दक्षिणेकडे महाराष्ट्रांत न्यायमूर्ती रानडे यांनी याच ध्येयासाठी आमरण प्रयत्न केले. एकीकरणाची अपूर्व बुद्धि त्याच्याजवळ उपजतच होती. जन्मताच विशाल दृष्टि घेऊन ते आले होते. माणसे एकत्र आणावी, सहकार्याचा सुंदर वृक्ष वाढावा, ही जाणीव त्यांना सदैव असे. यातच त्यांचा आनंद होता. समाजाला क्षुद्रतेतून वर नेणारी, ज्ञान, प्रेम व सत्संकल्प यांच्या मार्गातील सर्व अडचणी, सर्व विरोध दूर करणारी, अशी थोर स्वयंभू प्रज्ञा त्यांच्याजवळ होती. ते ईश्वरी देण्याचे महापुरूष होते. अशी थोर दृष्टी त्यांच्याजवळ होती, म्हणूनच त्यांच्या काळी प्रचलित असलेल्या सर्व क्षुद्र विचारांच्यावर ते उड्डाण करू शकले. नाना कल्पना व विचार यांच्या रश्शीखेचीत, हिंदी व ब्रिटिश यांच्या परस्परविरोधी हितसंबंधाच्या झगड्यांत जरी ते उभे होते, तरी त्यांनी पूर्वपश्चिमेच्या ऐक्याचा ध्रुव तारा दृष्टीआड होऊ दिला नाही. रानड्यांचे हृदय सागराप्रमाणे होते. मन गगनाप्रमाणे होते. हिंदुस्थानचा नवीन उज्वल इतिहास बनविण्यासाठी पाश्चिमात्यांपासून मोलाचे सारे घेतले पाहिजे असे ते म्हणत. यासाठी ते झटले. असे करताना त्यांचा उपहासहि झाला. त्यांना विरोध झाले. त्यांनी ते सारे सहन केले.त्यांच्या क्षमेला व सहनशीलतेला सीमा नव्हती. हिंदुस्थानाने परिपूर्णता गाठावी असे त्यांना वाटे. या परिपूर्णतेच्या ध्येयाच्या मार्गात ज्या ज्या अडचणी दिसल्या, त्या दूर करण्यासाठीच त्यांचे सारे यत्न होते.
आणि ते स्वामी विवेकानंद तो थोर अवलिया, महान् संन्यासी ! त्यांनीहि हेच सांगितले. त्यांच्या एका बाजूस पूर्व व दुस-या बाजूस पश्चिम उभी होती. पूर्व व पश्चिम हे जणु त्या महापुरुषाचे दोन विशाल बाहु होते. भारताने पूर्वीच्या संकुचितच जागेत बसावे असे त्यांना कधीहि वाटले नाही. पश्चिमेचे जे आगमन झाले आहे, त्यात खोल अर्थ आहे असे त्यांना वाटे. विवेकानंदांची बुद्धि एकीकरण करणारी होती, जोडणारी होती. पूर्वेकडील विचार व ध्येये यांचा प्रवाह पश्चिमेकडे जावा व पश्चिमेकडचे विचारप्रवाह इकडे यावेत असे त्यांना रात्रंदिवस वाटे. हा विचारांचा व्यापार नीट चालावा, ही देवघेव सुकर व्हावी म्हणून ते एक मोठा इमरस्ता तयार करीत होते व त्यासाठीच त्यांनी सारे जीवन दिले.
ऋषि बंकिमचंद्र, यांचेहि हेच जीवनकार्य होते. वंगदर्शन मासिकाच्या पानापानांतून पूर्वपश्चिमेला त्यांनी एकत्र मेजवानीला बसविले होते असे दिसून येईल. त्यांच्या वेळेपासूनच बंगाली वाङमयांत नव चैतन्य आले. काळाची हाक वाङमयाने ऐकली. कलेने युगधर्म ओळखला. कृत्रिम-बंधने तडातड तोडून वंग साहित्याचा आत्मा पंख फडफडवित बाहेर पडला व जागतिक वाङमयाशी त्याने मैत्री जोडली. बंगाली वाङमयाने विशिष्ट रीतीने वाढ करण्याचे ठरविले. पाश्चिमात्य ध्येये व शास्त्रे मिळवून घेण्याचे निश्चित केले. बंकीमचंद्रांनी जे लिहिले त्यामुळे ते तेवढे मोठे नाहीत. परन्तु विकासाचा नवपंथ त्यांनी दाखवला, म्हणून ते मोठे, नव पंथ निर्माण करणारे बंकीम, विकासाचा नवा भव्य मार्ग दाखवणारे बंकीम, आनंदमठ व विषवृक्ष कादंब-या देणा-या बंकीमांपेक्षा कितीतरी पटीने थोर आहेत.
सारांश, कोणत्याही बाजूने जाऊन पडा. धर्म, राजकारण, वाङमय, कोणत्याही क्षेत्रांत जाऊन बघा. हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासांत जे महान् पुरुष झाले, ज्या थोर विभूती झाल्या, ज्यांच्या ज्यांच्या जीवनांतून काही दिव्यता प्रकट झाली, त्या सर्वांच्या जीवनातील खरे रहस्य म्हणजे ही विशाल दृष्टि होय. त्यांच्या दृष्टींत पूर्व व पश्चिम अविरोधाने नांदत. पूर्व व पश्चिम जणु त्यांचे दोन डोळे. त्यांच्या बुद्धीत पूर्वपश्चिमेचा विरोध नव्हता, झगडा नव्हता. दोन्ही मिळून नवीन मधुरतम उदात्त संगीत निर्माण करणारे ते होते.