बुद्ध म्हणाले, “ मी जे ज्ञान मिळविले ते सारे तुम्हांस सांगितले नाही. जे सांगितले त्यापेक्षा न सांगितलेले किती तरी अधिक आहे. आणि शिष्यांनो, मी ते तुम्हाला का बरे सांगितले नाही? कारण त्याने तुमचे हित नाही. तुमचे पावित्र्य वाढवण्यास त्यामुळे मदत नाही होणार; ते ज्ञान तुम्हाला ऐहिकापासून दूर वळवील असे नाही; ते ज्ञान सर्व इच्छा ताब्यात आणा असे नाही सांगणार; जे जे क्षणिक आहे ते सोडा असे नाही म्हणणार; ते ज्ञान शांतीकडे, प्रकाशाकडे, निर्वाणाकडे नेणारे नाही; म्हणून मी ते सांगितले नाही.”
एकदा मालंक्यपुत्त तर बुद्ध आपल्या आध्यात्मिक प्रश्नांना उत्तरे देत नाहीत म्हणून रागावला. तो बुद्धांना आव्हान देऊ लागला. त्याचं ते करणे अविनयाचे वाटते. तो बुद्धांना म्हणाला . “माझ्या प्रश्नांची उत्तरे द्याल तर तुमचा शिष्य म्हणून तुमच्या धर्मात मी राहीन; धर्ममय असे हे भिक्षुजीवन कंठीन; परंतु जर उत्तरे न द्याल तर धर्म सोडून मी पुन्हा संसारात रमेन. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देता येत नसतील, तुम्हाला ज्ञान नसेल, तर स्वच्छ सांगा, की मला या गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत.”
बुद्ध शांतपणे म्हणाले. “तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ पाहत नाही. परंतु एक दृष्टान्तरुप गोष्ट सांगतो. विषदिग्ध बाणाने घायाळ झालेला एक मनुष्य आहे असे समज. त्याचे मित्र धावत जाऊन वैद्याला घेऊन येतात. तो वैद्य जखमेतून तो बाण आता उपटणार तो जखमी मनुष्य ओरडतो, ‘ थांब, हा बाण मला कोणी मारला तो कळेपर्यंत मी तो काढू देणार नाही. हा बाण स्त्रीने मारला की पुरुषाने? ब्राह्मणाने, वैश्याने की शूद्राने? बाण मारणारा कोणत्या कुळात जन्मला होता? तो उंच होता, की वामनमूर्ती होता? तसेच हा बाणही कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या जातीचा, ते सारे सांगा. मग हा बाण काढा.’ तो जखमी मनुष्य जर असे म्हणाला तर काय होईल? या सर्व प्रश्नांची त्याला उत्तरे मिळण्यापूर्वीच तो मरून जाईल. त्याप्रमाणेच या जगापलीकडे, विश्वापलीकडे काय आहे, वगैरे प्रश्नांची उत्तरे मागणारा शिष्य हे दु:ख जगात का आहे? कोठून आले? कधी थांबेल? इत्यादी प्रश्नांची सर्व उत्तरे मागणारा शिष्य ती उत्तरे मिळण्यापूर्वीच मरुन जायचा”