“दादा.” धर्मानं हांक मारली.
“काय रे धर्मा?” मी म्हटलें.
“हें पत्र वाचून दावा.”
“कोणाचें पत्र?”
“पोराचा असेल कागद, दुसरं कोण लिहिणार?” मी पत्र हातांत घेतले. पालवणीहून आलेलें होतें, कोंकणातील पद्धतीप्रमाणें लिहिणाराचे वाचणाराला रामराम असें शेवटीं होतें. पत्र नीट लावून मी वाचलें. तें पुढीलप्रमाणें होतें.
“रा.रा. धर्मास रमीकडून कागद देण्यांत येतो की तुम्ही कधीं सुटून याल इकडे सर्वांचे डोळे आहेत सहा महिने गेले. अजून आठ आहेत म्हणतां. साहेबाला सांगून लौकर सुटा. चार दिवसांपूर्वी येथें वादळ झालें. असें जन्मांत कधीं झालें नव्हतें, आपल्या झोंपडीवरचा शाकार सारा उडून गेला. थंडी मनस्वी पडतें. रात्रीं वारा येतो. पोरें गारठतात. काय करायचें ? कर्ज मागायला गेले तर चोराला कोणी द्यावें असें म्हणतात. परवां तुमचा लाडका रामा तें शब्द ऐकून अंगावर धांवला. मी आंवरले. पोराची भीति वाटते. नागाच्या पिलावाणी फण् करतो. गरिबाला असें करून कसें चालेल? त्याला चार शब्द लिहा. आणि तुमच्या तेथें स्वराज्यवाले आहेत. कोणाला दहा रुपये पाठवायला सांगा. पेंढे घेऊ आणि चंद्रमौळी घर शाकारूं. पोरांना थंडी कमी लागेल. तुम्ही जपा. येईल दिवस तो जातच आहे. लौकर सुखरूप या.”
अशा अर्थाचें तें पत्र होतें. लिहिणारा हुशार असावा. आम्हां स्वराज्यवाल्यांचीहि कसोटी घ्यायची त्यानें ठरवलें असावें. पत्र वाचून झाले.
“देवाची गरिबावरच धाड. मोठे वाडे नाही पडायचे, ते नाही उडायचे. आमचीं घरे उघडी पडायचीं. कोठून आणतील शाकार? थंडीचे दिवस.”
“मी माझ्या बाहेरच्या एका मित्राला तुझ्या घरीं दहा रुपये पाठवायला लिहितों.”
“कशाला उपकार घ्यायचे?”
“उरकार कसचे धर्मा? एकमेकांनीं एकमेकांस मदत नको का करायला? आणि मी तरी मित्रालाच लिहिणार.”