जो मुक्तात्मा होतो, तो सर्व नाशिवंत संघातांपासून मुक्त होतो. परंतु याचा अर्थ तो शून्य होतो असा नाही. तो काहीतरी सत्य रुपाने, शाश्वत रुपाने असतोच. अवर्णनीय असे ते स्वरुप असते. ज्या वेळेस यमक म्हणाला, की ज्याने सारे पाप धुतले आहे, ज्यांच्यातील सारे असत् नष्ट झाले आहे, असा भिक्षु मरणोत्तर उरत नाही, त्याला मरणोत्तर जीवन नाही, तेव्हा बुद्ध म्हणाले, “हे पाखंड मत आहे. ही नास्तिकता आहे. या जीनातही संताचा स्वभाव समजणे कठीण आहे. मुक्ताचे चरित्र समजणे बुद्धीच्या पलीकडचे आहे.” एकदा वत्साला बुद्ध म्हणाले, “नामरुपापासून जो मुक्त होतो, तो अनंत होतो. ज्याप्रमाणे सागर मोजता येत नाही, तद्वत् सिद्ध पुरुषही अपरिमेय आहे.” तर्कातीत अशी ती जीवनाची दशा आहे. त्या स्थितीचे नीट आकलन करता येणार नाही. ‘नेति नेति’ अशा नकारानेच त्या स्थितीचे वर्णन करता येईल. अशा स्थितीच्या वर्णनात अशी नकारात्मक विशेषणेच पदोपदी येतात. ती दैवी गुहा, तो अनंत ईश्वर, तो पराहीन सागर, ते अनंत वाळवंट, असे शब्द या नेति नेति धर्मतत्त्वज्ञानात येतात. ती जी पूर्ण स्थिती, ती आपल्या ह्या सामान्या जीवनासारखी नसते. परंतु असे असले तरी काहीतरी भावरुप असे प्रत्यक्ष जीवन तेथे असते यात शंका नाही. तेथे सारा शून्याकार नसतो. एवढेच की ती अलौकिक दशा वाणीने वर्णिता येत नाही; मनाने आकलिता येत नाही. हे जगत् हा संसार म्हणजे सतत फरक होत जाणारा अखंड प्रवाह. परंतु निर्वाणातील जीवनात अखंड शांती. निर्वाणा म्हणजे अनंताच्या कुशीतील चिर विश्रांती. सामान्य अशा या मानवी जीवनातील जाणीवेपेक्षा त्या निर्वाणदशेतील जाणीव अशी निराळी असते. त्या जाणीवेला निराळेच नाव दिले पाहिजे. तिला अनात्म जगाची नेणीव म्हणा वाटले तर. आपणास या संसारात या अनात्म जगाची जाणीव असते; या बाह्य जगाची जाणीव असते. उपनिषदात म्हटले आहे, ‘तो जरी जाणत नसला, तरी सारे जाणतो.’ कारण ज्ञाता व जाणणे या गोष्टी अलग कशा करता येतील? जाणणे नष्ट होत नाही, परंतु ज्याला जाणावे असे पृथक काही उरतच नाही. ‘ते पाण्याप्रमाणे पारदर्शक बनते. ते एक आहे, अद्वितीय आहे, साक्षा आहे. ब्रह्माचे जग ते हे.’ सारे स्फटिकासारखे स्वच्छ व पारदर्शक आहे. तेथे कसला अंधार नाही, कशाचा विरोध नाही. तेथे चंचलाचे नावही नाही. बृहदारण्यक उपनिषदाच्या त्या सुप्रसिद्ध उता-यात याज्ञवल्क्य आपल्या पत्नीस मैत्रेयीस म्हणतात, ‘मुक्तात्मा परमोच्च सत्याशी, परब्रह्माशी एकरुप होतो. दुस-या कोणत्याही शब्दांत त्याचे वर्णन करता येणार नाही. ज्याप्रमाणे मिठाच्या खड्याला आतबाहेर निराळेपणा नाही, अंतर्बाह्य त्याची एकच चव, त्याप्रमाणे या आत्म्याला आतबाहेर दुसरे काही एक नसून त्याच्या अंतर्बाह्य एक ज्ञान संपूर्णपणे भरलेले असते. जीवात्मा या पंचमहाभूतांपासून जन्मतो व त्याच्याबरोबर गळतो. मरणोत्तर मग जाणीव नसते.’ हे शब्द ऐकून मैत्रेयीची वृत्ती जरा गोंधळल्यासारखी दिसते.