गंभीर आध्यात्मिक भाव, अती उच्च प्रकारचे नैतिक सामर्थ्य आणि अत्यंत योग्य असा बौद्धिक संयम या तीन गोष्टींचे प्रभावी मिश्रण बुद्धांमध्ये होते. स्वत:मधील दिव्यत्वाची मनुष्याला आठवण करुन देणा-या ज्या थोर विभूती या भूतलावर क्वचित कधी जन्माला येतात अशांपैकीच बुद्धही एक आहेत. अशांच्या जीवनामुळे आध्यात्मिक जीवनाकडे आपण ओढले जातो. अशा विभूतींमुळे आध्यात्मिक जीवन सुंदर व आकर्षक वाटते. आपल्या हृदयात एक प्रकारचा नूतन अभिनव आनंद व उत्साह उचंबळतो. बुद्धांजवळ अलौकिक बुद्धी होती, परिणत प्रज्ञा होती. त्यामुळे परमोच्च सत्याचे त्यांना आकलन होऊ शकले. त्याबरोबरच, त्यांचे हृदय प्रेमाने व कारुण्याने ओतप्रोत भरलेले होते. म्हणून या दु:खीकष्टी मानवजातीला दु:खातून वाचविण्यासाठी त्यांनी सारे जीवन दिले. खरे थोर महात्मे मानवी व्यवहारांत भाग घेतात, सेवेत रमतात. जरी त्यांचे आत्मे दैवी असले, तरी जगाला कंटाळून दूर न जाता या जगातच राहून जगाचा उद्धार ते करु पाहतात. सेवापरायण अशा थोर गूढवादी संतांचाच परंपरा, प्रेममय व सेवामय अशा थोर अध्यात्मेत्त्यांचीच परंपरा बुद्धांनीही चालविली. त्या परंपरेला त्यांनी प्रतिष्ठा दिली, मान्यता दिली. त्यांचे दिव्य-भव्य व्यक्तिमत्त्व, त्यांची ऋषिसम दृष्टी, सत्यदर्शनाची त्यांची उत्कटता, जगताला संदेश सांगण्याची त्यांची तळमळ, दु:खीकष्टी जगताबद्दलची त्यांची जळजळीत प्रेमवृत्ती इत्यादी गोष्टींचा जे जे त्यांच्या सान्निध्यात येत, त्यांच्यावर परिणाम झाल्याशिवाय राहत नसे. यामुळे बुद्धांच्या चरित्राभोवती चमत्कार व कथा यांचे सागर जमले. सामान्य माणसे अशा अदभूत कथा निर्मून महापुरुषांविषयीचा आपला आदर प्रगट करीत असतात. आदरबुद्धी दाखविण्याचा हाच एक मार्ग त्यांना मोकळा असतो. बुद्ध हे इतर मानवांपेक्षा अनंत पटींनी श्रेष्ठ व थोक होते, ते अलौकिक होते, अद्वितीय होते, ही गोष्ट सामान्य जनता एरव्ही कशाने सांगणार? कशाने सिद्ध करणार आहे? आणि शेवटी तर पुढे पुढे संयमाच्या या थोर आचार्याला, प्रेमाच्या या महान उपदेशकाला, विवेकाचा व शहाणपणाचा मार्ग दाखविणा-या या थोर ऋषीला देवत्व देण्यात येते. जनता त्यांना देव करते. सर्वज्ञ, पूर्णपुरुष, जगदुद्धारक असे त्यांना मानण्यात येते. जसजसा काळ जात आहे, शतकांपाठीमागून शतके जात आहेत, तसतसे बुद्धांचे मोठेपण अधिकाधिकच तेजस्वी व स्पष्ट असे दिसून येत आहे. साशंकवादीही आज त्यांच्याकडे वळत आहेत. मानवजातीच्या इतिहासात युगप्रवर्तक अशा ज्या महनीय विभूती झाल्या, ज्यांनी स्वत:च्या काळाला व पुढील काळालाही संदेश दिला, अशांपैकीच भगवान बुद्ध हेही एक आहेत.