असला सारा क्षुद्रपणा, हे सारे विकारी पशुत्व आपण झडझडून टाकले पाहिजे. देशप्रेमाच्या विशाल व सुंदर पायावर आपण सारे काम उभारले पाहिजे. दुस-यावर विसंबून राहू नये. दुस-याचा तिरस्कार हाहि आपल्या कार्याचा हेतु नसावा. दुस-यावर विसंबणे किंवा दुस-याचा तिरस्कार करणे, या दिसावयाला जरि दोन गोष्टी दिसल्या तरी एकाच दुबळेपणाच्या वृक्षाच्या त्या जोडफांद्या आहेत. याचनेत आपला मोक्ष आहे, असे जर आपण ठरविले, आणि ती याचना दात्याने जर पूर्ण केली नाही, तर त्या दात्याबद्दल तिरस्कार व द्वेष वाटू लागतो. दुबळेपणा व तिरस्कार जवळ जवळ नांदतात. दुबळ्याला प्रबळाचा सदैव तिट्कारा वाटतो. आपण कोणाजवळ भीक मागितली नाही म्हणजे कोणाचा तिरस्कारहि करावा लागणार नाही. आपणांला भीक न घालणा-यांना तीव्र तिरस्कार म्हणजेच देशभक्ती असा जर सिद्धान्त आपण ठोकून दिला तर एका क्षणांत एकप्रकारचे देशभक्ति केल्याचे समाधान वाटेल. परन्तु त्या समाधानाची किंमत शून्य आहे हे सांगणे नलगे.
मुलाची शुश्रुषा करणे हे आईचे आवडते कर्तव्य आहे. ते आईकडून काढून घेऊन जर दुस-यावर सोपवले तर आईच्या हृदयाची काय स्थिति होईल ते पहा. तिचे कोणालाहि मग समाधान करता येणार नाही. का बरे ? कारण मुलावर तिचे अपरंपार प्रेम असते. आणि म्हणूनच मुलाची सेवा आपणच करावी असे तिला वाटत असते. त्या प्रेमाला सेवेचे खाद्य पाहिजे असते. त्याप्रमाणेच आपल्या देशाचे सारे काम इतरांनी केले तर ते आपणांस आवडेल का ? आपल्या मातेची सेवा इतरांनी करावी व आपण स्वस्थ बसावे हे आपल्या मातृभूमीस रुचते का, शोभते का ? आपणच आपल्या देशाची खरी चिंता वाहिली पाहिजे. त्यासाठी अहोरात्र कष्ट केले पाहिजेत. यालाच देशभक्ती म्हणतात. हे कर्तव्य, ही सेवा, ही जबाबदारी दुस-यावर टाकून आपण त्याला फक्त शिव्या देणे याला देशभक्ती म्हणता येणार नाही, शहाणपणाहि म्हणता येणार नाही. कारण देशासंबंधीचे खरे कर्तव्य त्यामुळे अपूर्णच राहणार. ते परका कसे पुरे करणार ?