रोमन लोकांना त्याने गलबतांत घेतले नाही. आणि त्यामुळे गलबताचे काही एक नुकसान न होता उलट जो उगीच बोजा वाढला असता तो मात्र कमी झाला. प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक मानव वंश जे काही हित मंगल जगांत निर्मित आहे ते काळपुरुष बरोबर घेऊन पुढे जात असतो. राष्ट्रे व जाति नष्ट होतात. परन्तु त्यांची निर्माण केलेले मंगल मरत नसते. ते जगाच्या सदैव उपयोगी पडत असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel