समाप्तीपूर्वी आणखी एक गोष्ट सुचली ती जाता जाता सांगतो. इंग्रजाला तेथे स्वतःचा चांगुलपणा प्रगट करात येत नाही, ह्याला आपणच मुख्य कारणीभूत आहोत. जर आपण आपले दारिद्र्य घालवू, जर आपण मोठे होऊ, तर इंग्रजहि हृदयाची श्रीमंती प्रकट करण्यांत कंजूषपणा दाखवणार नाही. जे देण्यासाठी देवाने इंग्रजांस येथे पाठविले आहे, ते त्याने आपणांस देण्यापूर्वी प्रत्येक क्षेत्रांत आपण श्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे. आपली शक्ति वाढविली पाहिजे. इंग्रजांच्या दारांत रिक्त हस्ताने भिक्षांदेहि करण्यातच जर आपण कृतकृत्यता मानू, तर पुन्हापुन्हा आपणांस गचांडीच मिळणार यांत शंका नाही.

आळशी व सुस्त, कर्महिन व शक्तिहीन, निरुत्साही व उदासीन जर आपण सदैव राहू तर इंग्रजांतील जे चांगले ते आपणांस मिळवता येणार नाही. इंग्रजाने आपली कीव करावी ही तर सर्वांत नामुष्कीची गोष्ट. आपल्यामधील पुरुषार्थाने व माणुकीने इंग्रजांतील पुरुषार्थ व माणुसकी जागृत झाली पाहिजेत. तेज तेजाला जागृत करते, माणुसकी माणुसकीला जागृत करते. इंग्रजालाहि अनेक हाल अपेष्टांतूनच स्वतःच्या तेजाचा साक्षात्कार करून घेता आला. आपणहि तशीच शक्ति स्वतःच्या ठिकाणी उत्पन्न केली पाहिजे. उत्कृष्ट व श्रेष्ठ वस्तु मिळवण्याचा मार्ग कष्टाचा व श्रमाचाच असतो.

आपणांतील काही लोक इंग्रजांच्या दरबाराला जातात. तेथे ते माना खाली घालतात, गोंडे घोळतात. हेतु हा की मोठ्या पदव्या मिळाव्या वा बड्या पगाराच्या जागा मिळाव्या. स्वार्थासाठी आपण लालचावून तेथे जातो. अशाने इंग्रजांतील जे हीन, त्याचीच आपण पूजा करू पाहतो. इंग्रजांचा चांगुलपणा आपण प्रकट होऊ देत नाही. तसाच दुसराहि एक प्रकार आहे. ते इंग्रजांची हांजी हांजी न करता, त्यांचे खून पाडू पाहतात. परन्तु यामुळे इंग्रजांतीलहि खुनशी वृत्तिच जागृत होते. लाळघोट्ये, स्वाभिमानशून्य लोक किंवा विकारवश प्रखर तरुण-दोघेहि इंग्रजांतील वाईट तेवढेच प्रकट होण्यास कारणीभूत होतात. ह्या आपल्या दोन्ही प्रकारच्या दुबळेपणामुळे इंग्रजामधील दुष्टपणा, लोभीपणा, उर्मटपणा, भ्याडपणा, जर प्रकट झाला तर त्याला नावे का ठेवावी ?

इंग्रज मनुष्याच्या हृदयांतील नीट वृत्ति त्याच्या स्वतःच्या देशात संयमाखाली असतात. तेथे त्याची पशुता वर डोके काढू शकत नाही. त्याच्या आजुबाजूची सामाजिक शक्तिच इतकी प्रभावी असते की त्याच्या हृदयांतील उत्कृष्ट गुणच नेमके प्रकट होतात. तेथील समाज जिवंत आहे व प्रत्येकाला उंच भूमिकेवर राहण्यास भाग पाडतो. परन्तु हिंदुस्थानांत जो इंग्रजसमाज आहे, तो येथील इंग्रज मनुष्यावर असे नियंत्रण घालू शकत नाही. तेथील अँग्लो इंडियन समाज म्हणजे खरा इंग्रज समाज नव्हे. येथील अँग्लोइंडियन समाज म्हणजे काही व्यापारी, काही शिपायी व काही कलेक्टर यांचा एक गट. या गटांतील प्रत्येक व्यक्ति रूढी व परंपरा, गैरसमज व खोट्या कल्पना यांनी जखडून जाते. त्यांचे मन ठरीव सांच्याचे बनून जाते. हायकोर्टाचा न्यायाधीश जर इंग्रज असेल तर न्यायाविषयी आपण निराश होतो. सत्य व सरकारी नोकरशाही यांच्या बाबतीत न्याय मिळावयाचा असेल तर सत्याला मूठमाती मिळावयाची हे जणु ठरलेलेच असते.

ब्रिटिशांची खरी दिलदारी व न्यायप्रियता हिंदुस्थानात प्रकट होत नाही, याचे कारण येथील वातावरण. हिंदी समाज आज दुबळा, विस्कळित व विकळ झाला आहे. ख-या इंग्रजाशी आपली गाठ न पडता बड्या साहेबाशीच पडते. कोणी गोरा दिसला की आपण त्याला बडा साब बनवून त्याच्या चरणी नमतो. आपण आपल्या दुबळेपणाने त्याला बडा बनवून त्याचीही माणुसकी मारली आहे. आपण त्याच्या पायाशी जर कुत्रे होऊन गेलो तर तो कधी तुकडा तोंडात देईल वा कधी छडी मारील. परंतु आपण वर मान करून मनुष्य म्हणून त्याच्याजवळ वागू तर तोहि माणसासारखा वागू लागेल. गोरा मनांत म्हणेल “ज्याला मी पशु समजत होतो, तो स्वाभिमानी मनुष्य आहे.” असे जेव्हा होईल तेव्हाच आजचे हाल व अपमान दूर होतील. आपलेच पाप आपल्या तापाला कारण आहे. आणि दुबळेपणा व भित्रेपणा हे सर्वात मोठे पाप होय. हे आपले पाप आपण कबूल केले पाहिजे. कबूल करून भागत नाही, ते दूर करावयास सर्वांनी निश्चयाने उठले पाहिजे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel