“उपकार कसले बाळ ? ज्याच्याजवळ आहे त्यानें दुसर्याला देणें हा धर्म आहे. सारें विश्व म्हणजे कुटुंब ही भावना व्हयला हवी. तुझ्यासारखी सुंदर उमदी मुलें, त्यांची अशी आबाळ व्हावी याहून अधर्म तो कोणता ? कामाला तयार असणार्यास जेथे काम मिळत नाहीं तेथें कोठून सुखसौभाग्य येणार ? ही सारी समाजरचना बदलायला हवी. समाजवाद आणायला हवा.” मी बोलत होतो. “समाजवाद म्हणजे थोतांड । ”ते गृहस्थ म्हणाले. “समाजवाद म्हणजे सद्धर्म, म्हणजेच खरी संस्कृती. बाकी सारा फापट पसारा आहे.” मी म्हटलें. “येतों, दादा.” असें म्हणून तो तरुण गेला.
दोनतीन महिने गेले. दुपारची वेळ होती. मी चिंचपोकळी स्टेशनांत गेलों. एका बाकावर एक तरुण निजला होता. तोच फाटका सदरा अंगात. तेंच करुण मुखमंडल. मी त्या मुलाला ओळखले. मी त्याच्या जवळ बसलों, त्याला थोपटावें असें वाटलें. हा जेवला असेल का, असा मनांत विचार आला. आणि जेवला नसेल तर ? मी माझ्या खिशांत हात घातला. फक्त दोन आणे खिशांत होते. मला वाईट वाटत होतें.
इतक्यांत एक जाडजूड गृहस्थ आले. तलम धोतर ते नेसले होते.
अंगात स्वच्छ लांब कोट-गळपट्टीचा कोट. डोक्यावर एक श्रीमंती टोपी. हातांत सिगारेट. बोटातून अंगठ्या झळकत होत्या. पायातील बूट नुकतेच पॉलिश केलेले चकाकत होते. गृहस्थ बाकाजवळ आले. त्यांच्या ऐसपैस देहाला बसायला बाकावर जागा नव्हती. कडेला त्यांना बूड टेकता आले असते. परंतु त्यांच्या प्रतिष्ठेचा तो अपमान झाला असता.
“ऊठ. ए सोनेवाला, ऊठ जाव. ही का झोपायची वेळ आहे का ? खुशाल झोपला आहे. ऊठकर बैठो.” तो रुबाबदार मनुष्य गर्जला.
“निजूं दे त्याला, तुम्ही येथे बसा.” मी म्हटलें.
“अहो, ही का झोपायची वेळ ? रात्रीं चोर्या करतात नि दिवसा झोंपा काढतात. ही बाकें जणुं यांच्या बापाची इस्टेट!” ते गृहस्थ बसल्या बसल्या बडबडत होते.
तो मुलगा उठून बसला. त्यानें माझ्याकडे पाहिलें. तो उभा राहिला.
“दादा , बसा तुम्ही.” तो प्रेमानें म्हणाला.
“मी त्याच्याजवळ बसलो. त्याचे डोळे भरून आले होते.
“आज कांहीं खाल्लें आहेस का ?” मीं विचारलें!
“होय, दादा. मला एका गिरणीत काम मिळालें आहे. रात्रीं जातो कामाला. हळुहळू येथें शिकेन. सध्या थोडेंफार मिळतें. घरीही दहा रुपये पाठविलें. ज्या दिवशीं मनिऑर्डर पाठवली, त्या दिवशीं मला किती आनंद झाला होता म्हणून सांगूं!”