असा जो हा समाजपति निवडावयाचा, राष्ट्रपति निवडावयाचा, तो कधी उत्तमोत्तम असेल तर कधी तसा नसेल. परन्तु समाजपति कसाहि असला तरी बिघडत नाही. कारण तो कायमचे नुकसान करु शकणार नाही. उलट सर्वोत्तम नायक जरा कमी उत्तम मिळाला तर त्यांत कल्याणच आहे. कारण आपण अधिक दक्ष व तत्पर राहू. आपल्या त्या प्रतिनिधीच्या शक्तीत जनात स्वतःची शक्ती पाहील व समाज अजिंक्य होईल. या समाजपतीच्या हाताखाली दुसरे दुय्यम पुढारी असतील. ते देशाच्या निरनिराळ्या भागांत कार्य करतील. त्या त्या भागांत जी जी जरुरीची व चांगली कामे करावयाची त्यांबद्दल ते जबाबदार असतील, त्या कामांबद्दल ते समाजपतीला जाब देतील.

समाजांतील प्रत्येक व्यक्तीचा धर्म झाला पाहिजे की देशासाठी काहीतरी वर्गणी रोज बाजूला काढून ठेवणे. देशाचे स्मरण रोज हवे व स्मरणाची खूण म्हणून काही त्याग हवा. हे रोजचे आह्निक झाले पाहिजे. निरनिराळ्या उत्सव प्रसंगी लग्नमुंजी वगैरेचे वेळी जो आपण खर्च करतो, त्यांतून काही अंश देणगी म्हणून आपण काढून ठेवला पाहिजे. नित्याची देणगी व ही नैमित्तिक देणगी. या दोन्ही प्रकारच्या देणग्यांनी आपल्या समाजाजवळ कार्यासाठी भरपूर पैसा ऊभा राहील. पूर्वी प्राचीन काळी आपल्या देशांत मोठमोठे आश्रम, मोठमोठी विद्यापीठे कशी चालत ? लोक आपण होऊन ज्या देणग्या देत त्यांतूनच त्या भारतभूषण संस्थांचे खर्च चालत. त्याच आपल्या देशात आज पुन्हा सार्वजनिक सेवेस पैसा मिळणार नाही असे मला वाटत नाही. अशा आश्रमांचा य़ोगक्षेम चालेल. हे आश्रम उत्कृष्ट काम करू लागतील तेव्हा उदारांच्या देणग्या घेण्याचा त्यांना हक्कच प्राप्त होईल.

असा एक मध्यबिंदु असला पाहिजे की जेथे आपली सारी दानशक्ती वहात येईल. त्या मध्य बिंदूजवळ सा-या देणग्या याव्यात व तेथून योग्य प्रमाणांत मदत दिली जावी. अशी जी मध्यवर्ती संस्था असेल तिला आपण प्राणापेक्षाही जपले पाहिजे. तिला आतून रोग जडणार नाही हे पाहिले पाहिजे. बाहेरून हल्ला आला तर आतील जीवनशक्तीच्या जोरावर आपण तो परंतू. आतून जर वृक्ष पोखरलेला नसेल तर तो संकटाशी टक्कर देऊन उभा राहिल, झगडून अधिक बळकट होईल. आतील जीवनशक्तीचा धर्मच आहे की बाहेरच्या जखमा भरुन काढणे. वाढत्या तरुण मुलाला सतरा ठिकाणी लागले तरी त्याच्या जीवनशक्तीमुळे त्या जखमा पटकन् भरुन येतात. शरीरातील जीवनशक्ति शरीरांत एकसूत्रीपणा ठेवते. संस्थेतील जीवनशक्तीनेंही सा-या प्रयत्नांची एकवाक्यता करण, सर्वत्र चैतन्य खेळवित राहणे या गोष्टी केल्या पाहिजेत.

राष्ट्रांत जी अशी महनीय संस्था आपण निर्मू तिला भारतमाता आशीर्वाद देईल. जनता दुवा देईल. चांगल्या कामाबद्दल परकी सरकारहि पदवीदान करते. परन्तु आपणांस परकी सरकारच्या पदव्यांची पर्वा नाही. मातेचा आशीर्वाद मिळाला म्हणजे सारे काही मिळाले. कार्यकर्त्या संस्थेला, सेवेने प्रेमैक्य निर्माण करणा-या संस्थेला, समाज आशीर्वाद न देईल तर संस्थेला खरे समाधान मिळणार नाही. समाजाने चांगले कार्य करणा-यांची पाट थोपटली पाहिजे.

आणि आज हिंदुमुसलमानांचे ऐक्य आधी निर्मावयाचे ही गोष्ट कोणी विसरता कामा नये. हिंदुमुसलमानांतील तंटे आपण दूर केले पाहिजेत. सर्वांना योग्य व समान रीतीने आपण वागविले पाहिजे. पक्षपात न होईल म्हणून जपले पाहिजे. दोघांचे हितसंबंध पाहिले जावेत. तडजोड करावी. वाटेल तो त्याग करून ही दिलजमाई घडवून आणली पाहिजे. आपणांस ह्या ऐक्याचे बाबतीत जर यश आले नाही तर पुन्हा पुन्हा कलहाचे वणवे पेटतील, द्वेष मत्सर भटकतील व त्यामुळे देश दिवसें दिवस अधिक लुळापांगळा दुबळा होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel