विपरीत परिस्थितीतून केवळ स्वत:च्या प्रतिभेच्या व ज्ञानाच्या जोरावर वेगळ्याच उंचीवर पोहोचलेला एक समर्थ, प्रतिभावान कवी व विचारवंत.
घरी अठराविश्वे दारिद्रय असूनही मनाची श्रीमंती जपणार्या एका गंगाराम सुर्वे नावाच्या गिरणी कामगाराने नारायण या सापडलेल्या मुलाला बाप म्हणून आपले नाव दिले, माया दिली. अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थिती असतानाही नारायण सुर्वे यांना सातवीपर्यंत शिक्षण मिळाले. नंतर एका गिरणीत त्यांनी काही काळ काम केले. ‘कळू लागले तेव्हापासून, डबा घेऊन साच्यावर गेलो, घडवतो लोहार हातोड्याला, तसाच घडवला गेलो’... या शब्दांत ते त्या काळाचे वर्णन करतात. पुढे जगण्यासाठी धडपड करताना अक्षरश: पडेल ते काम केले. कधी हमाली तर कधी शाळेत शिपायाची नोकरी केली. तिथे आणखी शिकून ते प्राथमिक शिक्षकाचे काम करू लागले. एवढ्या कष्टमय वातावरणत वाढूनही या कवीमनाच्या हृदयात फारशी कटूता दिसत नाही. उलट माणसातील माणुसकीवर अपार श्रद्धा ठेवून मानव्याची जोपासना करणारा हा कवी आहे.
त्यांच्यावर मार्क्सवादी विचारसरणीचा पगडा आहे. कॉम्रेड डांगे, कॉम्रेड मिरजकर हे त्यांचे आदर्श. त्यामुळे त्यांनी आपल्या कवितांमधून सामाजिक क्रांतीचा जयघोष केला. कामगार जीवनाची बोलीभाषाच त्यांनी कवितेतून मांडली. स्वत:च्या प्रकृतीला जुळणारी निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी अधिक जवळीक साधणारी, गद्याच्या अंगाने जाणारी अशी विशिष्ट शैली त्यांनी निर्माण केली. व्यक्तिगत जीवनानुभव सामाजिक करणारी त्यांची कविता त्यामुळे वेगळी आणि उठून दिसणारी ठरली.
‘ऐसा गा मी ब्रह्म’ (१९६२) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’ (१९६६) या संग्रहाने साहित्यविश्र्व खळबळून टाकले. मुंबईसारख्या महानगरीत पोटासाठी पडेल ती कामे करणार्या वेगवेगळ्या स्तरांतील माणसांचे अनुभवविश्र्वच त्यातून त्यांनी उभे केले. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद’ झालेल्या आणि राबता-खपता आयुष्य मेणबत्तीसम विझवून घेणार्या कामगारांचे वास्तव त्यांनी जगासमोर आणले. त्यांच्या मुंबई, तुमचंच नाव लिवा, तेच ते तेच ते, जाहीरनामा, माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय, मर्ढेकर... या आणि अशा अनेक कविता खूप लोकप्रिय ठरल्या. ‘माझे विद्यापीठ’ ला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला.
मराठी कवितेला मध्यमवर्गाच्या वर्तुळातून बाहेर काढण्याचे काम सुर्वे यांच्या कवितेने केले. त्यांनी आपल्या कविता-वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रात व देशातही गावोगावी केले. समाजाच्या सर्व थरांत त्यांच्या कवितेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला.
‘कामगार मी आहे, मी तळपती तलवार’, असे म्हणत आपलेच भावविश्र्व ते कवितेतून कधी करारीपणाने मांडतात तर,
‘माझेही एक स्वप्न होते रे। जे मला पुरे करता आले नाही।
रोजच्या दमगिरीने तेवढी उसंतच दिली नाही, पण पुढचे जग तुझेच आहे...’
असा पुढच्या पिढीप्रती असणारा आशावादही ते कवितेतून मांडतात.
कोणतेही लौकिक श्रीमंतीचे, शिक्षणाचे, खानदानीपणाचे वलय मागे नसतानाही मनाची प्रगल्भता, वैचारिक उंची त्यांच्या कवितेतून प्रकट होते ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच खरी किमया आहे. १९९५ मधील परभणी येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. मध्य प्रदेश शासनाने कबीर पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार २००४ साली मिळाला. त्यांचे जाहीरनामा (१९७५), सनद (१९७५), नव्या माणसाचे आगमन (१९९५) असे काही कवितासंग्रहही प्रसिद्ध आहेत.