“दादा !”
“कोणी हांक मारली  ? मी पाहिले. तो दारांत धर्मा उभा.
“ये धर्मा ये आंत ये बस.”
“तुमच्याजवळ कसें बसायचे भंगीकाम करणारे आम्ही.”
“म्हणजेच माझ्या आईसारखे. ये धर्मा.”
“धर्मा आंत आला. माझ्या घोंगडीवर बसला. त्याच्या हातांत कागद होता.
“पत्र आलें वाटतें घरचें ?”
“पत्र येऊन चार दिवस झाले.”
“कोणी वाचून दाखवलें ?”
नेहमीं तुम्हांला किती त्रास द्यायचा ? दुसर्‍याकडून घेतले वाचून. परंतु कागदाचा जबाब तुम्हीच लिहा. तुम्ही पोराला चार गोष्टी समजावून सांगा. पोरगा बिघडला बघा. वाचा हा कागद.”

तें पत्र मी घेतलें नि वाचलें. काय होतें त्यांत ?
“रा.रा. धर्मास रमीचा कागद.

तुम्ही पोराला लाडावून ठेवलात. फार शेफारला. तुम्ही कैदेंत. संसार कसा मी चालवू ? धाकटी जानकी सुद्धा मोळी घेऊन विकायला जाते. परंतु हा रामा एवढा मोठा पोर. त्यानं कां काम करूं नये ? खोताने कामाला बोलावले होतें. दोन दिवस गेला. परंतु तेरोज उठेच ना. अरे पोरा उठ लक्कन, कामाला जा. खाल काय ? ऊठ. असें मी म्हटलें. तर सापाप्रमाणें अंगावर आला. नाही जात कामाला असें म्हणाला. या पोरांनें का माझ्या अंगावर धांवून यांवे ? याला जन्म दिला तो का यासाठीं ? दोन गोष्टी या पोराला लिहा. तुम्ही कधीं सुटणार ?  मला धीर नाहीं धरवत. सखू तर अगदी उघडी. चिंधी नाहीं तिच्या अंगावर. परंतु तुम्ही काय कराल ? प्रकृति सांभाळा, जिवास जपा. खोताचे कोठार कशाला फोडायला गेलांत ? आणखी थोडें उपास घडले असते. नशिबांतले थोडंच चुकणार. तुमच्या वाटेकडे डोळे आहेत. पोराला समजुतीचा कागद लिहा.”

मी तें पत्र वाचलें. मला वाईट वाटलें. मी त्यादिवशी माझ्या देवाघरी गेलेल्या आईच्या विचारांत होतों आणि हें पत्र एका मातेचेंच होतें. श्यामच्या आईतील श्याम आपल्या आईवर अपार प्रेम करी. तो तिचें काम करी, तिचे पाय चुरी; परंतु धर्मांचा हा रामा, हा आपल्या आईच्या अंगावर धांवून जातो, हात उगारतो. कां बरें असें ? कां हा फरक ? रामाचें का आईवर प्रेम नव्हतें ? परंतु तें प्रेम दारिद्र्यांत गोठून गेले. थंडीच्या दिवसांत श्याम लौकर उठला तर त्याची आई म्हणे, नीज अजून जरा. इतक्या लौकर कशाला उठतोस ?” परंतु रामला त्याची आई थंडीत उठवत, कामाला जा म्हणे, मोळी आण म्हणते. दोन दिवस रामा उठला. त्या दिवशीं त्याला कंटाळा आला असेल. पांघरून घेऊन पडला असेल. बारा वर्षांचा तो पोरं. लकडा लावला. तो संतापून तिला मारायला धांवला. नाहीं जात कामाला म्हणाला. कोणाचा दोष ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel