परिस्थितीप्रमाणे कार्यपद्धतीही बदलते. हे साधे सत्य आहे. ते सिद्ध करावयास नको. इंग्लंडच्या मुख्य प्रधानाला फ्रेंचांकडून जर काही सवलती मिळवायच्या असतील, तर तो फ्रेंच सरकारजवळ वादविवाद नाही करणार, किंवा श्रेष्ठ नीतीवर प्रवचने नाही देणार. तो काही तरी मुत्सद्देगिरीचा डाव टाकील. हे डाव कसे व केव्हा टाकावे यासाठी मोठमोठे मुत्सद्दी सारखेकाम करित असतात. ज्यावेळेस इंग्लंडची व जर्मनची दोस्ती होती, त्या वेळेची अशी एक गोष्ट सांगतात की एकदा मेजवानी चालली असताना कैसरला हातरुमाल देण्यासाठी एक माठा ड्यूक स्वतःहोऊन उठला ! परन्तु हातरुमाल देण्याने त्याचा पुढे पुष्कळ फायदा झाला. एक काळ असा होता की मोगलांच्या दरबारांत इंग्रजांना मुजरा करावा लागे. महिनामहिना तिष्ठत बसावे लागे. राजाच्या दरबारांतील मातबर लोकांस खुष ठेवण्यासाठी पैसा खर्चावा लागे व खस्ता खाव्या लागत. ज्या वेळेस विरूद्ध असणा-या, नाराज असणा-या लोकांकडून काही सवलती मिळवून घ्यावयाच्या असतात, त्या वळेस अशा गोष्टी कराव्याच लागतील. हे सारे अपरिहार्य आहे. हे सारे परिस्थितीवर अवलंबून असते.
परन्तु आपल्या या दुबळ्या व आशाळभूत देशाला अजून असे वाटून राहिले आहे की सनदशीर चळवळ करून हे सत्ताधीश सरकार वठणीवर आणता येईल ! हे सरकार आपल्या मागण्या मान्य करील. घुसळीत राहिल्याने दुधापासून लोणी निघते हे खरे. परन्तु दूध डेअरीत असेल तर लोणी कसे निघणार ? “आपण भीक थोडीच मागतो, आपले रास्त हक्कच मागतो” असे कोणी कोणी म्हणतात. ते त्यांचे म्हणणे क्षणभर जरी गृहीत धरले, तरी ज्यावेळेस आपल्या हक्कांना आपण मुरड घालू लागतो, सध्या इतकेच द्या, असे म्हणू लागतो, तेव्हा सत्ताधीशांपासून आपण भीक मागतो ही गोष्ट जगाला व स्वतःलाही कळल्याशिवाय राहत नाही. आपले सरकार म्हणजे काही यंत्र नाही. रक्तमांसाच्या जिवंत माणसाचा तो एक संघ आहे. त्या संघाच्या नसानसांतून रक्त नाचत आहे. या संघातील लोकांजवळ स्वार्थ लोभ नसून ते संत आहेत असे समजू नका. त्यांना त्यांचे पोट आहे, भुखलालसा आहे, सत्तेची आवड आहे. त्यांची चूक दाखविल्याने ते सुधारतील अशी कल्पना करण्यांत अर्थ नाही.
आपली परिस्थिती कशी आहे, आपणांस मिळवाचे काय, त्याचे उपाय कोणते, कार्यपद्धती कशी असावी, इत्यादि गोष्टींचा आपण कधी स्वच्छ विचारच करित नाही. जय मिळवणे हे जसे लढायीचे ध्येय त्याप्रमाणे आपला हेतु सिद्धीस नेणे हे राजकारणाचे ध्येय असते. आज आपल्या राजकीय संस्था केवळ वादविवादोत्तेजक संस्था झाल्या आहेत. जणु सरकार म्हणजे एक विरुद्ध मताचा विद्यार्थी व वादविवादांत त्याचा पराजय केला की झाले काम ! परन्तु शास्त्रीय चिकित्सा व तदनुसार उपचार चालू ठेवूनही माणसे ज्याप्रमाणे मरतात, त्याप्रमाणे उत्कृष्ट वादविवादकुशलता व अप्रतिम वक्तृत्व आपणांजवळ असूनहि इच्छित फळ मात्र आपल्या पदरांत अजून पडत नाही.
सरकार आमच्यासाठी काय करित आहे व काय करित नाही याची मी तरी फारशी उठाठेव करित नसतो. ह्या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. मेघांचा गडगडाट व विजांचा चमचमाट सुरू होताच जर आपण पदोपदी घाबरू लागलो तर तो मूर्खपणा होईल. पहिली गोष्ट म्हणजे गडगडाट व चमचमाट होऊन वीज पडतेच असे नाही ; आणि दुसरी गोष्ट म्हणजे विजेचे गोळे तयार करून फेकण्याचा जो कारखाना आहे तेथे आपली सल्ला मसलत घेण्यात येत नाही, तिला तेथे किंमत नाही ; किवा आपल्या प्रार्थनांमुळे वा हात जोडल्याने तो पडल्याने तो पडणारा विजेचा गोळा थांबणार आहे किंवा त्याची दिशा बदलणार आहे असेही नाही. त्या येणा-या विजेच्या गोळ्याची दिशा बदलावयाचीच असेल तर दुबळेपणाने आरडाओरड करून ते होणार नाही. त्यासाठी योग्य अशी शास्त्रीय उपकरणे व साधने वापरावी लागतील. विद्युच्चुंबक हा काही आकाशांतून मिळत नाही. तो शांतपणे, श्रमपूर्वक येथे पृथ्वीवर कुशलतेने तयार करावा लागतो व मग त्या कडकडणा-या, प्राण घेणा-या विजेच्या गोळ्याशी दिशा बदलता येते.
सृष्टीच्या नियमांविरुद्ध आदळआपट केल्याने काही एक होत नाही. पतंग जर म्हणू लागला मी प्रेमाने ज्योतीजवळ जातो, परन्तु ती मला जाळते. कोण ही विषमता,” तर त्याचे कोण ऐकणार ? त्याने समानतेचा विषमतेचा वाद सोडून तेजापासून दोन पाउले दूर रहावे हेच बरे. काही झाले तरी हिंदुस्थानवरची आपली पकड सैल होऊ द्यावयाची नाही असे इंग्रजीने निश्चित ठरविले आहे. ज्या ज्या वेळेस पोलादी चौकट जरा ढिली झाली आहे असे त्याला वाटते, त्या वेळेस चारदोन खिळे मजबूत ठोकून तो ती चौकट पुनः घट्ट करून ठेवतो. हिंदी लोक झक्क वादविवाद करतात, सुंदर इंग्रजी बोलतात, एवढ्याने विदेशी मनुष्य भाळणार नाही व सत्ता सोडणार नाही. तो सदैव ठाकठोक करित राहणार, आपली सत्ता मजबूत ठेवणार. आपण काही केले वा न केले तरी उगीच आदळ आपट करणे हे तर फारच वाईट. दुर्बलाच्या रागाचे जगात हसे होत असते, एवढेही आपणांस समजू नये का ?