हिंग, हिरा हिंग, याच्या जाहिराती असतात. हिंग म्हणजे फोडणीचा प्राण, स्वयंपाकघरांत फोडणी असेल तर ओटीवर वास जातो. कोंकणातून लहानपणीं कधीं मुंबईस आलों तर येतांना हिंगाचा डबा घेऊन ये असे निरोप असायचे. ताकाच्या फोडणीला हिंगाचा वास किती छान येतो!
आपण नाना वस्तु नाना पदार्थ उपभोगीत असतो. परंतु आपणांस त्या वस्तु, ते पदार्थ मिळावेत म्हणून कितीजण तरी तडफडत असतात ! किती जणांचे तरी आयुष्य जगाला सुखानें नांदतां यावें म्हणून कमी होत असतात. जमशेदपूरचा टाटांचा लोखंडाचा कारखाना देशाला लोखंड, पोलाद पुरवीत आहे. परंतु हजारो कामगार तेथें भट्टीजवळ राबून क्षीणायु होत असतात. पंधरा वर्षाहून अधिक काम म्हणे तेथें करता येत नाहीं. डोळे बिघडतात, आयुष्य कमी होतें.
परंतु टाटांच्या अजस्त्र भट्ट्यांनीच आयुष्य कमी होतें. डोळे अधू होतात असें नाहीं. तुम्ही आम्ही रोज जो हिंग वापरतो, तो तयार करणार्यांचेही डोळे असेच अधू होतात. त्या शेंकडों श्रमणार्यांची आपणांस कल्पनाही नसते.
मुंबईच्या मांडवी भागांत एका मित्राबरोबर एकदा गेलो. तिकडे सारी श्रमणार्यांची वस्ती. मोठमोठे धंदेवाले, वखारीवाले तिकडे आहेत आणि त्यांच्या वखारीतून शेंकडों कामगार काम करतां करतां बेजार होत असतात. इकडील कामगारांच्या संघटना नाहींत. मुंबई सरकारचा औद्योगिक-कलहनिवारण कायदा तिकडे मोठमोठ्या उद्योगधंद्यांना लागू पडतो. परंतु इकडे यांत्रिक उत्पादन थोडेंच आहे ? इकडे हमाल लोक. कोणी खंडोगणती धान्याचें पीठ तयार करीत असतात! नाकातोंडांत तें पीट जात असतें. परंतु मालक देईल ती मजुरी. त्यांची संघटना कोण कशी करणार ? कोणी पीठ तयार करणार, तर कोणी कुटून कुटून हिंग तयार करणार. हिंग तयार करण्याची कहाणी मोठी दु:खदायकं आहे.
“तुम्हांला हिंग कामगाराना बघायचे आहे ? येतां ?” मित्रानें विचारलें.
“हिंग तयार करतात म्हणजे काय ?”
“चला आपण पाहूं.”