शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरि ज्ञान योगेश्र्वराचे। कवि वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।
परमार्थ, स्वधर्मप्रेम, राष्ट्रप्रेम, संघटन, प्रबोधन, समाजकारण, राजकारण, प्रपंच, काव्य, साहित्य, बलोपासना अशा अनेक विषयांचे सर्वस्पर्शी कर्ते, भाष्यकार आणि द्रष्टे, पुरोगामी राष्ट्रसंत म्हणजे समर्थ रामदास स्वामी!
श्री समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यातील जांब येथे ठोसरांच्या घरात झाला. हे सूर्योपासक घराणे होते. समर्थांचे पाळण्यातले नाव नारायण. बालपणापासून नारायण आपल्या विचारांनी, आचारांनी असामान्य वाटत होता. नारायणाने लग्नाच्या बोहल्यावरून आत्मोध्दारासाठी नाशिक पुण्यक्षेत्री धाव घेतली. दक्षिण गंगा गोदावरीचा पावन परिसस्पर्श अनुभवला व प्रभू श्रीरामचंद्राचे सान्निध्यही अनुभवले. गायत्रीमंत्राचे पुरश्र्चरण व रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू झाले.
‘धर्म संस्थापना जगजीवना। भरतखंडी करणे असे।’ यासाठी त्यांनी कठोर तपाचरण केले. टाकळी येथे संगमावर १२वर्षे तपाचरण केले. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ हा मंत्र धारण केला. भारतभर तीर्थयात्रा केल्या. संपूर्ण देश पाहून परिस्थितीचा अंदाज घेतला. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्या-खोर्यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.
समर्थांनी राष्ट्रउभारणीसाठी जसे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच लोकशिक्षण, प्रपंच, परमार्थ, विवेक या गोष्टींवरही भर दिला कारण यातूनच राष्ट्र उभे राहते, स्वराज्य स्थापन होते. लोकांनी साक्षर व्हावे यासाठी त्यांनी लिहिण्याची , वाचण्याची मोहीम काढली. आपल्या वचनात ते म्हणतात- ‘दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले -
जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।
प्रपंच सोडून जर परमार्थ केला, तर केवळ आत्मोन्नती होईल परंतु प्रपंच करून परमार्थ केला, तर राष्ट्रोन्नती होईल म्हणून ते म्हणतात की -
प्रपंची जे सावधन। तोचि परमार्थ करील जाण।
प्रपंची जो अप्रमाण। तो परमार्थी खोटा।।
समर्थांनी साहित्य, कला, आरोग्य, जीवनशैली, निसर्ग, बांधकाम, उद्योग या विषयांवरही लिहिले आहे. जीवनाचे कोणतेही अंग समर्थांनी सोडलेले नाही. सर्वच क्षेत्रांत उच्च ध्येय गाठण्यासाठी, यश मिळवण्यासाठी काय करावे, याचे तपशीलवार मार्गदर्शन समर्थ करतात.
परळी येथे मठस्थापना करताना मठाच्या परिसरात बाग करण्यात येत होती त्या वेळी त्यांनी बागेवरती एक अखंड प्रकरणच लिहीले. तसेच सामानगडावर किल्ले बांधताना लिहिलेल्या ‘कारखाने’ या प्रकरणाच्या पहिल्या समासात विटा कशा कराव्यात, बांधकाम या प्रकरणात मजुरांना कशी , किती कामे द्यावीत यासारखी सर्व माहिती त्यांनी दिली आहे.
याशिवाय गाणे कसे असावे हे सांगताना समर्थ लिहितात,
बाळके श्वापदे पक्षी। लोभती वेधती मनी।
चित्त निश्चिंत होतही। धन्य ते गायनी कळा।।
मराठी (प्राकृत) भाषेचा अभिमानही समर्थ व्यक्त करतात. समर्थ लिहितात,
‘येक म्हणजी मर्हाठी काय। हे तो भल्यासी ऐको नये।
ती मूर्ख नेणती सोय। अर्थान्वयाची।।
लोहाची मांदूस केली। नाना रत्ने साठविली।
ती अभाग्याने त्यागिली। लोखंड म्हणोनी।
तैसी भाषा प्राकृत।।’
असे अनेक विषय त्यांच्या साहित्यात आहेत. समर्थांची मराठी भाषा ही मोजक्याच पण ठसठशीत शब्दांत सर्व काही सांगणारी भाषा आहे. समृद्ध शब्दरचना, मराठी शब्दांची वैभवशाली उधळण, तर्कशुद्ध विचारांची रेखीव, नेटकी मांडणी आणि माणसाच्या जीवनाचे, अगदी छोट्या-छोट्या व्यवहारांचे सूक्ष्म निरीक्षण (अन् त्याचे प्रकटीकरण) ही समर्थांच्या साहित्याची आणखी काही वैशिष्ट्ये! विशिष्ट लय, गेयता हीदेखील त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये होत. त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना पण त्यांचे काव्य सहज मुखोद्गत होते. त्यांच्या साहित्यातील प्रत्येक वचन हे स्वानुभवातून आलेले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे. समर्थांची काव्यरचना आणि तिचे साहित्यगुण हा खरे तर स्वतंत्र अभ्यासाचाच विषय आहे.
विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य! त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.
सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ‘दासबोधा’ चे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत: अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्या (आजही मार्गदर्शक ठरणार्या) समर्थांनी इ.स. १६८१ मध्ये सज्जनगडावर समाधी घेतली.
जय जय रघुवीर समर्थ!
समर्थांचे वाङ्मय:
`श्रीमत् ग्रंथराज दासबोध' या पारमार्थिक ग्रंथाची रचना शिवथरघळ (महाडजवळील) येथे केली.
आत्माराम ग्रंथ, मनाचे श्र्लोक (मनोबोध), करुणाष्टके, सवाया, अभंग, पदे-चौपदी.
काही स्फूटरचना, भीमरूपी, मारुतीस्तोत्र, अनेक आरत्या .