आत्मा बद्ध होतो, जखडला जातो. आत्मा वासनांचा दास होतो, रडकुंडीस येतो. या बंधनातून मुक्त होण्यासाठी आत्मा धडपडतो. त्यातून मुक्त होता आले तर आत्मा आनंदेल. अज्ञानाचा नाश अंतर्ज्ञानाने, सहजस्फूर्त दैवी ज्ञानाने होतो. वासनांचा नाश नैतिक धडपडीने, उत्तरोत्तर वर जाण्याच्या अविरत प्रयत्नशीलतेने होतो.
पूर्वग्रह नसणे ही गोष्ट सापेक्ष आहे. आपण संपूर्णपणे पूर्वग्रह विरहित असे स्वत: बुद्धही म्हणू शकले नसते. कर्म व पुनर्जन्म ही तत्त्वे ते जणू स्वत:सिद्धच मानतात. गृहित सत्ये समजून स्वकारतात. मनुष्य वागेल तसा बनेल. आपणच आपले भले वा बुरे नैतिक जग निर्मित असतो. प्रत्येक विचार, भावना, संवेदना, संकल्प यांचा परिणाम आपणावर, आपल्या वाढीवर, आपल्या विकासावर होत असतो. मानवजात सदैव स्वत:ला रंगरूप देत आहे; आकार देत आहे. त्या अदृश्य भूतकाळातून, भूतकालीन विचारांतून व घडामोडींतून आज जे आहे ते निर्माण झाले आहे. शाश्वत न्यायीपणाच्या सार्वभौम सत्तेखाली हे सर्व जीवन चालले आहे, असे बुद्धांस दिसते. आपल्या कर्माचे परिणाम आपणास कधीही चुकविता येणार नाहीत. दु:ख, रोग, हानी, निराशा, अपयश, प्रेमाच्या वेदना व जखमा, होतूंची, मनोरथांची विफलता, या सर्वांत नैतिक तत्त्व ओतप्रेत भरलेले आहे. नैतिकदृष्ट्या या सर्वांना महत्त्व आहे. नैतिक कार्यकारणभावामुळे या सर्व गोष्टींना निश्चितता प्राप्त होत असते. स्वार्थाचे शासन होते; नि:स्वर्थीपणाला पारितोषिक मिळते. मनुष्याला आज ना उद्या स्वत:च्या कृत्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे बुद्ध नि:शंकपणे म्हणत. त्यांची ही निश्चितता खोल व गंभीर होती. एझिकेलच्या अर्थपूर्ण शब्दांत म्हणायचे झाले तर, ‘आपणास आपल्या दुष्टपणाची लाज वाटेल. आपल्या दुष्टपणामुळे आपणास स्वत:चा वीट येईल.’ बुद्ध म्हणतात.’माझे कर्म हीच माझी मिळकत, हीच माझी संपत्ती, हाच वारसा. माझे कर्म म्हणजेच मला धारण करणारा गर्भाशय. माझे कर्म म्हणजेच माझी जात, माझा वंश. माझे कर्म म्हणजेच माझा आधार.’