स्वत: बुद्ध ही शिकवण देत ४५ वर्षे हिंडत होते, दूरवर त्यांनी प्रवास केला. त्यांच्याभोवती अनेक अनुयायी गोळा झाले. ब्राह्मण व यतिसंन्यासी, तपस्वी व साधू, परित्यक्त व अनुतप्त, थोर कुळातील स्त्रिया, असे नानाविध लोक त्यांचा संघात सामील झाले. या आपल्या शिष्यांना योग्य अशी शिकवण देणे, या संघाची नीट व्यवस्था करणे हे बुद्धांचे मुख्य काम होते. या कामात त्यांचा पुष्कळ वेळ जाई. आजच्या काळात गौतम बुद्धांस आपण बुद्धिवादी म्हणू, त्यांची प्रवचने वाचीत असता ते सारासारबुद्धीवर, विचारशक्तीवर किती भर देत असत ते दिसून येते. बुद्धींनी जे नितीमार्ग दाखविला त्यांची पहिली पायरी म्हणजे योग्य विचार करणे, अचूक दृष्टी घेणे. बुद्धिप्रदान अशी चिकित्सक दृष्टी घ्यावयास बुद्ध सांगतात. मानवजातीचे ध्येय, मानव्याची दृष्टी, यांना पदोपदी अडथळे आणणारी सारी भ्रमजाळे झगडून दूर करणे हे बुद्धांचे पहिले काम होते. यासाठी त्यांची किती धडपड  किती यातायात! कळत नसून उगीच सर्वज्ञत्वाचा आव आणणा-यांना ते स्पष्ट प्रश्न विचारतात. गूढ व संदिग्ध धर्मवचने बोलणा-यांना’ या शब्दजालांतील स्पष्ट अर्थ काय?’ असे ते विचारतात. बुद्धांना पोकळ, शाब्दिक धर्मवल्गना नको असत. ह्यांतील अर्थ सांगा, असे ते आव्हनपूर्वक विचारीत. त्या काळी आपणास ईश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान आहे असे अनेक जण म्हणत. ईश्वर आहे की नाही याविषयीचे केवळ मत ते सांगत असे नाही, तर ईश्वराचे विचार काय आहेत? तो काय करतो? कसा वागतो? याचेही ज्ञान आपणास आहे असे लोक म्हणत. ‘तुम्ही उगीच ही अध्यात्मिकतेची सोंगेढोंगे माजविता’ असे बुद्ध त्यांना स्वच्छ सांगत. तेविज्जसूत्तांत बुद्ध स्पष्ट सांगातात, की ‘धर्मोपदेशक ब्रह्मादिकांविषयी बोलतात त्यांनी त्याब्रह्मादिकांना कधीही प्रत्यक्ष पाहिलेले नसते. राजवाडा कोठे बांधावयाचा हे माहीत नसताना एखाद्याने जिना बांधावा, कोणती स्त्री हे सांगता येत नसूनही एखाद्याने प्रेमात पडावे, नदीच्या परतीरास पोहचू इच्छिणा-याने त्या तीरालाच स्वत:कडे येण्यास सांगावे, त्याप्रमाणे हे सारे आहे.’ आपणांपैकी पुष्कळांची धर्मिक वृत्ती असते. परंतु ही वृत्ती कोठे वळवायची याची आपणस स्पष्ट कल्पना नसते. भक्ती डोळस व बुद्धिग्राह्य असावी म्हणून ती सत्यावर आधेरलेली असली पाहिजे. बुद्ध धर्ममय लोकांना ब्रह्म-विहाराचे महत्त्व नेहमी विशद करुन सांगत असत. ब्रह्मविहार म्हणजे ब्रह्मात राहणे; ब्रह्मविहार म्हणजे एक प्रकारचे चिंतन; ज्या स्थितीत आपणास चराचराविषयी प्रेम वाटते अशी ती एक मनाची स्थिती असते. त्या वेळेस कोणाविषयीही मनात द्वेषभाव नसतो. परंतु ब्रह्मविहार म्हणजे निर्वाण नव्हे. निर्वाणाकडे अष्टविध मार्गांनी जावयाचे असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel