मानवतेचा महाकवि
रविंद्रनाथ टागोर
गुरुदेवांचे स्मरण करु या. ७ ऑगस्ट १९४१ रोजी ते देवाघरी गेले.
१९१३ मध्ये त्यांच्या गीतांजलीला नोबेल मिळाले. या विश्वकवीनें जपान, अमेरिका इत्यादी देशात मग दौरा काढला. राष्ट्रवाद हा आक्रमक नसावा, जागतिक ऐक्याला तो अनुकूल असावा असा संदेश त्यांनी दिला.
रविंन्द्रांचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. विश्वभारती स्थापून त्यांनी पूर्वपश्चिमेच्या ऐक्याचा, समन्वयाचा भारताला नि जगाला वस्तुपाठ दिला. वंगभंगाच्या चळवळीच्या वेळेस त्यांची काव्यवीणा भारतभक्तिची गीते गाऊ लागली. परंतु त्यांच्या देशभक्तीला अत्याचार, द्वेष सहन होत नसे.
देशाने स्वावलंबी होऊन आपला संसार नीटनेटका करावा, ते म्हणाले. असहकाराच्या चळवळीच्या वेळेस त्यांनी ‘ सर ’ पदवी परत केली. कलकत्ता काँग्रेसच्या वेळेस १९१७ त ते स्वागताध्यक्ष होते. परंतु राजकारण त्यांचा धर्म नव्हता.
एका मुलाखतीत म्हणाले, “ माझ्या समोर मी तरुण असताना अनेक रस्ते होते. परंतु मी कवी आहे असे मला वाटले. तो माझा धर्म.” पुण्याला एकदा व्याख्यानात ते म्हणाले “ कोप-यांत बसून गाणे माझा धर्म.”
१९४१ मध्ये पंडितजी तुरुंगात. ब्रिटिश पार्लमेंटमधील एका बाईने दुष्ट टीका केली. रविंद्रनाथांनी मरणशय्येवरुन तेजस्वी उत्तर दिले. ते म्हणाले, “ भारताचा तो सुपुत्र तुरुंगात आहे. तो उत्तर देऊ शकत नाही. मी देतो.” महात्मा गांधी आणि गुरुदेव यांचेंही परस्परांवर किती प्रेम !
रविन्द्रनाथ हे महाकवी होते. परंतु ते म्हणतात, “ मी काव्य लिहीले. परंतु ते कशासाठी ? मानवता हा माझ्या काव्याचा आत्मा आहे.” ध्येयहीन त्यांचे काव्य नव्हते.
त्यांची कला मानवतेच्या उपासनेसाठी होती. जवाहरलाल म्हणतात, “ गुरुदेवांनी या राष्ट्राला क्षुद्रपणापासून वाचविले. जे जे पवित्र नि मंगल आहे त्याची जाणीव दिली.” असे हे थोर पुरुष.
सत्य, सौन्दर्य आणि मांगल्य यांची आपल्या जीवनाने नि गीतांनी शिकवण देणारे. स्वतंत्र हिंदुस्थानला त्यांच्या शिकवणीची अत्यंत जरुर आहे. “ सर्व धर्म नि मानववंश यांना एकत्र नांदवून भारत मानवतेचे तीर्थक्षेत्र करुं, ” ते म्हणत. स्वतंत्र भारताची नाव त्या ध्येयाकडे जात आहे.
“ आमार यात्रा होईल सुरु
ओ गो कर्णधार
तोमारे करी नमस्कार.”
“ आमची यात्रा सुरु झाली. प्रभु सुकाणू धरीत आहे. आम्ही वल्ही उचलली आहेत. जीवन-मरण म्हणजे ध्येयाकडे जायचा खेळ. तुफान येवोत, वारे सुटोत. पर्वा नाही. आम्ही दुस-यांच्या दारात भीक मागत जाणार नाही. आम्ही निराश होणार नाहीं. तो प्रभु नावेत आहे. आणखी काय हवे ?” असे या गीतात म्हणतात.
टीका झाली तरी “ एकला चलोरे ” ते सांगतात. “ जेथे क्षुद्रता नाही, संकुचित रुढी नाहीत, जेथे सर्वांची मान सरळ आहे, जेथे बुध्दि अखंड पुढे जात आहे, जेथे नविन नविन उद्योगांना हात घातला जात आहे, ध्येये अधिकाधिक विशाल होत आहेत, अशा स्वातत्र्याच्या स्वर्गांत माझा भारत जागृत होऊन नांदो, ” असे ते म्हणतात.
स्वातंत्र्य म्हणजे उत्तरोत्तर विशाल ध्येयाकडे जाण्याचे साधन असे गुरुदेव सांगत आहेत. तो संदेश स्मरुन जाऊ या.
प्रणाम गुरुदेवांना !