‘थकवा आहे. मी इंन्जक्शन देतों. बरें वाटेल. डोसहि देईन ते चार तासांनी द्या. झोंप लागली तर मात्र उठवूं नका. विश्रांति हवी आहे. मेंदू थकला आहे.’ डॉक्टर म्हणाले.
त्यांनी इन्जक्शन दिलें नि ते गेले. त्यांच्याबरोबर गंगू गेली. ती औषध घेऊन आली.
‘जयन्ता आ कर.’ ती म्हणाली.
त्यानें तोंड उघडलें. तिनें औषध दिलें. तो पडून राहिला. सायंकाळची वेळ झाली. आई देवदर्शनास गेली होतीं. वडील अजून आले नव्हते. इतर भावंडे खेळायला गेली होतीं.
घरीं जयन्ता नि गंगू दोघेंच होतीं.
‘गंगूताई, माझ्या खिशांत पैसे आहेत. तूं इन्जक्शन घे. आणि आपल्या आईला आंगठीची हौस होती. तूंच केव्हातरी म्हणाली होतीस. त्या अंगठीसाठीं हे मी पैसे जमवून ठेवलें आहेंत. तूं तिला एक आंगठी घेवून दे.’
त्याच्यानें बोलवेना. तो दमला. डोळे मिटून पडून राहिला. आतां सारीं घरीं आलीं होतीं. जयन्ता बरा आहे असेच सर्वांना वाटत होतं. जेवणें खाणें झालीं.
‘तूं थोडें दूध घे.’ आई म्हणाली.
‘दे, तुझ्या हातानें दे.’ तो म्हणाला.
भावंडे निजलीं. वडील, आई नि गंगू बसून होतीं.
‘तुम्ही निजा. मी त्याच्याजवळ बसतें. गंगू, मग मी तुला बारा वाजतां उठवीन.’ वडील म्हणाले.
‘आणि दोन वाजल्यावर गंगू तूं मला उठव. मग मी बसेन.’ आई म्हणाली.
‘तुम्ही सारीं निजा. मला आतां बरें वाटत आहे. खरेंच बाबा, तुम्ही दिवसभर दमलेले. आणखी जागरण नको. निजा तुम्ही.’ जयन्ता म्हणाला.
‘जयन्ता, मला आतां संवयच झाली आहे दिवसभर काम करण्याची. बैल घाण्याला न जुपला तरच आजारी पडायचा. परंतु माझ्याबरोबर लहान वयांत तुम्हांसहि घाण्याला जुंपून घ्यावें लागत आहे याचें वाईट वाटतें.’