बुद्धधर्मीय वाङमयाच्या आधीचा ऋग्वेद स्मृतीच्या बळावरच जसाच्या तसा राखून ठेवण्यात आला. नंतरच्या वाङमयापेक्षा ऋग्वेदात किती तरी कमी पाठभेद आहेत. या गोष्टीवरुनही त्या काळात स्मरणशक्ती किती केळवली गेली होती ते दिसून येते. उत्तरकाळात मूळच्या बुद्धधर्मीय ग्रंथांचे संपादन करताना जरी बरेचसे फेरफार केलेले असले, तरीही या थोर धर्मसंस्थापकाची सुप्रसिद्ध वचने, नाना कृत्ये, यांचा पुष्कळच निश्चितपणे अभ्यास करता येणे शक्य आहे.  बुद्धांच्या जन्माच्या वेळेस अनेक चमत्कार घडले, अनेक अद्भुत प्रकार घडले, अशी अनैतिहासिक वर्णने आहेत. परंतु त्यावरुन बुद्धांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या पहिल्या अनुयायांना किती दिव्यता व अपूर्वता वाटत होती एवढे दिसून येते. ते प्राचीन काळातील पहिले अनुयायी भक्त होते, चिकित्सक नव्हते.  पाली ग्रंथ, सीलोनमधील जुने ऐतिहासिक ग्रंथ व संस्कृत ग्रंथ या सर्वांची गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या बाबतीत एकवाक्यता आहे. गौतम बुद्धांचे बाल्य व तारुण्य यासंबंधीच्या अनेक दंतकथा आहेत यात संशय नाही. परंतु अशा काही अवास्तव कथा जरी त्यांच्या चरित्राभोवती गोळा झालेल्या असल्या, तरी त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या वंशपरंपरेविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.

ख्रिस्तपूर्व ५६३ मध्ये बुद्ध जन्मले. शाक्य नावाच्या क्षत्रिय कुळात ते जन्मले. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोदन. काशीच्या उत्तरेस सुमारे शंभर मैलांवर नेपाळच्या सीमेवर कपिलवस्तु नामक शहरी हे क्षत्रिय घराणे राज्य करीत होते. सम्राट अशोकाने पुढे ही जागा शोधून तेथे एक स्तंभ उभारला व तो उद्याप उभा आहे. बुद्धांचे मूळचे नाव सिद्धार्थ असे होते. गौतम हे कुलनाम होते. बुद्धांच्या जन्मवेळेस जे उपाध्याय उपस्थित होते, त्यांनी भविष्य केले, की हे बालक जर राज्य करु इच्छील तर चक्रवर्ती होईल; परंतु जर पारिव्राजिक यतिजीवन कंठू पाहील तर बुद्ध होईल. एकच व्यक्ति एकच वेळी चक्रवर्ती व बुद्ध होणे अर्थातच अशक्य होते. कारण ज्याला धर्ममय जीवन उत्कटपणे कंठावयाचे आहे, त्याने संसार त्याग केलाच पाहिजे. सांसारिक जीवनाचा त्याग ही तर परमार्थिक जीवनाची पहिली पायरी. सूप्तनिपातांत एक गोष्ट आहे, की एकदा असित नावाचा एक वृद्ध मुनी या लहान मुलाला बघायला आला. मुलाला पाहून त्याने भविष्य केले, की हे मूल अलौकिक विभूती होईल. आणि हे बालक महात्मा होऊन जेव्हा जगाला नवधर्म देईल, त्या वेळेस आपण जिवंत नसू. असे मानात येऊन असित मुनींच्या डोळ्यातून अश्रू घळघळले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel