आज आपण दीनदरिद्री असलो तरी तो उज्ज्वल भविष्यकाळ आपण आपल्या अंतश्चक्षूसमोर सदैव राखू या. तो उज्ज्वल काळ जेव्हा येईल तेव्हा आपले नातूपणतू असे अभिमानाने म्हणतील की “हे सारे आमचे आहे ; हे सारे आम्ही निर्मिले, आम्ही उभारले ; ही शेति आम्ही सुपीक व समृद्ध केली, हे पाटबंधारे आम्ही बांधले ; ही दलदल आम्ही हटवली, हे रोग आम्ही दूर केले ; हे वातावरण आम्ही निर्मळ केले, हे ज्ञान आम्ही पसरविले ; हे बळ आमचे आम्ही मिळविले ; आम्ही आमचे दुर्बलत्य झुगारून हा काळ निर्माण केला ; आमच्या भाग्याचे आम्हीच विधाते.”

ते आणखी असे म्हणतील की  “ही भरतभूमी, ही सुजला, सुफला, सस्यशामला, प्रेमळा, निर्मळा मंगला भरतभूमी- ही आमची हो आमची. श्रमाने जगणारे, सत्याने वागणारे   दुस-या कोणास न नाडणारे, न पाडणारे, संयमशील व सामर्थ्यवंत असे हे आमचे राष्ट्र. या राष्ट्राकडे जो कोणी दृष्टी फेंकील त्याला जिकडे तिकडे उद्योग दिसेल, प्रयत्नांची पराकाष्ठा दिसेल. ध्येयांना कृतीत आणण्यासाठी अहोरात्र चाललेली धडपड दिसेल ; ह्या आमच्या राष्ट्रांत सर्वत्र चैतन्य नाचत आहे, उत्साह उसळत आहे, आशा, आनंद व प्रेम यांची गाणी गुणगुणली जात आहेत, असे दिसेल. अनंत मार्गांनी अनंत यात्रेकरू न दमता न थकता, त्या उज्ज्वल स्थानाकडे, त्या परम मंगल परमेश्वराच्या सिंहासनाकडे धडपडत जात आहेत व त्यांच्या पायाखाली ही धरित्री डळमळत आहे असे त्याला दिसेल !”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel