“बघा लिहून. परंतु हें मिंधेपणाचें जिणें. कोणाचें उपकार नये घेऊं बघा. जीव मरतो, गुदमरतो.” मला एका लेखकाचे शब्द आठवले. भांडवलशाही समाजरचनेंत आत्मा मारला जातो, व्यक्तित्व मारलें जातें. आपण आगतिक होतो. स्वत:ला आशा, आकांक्षा, स्वप्नें, सारें दूर ठेवावे लागतें. दुसर्‍याच्या लहरीवर नाचावें लागतें, त्याला आवडेल असें बोलावें लागतें. तो सांगेल हें करावें लागतें. धर्मा म्हणाला जीव मरतो, गुदमरतो. केवढे सत्य, केवढी ही हिंसा ? हिंसा म्हणजे केवळ मान कांपणें, खंजीर भोसकणें, गोळी झाडणें एवढीच नव्हे; दुसर्‍यांच्या जीवांचा गुदमरा करून स्वत: सुखविलासांत राहणारे हिंसकच नव्हत का ? अधिक हिंसक. कारण तें आत्म्याचे मारेकरी गांधीजी म्हणाले होते, ब्रिटिश सत्तेनें केलेलें सर्वांत मोठें पाप, म्हणजे हिंदी राष्ट्राचा आत्माच मारला. या आत्म्याचा उद्धार कसा व्हायचा ? भांडवलशाहींत हें शक्य नाहीं. हुकुमशाही कम्युनिझम तेहि आत्मा, मारणारच, आत्म्याचा, मनोबुद्धीचा कोंडमारा न करता अन्नवस्त्र आनंद, लोकशाही समाजवादच कदाचित् देऊं शकेल. तीच एक आशा.

तिकडून पोलिस अंमलदार आला. धर्मा उठून केरसुणी मारूं लागला. मीहि निघून गेलों. माझ्या एका मित्राला मी लिहिलें. त्यानें धर्माच्या घरीं दहा रुपये पाठवले. धर्मालाहि पैसे मिळाल्याचा आनंद झाला. “भाऊ, पोरं रातचीं सुखानं झोंपतील. तुम्ही या आमच्या गांवाला. लागतील का तुमचे पाय ?”

“धर्मा, असें म्हणू नकोस. आपण सारीं साधीं माणसें. मी मूळचा तिकडचाच. पालवणीला मागे एक संन्यासी रहात होते.”

“ते बोबा जंगलांतील सांबाच्या देवळांत रहात. वाघरूहि आसपास असायचें. परंतु ते लंगोटीबाबा भीत नसत.”

“मी त्यांना भेटलों होतों. मला तिकडच्या आठवणी येतात. तुमच्या तिकडचीं करवंदे, काजू, कोकंब, बोंडे, सारे मेवे आठवतात. ती लालमाती, ते जांभे दगड, सारें आठवतें. परंतु मी पोटासाठी दूर, गेलो धर्मा.”

“पुन्हां या तुमच्या मुलखांत. आमच्यांत रहा. आमच्या पोरांना शिकवा. मी सुटेन सहा महिन्यांनीं. तुम्ही कधीं सुटाल संमदे ?”

“तडजोड झाली तर सुटूं. स्वराज्याशिवाय तडजोड नाहीं. परंतु धर्मा, तुला मी विसरणार नाहीं.”

दिवस गेले. त्यादिवशीं मी जरा खिन्न होतों. कधीं कधीं अकस्मात मला आईची आठवण येते नि मी त्यादिवशीं दु:खी होतों. जणू ती बोलावित आहे असें वाटतें. मी माझ्या विचारांत होतों. भावसमाधींत होतों.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel