ईश्वराने हे जे विविधतेत ऐकता निर्मिण्याचे दिव्य कर्म भारताला नेमून दिले आहे ते भारतवासी यांनी ओळखून ते जीवनात प्रकट करण्यासाठी झटले पाहिजे. ज्या दिवशी हे ध्येय प्रत्यक्ष सृष्टीत येईल, त्या दिवशी भारताला लागलेला कलंक दूर होईल. आपली अजर अमर शक्ति पुन्हा जागृत झाली असे होईल. तो थोर दिवस यावा म्हणून पुन्हा एकदा भारतमातेचे स्मरण करा. तिचे नाव घ्या. तिची मूर्ति हृदयांत ठसवा. अनेक शतके झाली तरी ही माता आपल्या भांडारांतून सत्यज्ञानाचे खाद्य आपल्या लेकरांस देऊन त्यांचे संगोपन करितच आहे. आपल्या मुलाबाळांचा सर्व नाश तिने होऊ दिला नाही. आणि आज त्या मुलांमध्ये प्रेम उत्पन्न करून, त्या सर्वांना परस्परांशी अधिक जवळ आणून, तिने त्यांना हृदयाशी वात्सल्याने धरून ठेवले आहे.
संपत्तीचा त्याग करण्यास आपण शिकलेले आहोत. ऐहिक वैभवाचा लोभ न धरण्यास शिकलेले आहोत. दारिद्र्य व विपत्ति मातहि सौदर्य व वैभव पाहण्यास आपण शिकलेले आहोत. आज पैशाला पोटाशी धरून आपली खरी कर्तव्ये आपण दूर लोटणार का ? सेवेसाठी त्या पैशाचा त्याग नाही का करणार ? आपल्या मातेची सेवा करणारे खरे सत्पुत्र आपण पुन्हा नाही का होणार ? मातेचे पडके घर बांधण्यासाठी पुन्हा नाही का उठणार ? संयमी व निर्मळ होवून, साधे जीवन गोड मानून, मातेच्या कामाला वाहून घेऊ या. आपल्या देशांत कंदमुळे खाण्यांत कमीपणा वाटत नसे. कमीपणा एकटयाने खाण्यांत मानला जाई. वेदांतील ऋषी म्हणतो
“केविलाघो भवति केवलादी”
जो एकटा खातो, तो केवळ पापरूप होय.
आपल्या पूर्वीच्या ह्या भव्य कल्पना, हे थोर विचार, त्यांना पुन्हा आपण हृदयाशी नाही का धरणार मी एकट्याने खाणे हा माझ्या आत्म्याचा अपमान आहे, असे नाही का मला वाटणार ? आपले काही सुखविलास कमी करून, काही ऐषआरामांस फाटा देऊन, जे वांचेल ते बंधुभगिनींच्या सेवेस आपण नाही का देणार ? जे एके काळी आपण सहजतेने करित असू, ते आज आपणांस केवळ अशक्य व्हावे का ? नाही. असे कधीही होणार नाही.
भारतावर आजपर्यंत अनेकदा घोर आपत्ति आल्या. तरीही भारताची प्रचंड शक्ति शांतपणे, न डगमगता काम करीत राहिली व शेवटी विजयी झाली. ती भारतीय शक्ति आज का लोपली? शाळांमधून आमच्या तेजोभंगाचे किती जरी पाठ देण्यांत आले, आम्ही नालायक होतो असे किती जरी सांगण्यात आले, तरी ती अजिंक्य व अमर अशी भारतीय शक्ति मारली जाणार नाही. भारतमातेने हाकं मारली आहे व प्रत्येक हृदय त्या हाकेला ओ देत आहे. कळत वा न कळत आपण आपल्या मातेकडेच चाललो आहोंत.
या, सारे इकडे या. ह्या आपल्या स्वतःच्या घरांतील तो जो पवित्र नंदादीप, त्याच्यावर दृष्टि स्थिर करून, मातेचे पुन्हा एकदा नीट स्मरण करा व मग कामाला लागा.