दूरदर्शीपणामुळे, आदरामुळे किंवा भीतीमुळेही पुष्कळ वेळा आपण आज्ञाधारक होत असतो. परंतु यामुळेच जर एखाद्याला आपण मानीत असू, तर त्याची सत्ता आहे, त्याचा खरा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने स्वत: विचार करावा अशी बुद्धांची निक्षून सांगी असे. स्वत:ची बुद्धी वापरण्याचे धैर्य प्रत्येकाने दाखवावे असे ते नेहमी सांगत. नानाविध उपपत्ती व मीमांसा, निरनिराळ्या विचारप्रक्रिया यांच्या चक्रात न पडता प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ते प्रत्येकाने पाहावे, असे ते म्हणत. तसेच दुसरीही गोष्ट ते सांगत. प्रत्येकाने स्वत:च्या प्रयत्नाने सत्याचा साक्षात्कार करुन घ्यावा, तो अनुभव घ्यावा. निरनिराळ्या मतांचे वादविवाद मनुष्याला पटकन काहीतरी घ्यायला लावतात. या वादविवादांनी माणसे शीघ्रज्ञानी होतात जणू. शांतपणे अविरत प्रयत्नाने सत्याचा शोध करणे त्यांच्या हातून होत नाही. सत्य ही अत्यंत पवित्र अशी पुरुषार्थ करुन प्राप्त करुन घेण्यासारखी वस्तू आहे. चर्चापटूंचे खेळणे म्हणजे सत्य नव्हे. जो स्वत:चा ज्ञानप्रकाश पेटवीत नाही, त्याला आत्म्याच्या जगात पाहता येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बुद्धांना केवळ बुद्धिप्रधान लोकांची करमणूक करायची नव्हती, तर बहुजनसमाजाला थोर व उदार असे विचार द्यावयाचे होते. सदगुणांचे प्रत्यक्ष आचरण हाच धर्ममय जीवनाचा खरा राजमार्ग, असे जनतेस सांगावयास बुद्ध उत्सुक होते. चौथा गोष्ट म्हणजे, आस्तिकवादी धर्मशास्त्र निरपेक्ष परब्रह्माची सापेक्ष संसाराशी गाठ घालताना त्या निरुपाधिक परब्रह्माला सोपाधिक व सापेक्ष बनविते. हे धर्मशास्त्र ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मांडू लागते. ईश्वर म्हणजे सापेक्ष जगातील जणू एक वस्तु. ईश्वर आहे म्हणणारे व नाही म्हणणारे, दोघेही त्या ईश्वराकडे बाह्य दृष्टीने, भौतिक दृष्टीने पाहू लागतात. ईश्वराच्या अस्तित्वासंबंधीची अपाल गूढता हे लोक ध्यानात घेत नाहीत. ईश्वराला सोपाधिक बनविणारे हे लोक त्याच्याकडे सृष्टीकर्ता, पिता, प्रियकर, सखा इत्यादी नात्यांनी पाहू लागतात. ईश्वराला उपाधीत पाहणारे जे हे धर्मशास्त्र, ते ईश्वराचा सान्त प्रतीके व उपाधी संबंध जोडून सारा गोंधळ निर्मिते. वास्तविक ते जे दिव्य आध्यात्मिक तत्त्व ते स्वयंभू आहे. ते निरपेक्ष आहे. त्याच्या अस्तित्वासाठी दुस-या वस्तूंच्या जवळच्या संबंधाची आवश्यकता नाही. ते स्वयंप्रकाशी तत्त्व आहे. सृष्टीच्या पसा-याहून, आपल्या मनातील विचाराहून अनंत पटींनी मोठे व निराळ्याच गुणधर्मांचे असे ते तत्त्व आहे. म्हणून बुद्ध अशा साकार परमेश्वरापासून दूर राहतात. ईश्वरासंबंधीच्या या सगुण कल्पना त्यांना पसंत नसत. ईश्वर परिपूर्ण आहे असे मानून, मनुष्य शेवटी कर्मवीर न होता त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून बसणारा होतो. प्रयत्नांची जागा श्रद्धा बळकावते.