“तुम अजून खरे गांधीवादी नाहीं झाले.” एक शेटजी म्हणाले.
“युद्धाच्या काळांत ऑस्ट्रेलियन लोजिरांनीं मुंबईत चावटपणा सुरू केला तेव्हा महात्माजींनीं लिहिलें कीं हिंसाअहिंसेचा सवाल नाहीं. सतित्वाच रक्षण झालच पाहिजे! मला गांधीवाद तुम्ही नको शिकवायला.” ते आदिवासी सेवक म्हणाले.
“जाऊं द्या. ते आदिवासी गेले ना ? त्यांना शंभर रुपये पांच हजारांच्या जागी आहेत. उगीच आपला वाद कशाला ? आतां आपण निघू सारे.” अधिकारी म्हणाले.
नमस्कार झाले. सलाम झाले. साहेबजी, प्रकार झाले.
शुक्री संचित असे. तिच्या तोंडावर अलिकडे कधीं हसूं दिसत नसे. गरीब लोक दु:खे उगाळीत कधीं बसत नाहीत. एकप्रकारें संपूर्ण जीवन ते जगत असतात. दु:खीचा बाऊ करण्याची शिष्ट लोकांची पद्धत असते. गरीब दु:खांना महत्त्व देतील तर त्यांना जगताच येणार नाहीं. साधें फूल पाहून, एखादा सुन्दर पक्षी पाहून, एखादा मासा मिळाला, एखादा ताडीचा द्रोण मिळाला तर लगेच दु:खें विसरून तें हसतील, आनंदतील. मग शुक्री अशी कां बरें ? वास्तविक तिचा स्वभाव आनंदी. ती अजून झाडांवर चढे. फांद्यांवर झोंके घेई. ती रानफुलें आणी आणि केंसांत गुंफी. परंतु अलिकडे हा सारा खेळकरपणा पार लोपला. काय झालें ? तिच्या जीवनचंद्राला कोणतें ग्रहण लागलें होतें?
त्या दिवशी तिचा नवरा खुचींत होता. मंगळ्या शुक्रीकडे पाहून हंसे. त्याला आनंद झाला होता. परंतु शुक्रीचें मुख खिन्न नि उदासच होतें. त्याच्या आनंदाचें प्रतिबिंब तिच्या तोंडावर उठेना, उमटेना, कां बरें असें?
“अग, हंस कीं जरा ! मी हंसतो आहे आणि तुझं तोंड कां कोणी मेल्यावाणी ? तुला किती दिवसांत मारलें नाहीं म्हणून का राग ? दोन तडाके देउं म्हणजे हंसशील ? बायकांचे सारे न्यारे. त्यांना हंसवायला जावं तर त्या रडतात. त्यांना रडवायला जावं तर त्या हंसतात. माझ्या हातच्या थपडा तुला गोड वाटतात. होयना ? बोल की सटवे!”
शुक्री कांही बोलली नाहीं. ती झोपडींतून उठून बाहेर गेली. शून्य मनानें ती कोठे तरी पाहात होती. मंगळ्या पाठोपाठ आला. एका झाडाखाली ती पाठमोरी बसली होती. त्यानें हळूच जाऊन तिचे डोळे धरले.
“हें काय ? रडतेस तूं ? झालं काय तुला ? अग, तुझं पोट मोठं पाहून मला मघांसारखं हसूं येत होतं. माझा आनंद मनांत मावत नव्हता ! शुक्रीला बाळ होणार म्हणून मी खुशींत होतों. अशी रडतेस कां ? तुला कां चिंता वाटते ? त्या पाद्याच्या इस्पितळांत तुला नेऊन ठेवूं कां ? शुक्री, काळजी नको करूं या झाडाला बाळासाठी झोंका बांधू. त्याला आपण गाणीं गाऊं, नको रडूं.”