प्रत्येक प्रांतिक सेवामयी समितीने आपल्या प्रांतातील खेड्यापाड्यांतून जर अशा शाखा पसरवल्या तर काही आशा आहे. असे आपण करू तेव्हाच हा देश आपला असे आपणांस अधिकाराने म्हणता येईल. हा देश आपला आहे असे म्हणता यावे म्हणून प्रत्येकाने काही सेवा केली पाहिजे, त्याग केला पाहिजे. अशा सेवकांच्या संस्था जेव्हा सर्वत्र दिसू लागतील, तेव्हाच नसानसांतून जीवनरस उसळू लागेल. राष्ट्रीयसभा जी आपले हृदय आहे- तिचे कार्य नीट होऊ लागेल. आणि भारतमाता त्या राष्ट्रीय सभेला हृदयाशी धरील.

आपल्या कामाच्या महत्त्वाचे स्वरूप मी दाखविले. त्याचा थोडक्यात सारांश असाः-

१-    आपण काळाबरोबर पुढे न जाऊ तर मरू.

२-    संघटना हा आजचा मंत्र आहे. आपणाजवळ इतर कोणतेहि व कितीही गुण असले तरी जोपर्यंत संघटना नाही, तोपर्यंत या गुणाचा फारसा फायदा होणार नाही. संघटित दुर्गुणाविरुद्ध सद्गुणांनीहि संघटित झाले पाहिजे. तरच त्याचा टिकाव लागेल.

३-    आपल्या रोमारोमांत खरी राष्ट्रीय वृत्ति अद्याप पूर्णपणे बाणली नाही. एक अवयव बळकट करण्यासाठी जावे, तर दुसरा दुबळा होतो. वरच्या वर्गातील लोकांना सामान्य लोकांत मिसळून काम केल पाहिजे. सारे श्रेष्ठकनिष्ठपणाचे कृत्रिम भेद नष्ट केले पाहिजेत.

४-    वादविवाद, चर्चा यांनी खरी ऐक्यवृत्ति व राष्ट्रीय वृत्ति निर्माण होत नाही. सामान्य प्रजा व वरचे वर्ग- यांच्यामध्ये नाना अहंकारजन्य खोटे भेद आहेत. राष्ट्रीय वृत्ति व खरे ऐक्य यांच्या पूर्ण व योग्य वाढीस हे मोठेच अडथळे आहेत.

५-    सुशिक्षित व विचारवंत लोकांतच जर भांडणे होतील तर ध्येय फारच दूर राहील. शेवटी काय व्हावयाचे ते भविष्यकाळ पाहून घेईल. आपण आपले सारे वादविवाद दूर ठेवू या. निरनिराळ्या कार्यपद्धति असणार व असाव्यातहि. या बाबतीत एकवाक्यता न झाली, तरी जो प्रचण्ड व अपार कार्यसागर लंघावयाचा आहे तो उल्लघण्यास काळाचा अपव्यय न करता ताबडतोब आरंभ करावा या बाबतीत तरी मतभेद नाही.

बंधूंनो, आपल्या डोळ्यासमोर आता सदैव कार्यक्षेत्रच असू दे. तेच अहोरात्र दिसू दे. काम काम काम. कामाशिवाय राम नाही. स्वातंत्र्याचे सुखधाम नाही. आपले कर्तव्यक्षेत्र विस्तृत व विशाल आहे. जगाच्या इतिहासांत मानवांतील तेजस्वी दिव्यता सदैव कर्मद्वाराच प्रकट होत आली आहे. मनुष्यांतील दिव्यता जेव्हा सेवेच्या व कर्माच्या द्वारा प्रकट होते तेव्हा ती फारच दैदीप्यमान व प्रभावी असते. अशा कर्मवीरांना आपण आदराने व भक्तिभावाने प्रमाण करू या. समोर अनंत आपत्ति आ पसरून गिळावयास येत असताहि, जे डगमगले नाहीत, अगणित स्वार्थत्याग करावा लागला तरी तो ज्यांनी केला, जे ध्येयार्थच जगले व ध्येयासाठीच मेले, आपल्या देशाला खरे वैभव मिळावे, यश मिळावे, सन्मानाचे स्थान मिळावे. जय मिळावा, म्हणून ज्यांनी आपली जीवने तृणवत् फेकून दिली-त्या सर् वीरांना आपण वंदन करू या. अहंकाराची तृप्ति म्हणजे सिद्धि नव्हे. अतःपर स्वतःपुरते पाहू नका. क्षणिकाला भुलू नका. ध्येय डोळ्याआड होऊ देऊ नका. आज कार्य करणारे आपण उद्या निघून जाऊ. परन्तु आपल्यामागे आपले कार्य राहणार आहे. ते अनंत आहे. ते संपणार नाही, सरणार नाही. कार्यकारणभावरूप कर्म सारखे वाढतच जाणार. ही पिढी पुढील पिढीच्या हाती आपल्या कर्माची मशाल देईल व अंतर्धान होईल. पिढ्यानपिढ्या असे चालणार, अखंड काम करणा-या अशा पिढ्यानपिढ्या ज्या राष्ट्रांत निर्माण होतात, त्या राष्ट्रांना तेज चढते. त्या राष्ट्रांना सामर्थ्य, सुंदरता, सन्मान, सद्यश यांची प्राप्ति होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel