कर्झनसाहेबांच्या मनांत काहीहि असो. जेथे सिंह वाघ मेघवानीस जमले आहेत, तेथे शेळीला आमंत्रित असलो तरी तिची जी मनःस्थिति होईल, तीच ब्रिटिश साम्राज्यांत मिळून जा असे ऐकतांच आमची होते. ब्रिटिश साम्राज्यात द. आफ्रिका, कॅनडा, आस्टालिया यांनी असणे निराळे व हिंदुस्थानने असणे निराळे. एकाच घरांत पितापुत्र व त्याचे नोकर राहतात. परन्तु पितापुत्रांचे राहणे निराळे, नोकरांचे राहणे निराळे. हिंदी लोकांनी ब्रि. साम्राज्यांत रहावयाचे याचा अर्थ इतकाच की जर आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशांत शेती करायची असेल, पडित जमीन लागवडीस आणायची असेल तर हिंदुस्थानने मुदतबंदीचे स्वस्त मजुर पुरवले पाहिजेत. गरीब लोकांच्या विरुद्ध तिबेटवर स्वारी करायची असेल तर आम्ही पैसे व सैन्य पुरवले पाहिजे. जुलमाने त्रस्त झालेल्या सोमालीलँड मधील जनतेने जर बंड केले, तर ते बंड मोडण्यासाठी आम्ही तेथे जाऊन मेले पाहिजे. मोठ्यांचा व छोट्यांचा हा असा प्रेमसंबंध असतो. परन्तु हे असे चालावयाचेच. सृष्टीचा हा भीषण कायदाच आहे. त्यामुळे डोळे लाल करण्यांत वा ओले करणायांत काही अर्थ नाही. आपण जे जे करू त्यांत वरील गोष्ट लक्षात ठेवलेली असावी म्हणजे पुरे.

उच्च नैतिक भूमिकेवर उभे राहून आपण जर इंग्रजांस म्हणू “अहो जरा माणुसकी तरी दाखवा”- तर इंग्रज आपणांस म्हणेल “तुझा उपदेश आम्ही मागून ऐकू. परन्तु सध्या आम्ही ज्या भूमिकेवर आहोत, त्या भूमिकेवर तू प्रथम ये. आम्ही आमच्या देशाचे हित तरी पहात आहोत. परन्तु तू तुझ्या देशाचे तरी हित आधी पहातोस का ? तू स्वार्थ बाजूस ठेवून स्वतःच्या देशाचे कल्याण तरी आधी करशील काय ? स्वतःच्या देशासाठी देशील काय ? प्राण देणे दूर राहो पण थोडा सुखोपभोग कमी करून दोन पैशाची मदत देशासाठी करशील काय ? एवढेहि तू तुझ्या देशासाठी करावयास तयार नसशील तर तुझ्यासाठी सारे आम्ही का परक्यांनी करावयाचे ? आम्ही स्वतःच्या देशाचे तरी हित पाहतो. तू तेहि करित नाहीस. आम्हाला उपदेश करण्याचा आव मात्र आणतोस ? स्वतःच्या देशाचे हित पाहणे एवढी तरी माणुसकी आमच्याजवळ आहे. तुझ्याजवळ तीहि नाही.” असा टोमणा जर इंग्रजीने मारला तर वर तोंड काढण्यास आपणांस जागा आहे का ? आपण स्वदेशासाठी काय करतो, काय देतो ? स्वतःच्या देशाचा परिछयहि आपण करून घेतला नाही. आपल्या देशाचा इतिहास आपणांस माहित नाही. आपण पराकाष्टठेचे आळशी आहोत. आपल्या आळशीपणस तुलना नाही. परके येऊन आमचे इतिहास लिहितात व त्यांची भाषांतरे करून आम्ही शिकतो शिकवतो. परका येऊन आमच्या भाषांची व्याकरणे लिहितो व ती आम्ही आमच्या डोक्यांत कोंबतो. माझ्या शेजारी काय आहे हे जाणून घेण्यासाठी हंटरसाहेबांचे ग्रंथ मला पहावे लागतात. आपणांस माहिती नाही, ज्ञान नाही. ज्ञानासाठी जीवन देणार नाही. मनुष्यजातीबद्दल, व्यापासाबद्दल, शेतकीबद्दल, शिक्षणाबद्दल कसलेहि ज्ञान आपणांस नाही. आपण ऐदी, खुशालचेंडू व उदासीन आहोत. आणि असे आळशी कर्मशून्य लोक जेव्हा इंग्रजाला “तू आमच्या देशासाठी अमुक कर, तमुक कर” असे सांगू लागतात तेव्हा त्याला त्यांच्या निर्लज्जपणाची कमाला वाटते. आपल्या पोकळ वाक्पांजित्याचा परिणाम होत नाही. सरकार रुपयांत पै इतकेतरि हिंदुस्थानासाठी मनापासून नसले तरी लोकलज्जेस्तव करते. परन्तु आपण तर काहीच करित नाही. सरकार बोलून चालून परकी. परन्तु आपण स्वदेशाशी परक्याहून परकी झालो आहोत. इंग्रज लोक स्वतःच्या देशाचे पूर्ण हित पाहतात व रुपयांत पै हिंदुस्थानचे पाहतात. परन्तु आपण स्वदेशाबद्दल केवळ बैफिकीर आहोत. आपण स्वदेशाबद्दल केवळ बेफिकीर आहोत. आपण कृतघ्न आहोत. इंग्रजांना हिंदी लोकांबद्दल का आदर वाटावा ? त्यांनी आमच्याशी का सहकार्य करावे ? म्हणून शेवटी असा देखावा दिसतो की एका बाजूला रागारागाच्या, आवेशाच्या सभा व घसा बसेपर्यन्त भाषणे, आणि दुस-या दिवशीच अत्यंत अपमानास्पद अशा गोष्टी मुकाट्याने गिळून बसणे. कितीहि कडू असो. गोळी आपण गिळून बसतो. नाक दाबण्याचीहि जरुर नाही.

मी अगदी साधी साधी सत्ये सांगून राहिलो आहे, असा माझ्यावर कोणी आरोप करतील. “आपणच आपले वैरी आहोत. आपणच आपले मित्र आहोत. आपण आपली लाज राखली पाहिजे, स्वतःची घाण दूर केली पाहिजे” इत्यादि जे मी सांगून राहिलो आहे ते खरोखरीच नवीन नाही. “तुम्ही नवीन काय सांगितले ? त्याच सनातन गोष्टी तुम्ही सांगत आहांत” असे मला कोणी म्हटले तर त्यात माझा जयच आहे. मला अशा म्हणण्याची मुळीच भीति नाही वाटत. भीति नाही वाटत. भीति वाटत आहे ती अशी की “हे काय तुम्ही नवीन काहीतरी सांगता” असे कोणी मला म्हणतो की काय ? कारण स्वतःसिद्ध सत्यालाहि सिद्ध करित बसावे लागणार असेल तर ते मला अशक्य आहे. साधी सरळ सत्येहि जर आपणांस दुर्बोध वाटू लागली तर मात्र फारच कठीण प्रसंग आला म्हणावयाचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel