घनतमात जळता तुम्ही ठेविला दीप। तो अमर जाहला इथे क्रांतीचा स्तूप।।
शिल्पकार तुम्ही नव्या युगाचे ‘श्रीपाद’। कंठात घुमतो अखंड तव जयनाद।।
ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांच्या वरील ओळींतून कॉम्रेड डांगे यांची महानता स्पष्ट होते. भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे महान उद्गाते, समाजवादी विचारसरणीचे भारतातील भगीरथ आणि श्रमिक चळवळीचे पितामह म्हणजे कॉम्रेड डांगे होत.
यांचा जन्म नाशिक येथे झाला. नाशिकमध्येच त्यांचे शालेय शिक्षणही झाले. तरुणपणी त्यांच्यावर लोकमान्य टिळक यांच्या जहाल विचारांचा, व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडला. ते लोकमान्यांना आपले राजकीय गुरू मानत. लोकमान्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांचा मुंबईच्या कामगारांशी संपर्क आला. लोकमान्य टिळकांच्या कार्यालयातूनच त्यांना रशियन क्रांती, लेनिनचे चरित्र ही पुस्तके वाचण्यास मिळाली.
१९२० च्या असहकार आंदोलनापासून त्यांचा स्वातंत्र्यचळवळीत सातत्याने सहभाग होता. गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली, त्या विरोधात त्यांनी ‘गांधी विरुद्ध लेनिन’ हे पुस्तक लिहिले होते. १९२४-२५ मध्ये काही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांचे राज्य उलथविण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला होता. या कानपूर-बोल्शेव्हिक कटातील सहभागाबद्दल डांगे यांच्यासह सुमारे ३० कार्यकर्त्यांना, तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. तुरुंगात असतानाच, १९२५ मध्ये कॉम्रेड डांगे यांच्या पुढाकाराने ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षाची’ स्थापना करण्यात आली. तसेच याच वेळी ‘क्रांती’ या साप्ताहिकाची सुरुवात त्यांनी केली. ब्रिटिशांच्या विरोधातील मीरत (मेरठ) कटातील सहभागामुळे त्यांना सुमारे चार वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कामगार संघटनेचे व शेतकर्यांचे योगदान स्वातंत्र्यलढ्यात वाढवण्यासाठी डांगे यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. १९४६ मधील नाविकांच्या ब्रिटिशविरोधी बंडाला कामगारांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. ब्रिटिशांना शेवटचा, निर्णायक धक्का देणार्या या बंडाला पाठिंबा देण्यात कॉ. डांगे यांची भूमिका मोठी होती.
साम्यवादी, मार्क्सवादी तत्त्वज्ञानाशी डांगे हे आजीवन प्रामाणिक राहिले. राष्ट्रीय हित व भारतीय संस्कृती यांची जपणूक करत साम्यवादी विचारांचा प्रचार हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेआधी १९२२ मध्ये त्यांनी ‘सोशालिस्ट’ हे पहिले समाजवादी विचारसरणीचे साप्ताहिक सुरू केले होते. दुसर्या महायुद्धाच्या विरोधातील दिनांक २ ऑक्टोबर, १९३९ रोजीचा सार्वत्रिक संप; महागाई भत्त्यासाठी मुंबईत घडवलेला गिरणी कामगारांचा अभूतपूर्व संप (१९३९-४०); वयाच्या ७५ व्या वर्षी केलेला मुंबई गिरणी कामगारांचाच संप - असे अनेक लढे डांगे यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले. ‘संप करा, याबरोबरच संप करू नका, असा आदेश कामगारांना देऊ शकणारे दुर्मीळ नेते’ किंवा ‘संप सुरू व बंद करण्याची अचूक वेळ साधणारे कामगार नेते’या शब्दांत कॉ. डांगे यांचे वर्णन केले जाते. यांच्या रूपाने कामगारांना एक स्वतंत्र, प्रामाणिक, निष्ठावान व धाडसी नेतृत्व प्राप्त झाले होते. ते काही काळ वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियनचे सदस्यही होते. लाल बावटा, लाल सलाम हे शब्द डांगे यांच्यामुळेच महाराष्ट्रात रूढ झाले. कामगार स्त्रियांमध्येही हक्काची जाणीव, निर्भयता, नेतृत्वगुण निर्माण करण्यात डांगे यशस्वी ठरले होते.
परिस्थितीने पिचलेल्या कमकुवत घटकांसाठी सातत्याने चळवळ; वस्तू व सेवांच्या निर्मिती-वितरणावर समाजाची मालकी ह्या तत्त्वांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले आणि मार्क्स अशा अनेक महात्म्यांच्या तत्त्वज्ञानांचे सुयोग्य संतुलन साधण्याचा प्रयत्न कॉ. डांगे यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून केला. त्यांच्या वैचारिक लवचीकतेमुळे स्वपक्षातील लोकांच्या टीकेचे त्यांना धनी व्हावे लागले, पण त्यांच्या एकूण कार्याबद्दल रशियाने त्यांना सर्वोच्च लेनिन पदक देऊन गौरविले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राज्याची भाषा फार्सी की मराठी असा प्रश्र्न उद्भवला होता. ‘महाराष्ट्राची भाषा मराठी. कर्ता मी मराठी, कर्म माझे, क्रिया माझी बाकी तुमचे!’ असे सांगत शिवाजी राजांनी मराठी ही राजभाषा केली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात (१९५९) मुंबईत केलेल्या भाषणात कॉ. डांगे हा संदर्भ देऊन पुढे म्हणाले होते की, ‘भाषेचा वाद मातृभाषा ठेवूनच सुटेल. भाषेचा लढा तांत्रिक नसून जीवनाचा लढा आहे. शिवाजी राजांप्रमाणे जनतेची भाषा घेणे हाच ‘स्व’ राज्याच्या हिताचा मार्ग आहे.’ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही एक प्रमुख वक्ता व नेता या नात्याने त्यांचा सहभाग होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते आघाडीवर होते.कामगार वर्ग मोठ्या संख्येने, एकजुटीने संयुक्त महाराष्ट्र लढ्यात उतरण्यामागे डांगे यांचीच प्रेरणा होती. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध चळवळीतील सहभागांबद्दल त्यांनी सुमारे १७ वर्षे तुरुंगवास भोगला. ते पुढील काळात महाराष्ट्र विधानसभेचे व संसदेचेही सभासद होते. चीन-युद्धानंतर ख्रुश्र्चेव, टिटो आदी नेत्यांना भेटण्यासाठी व भारताच्या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी पंडित नेहरू यांनी कॉ. डांगे यांना खास परदेश दौर्यावर पाठवले होते.
श्रमिक चळवळ आणि राजकारण यांबरोबरच साहित्य व इतिहास या क्षेत्रांतही ते लीलया वावरत असत. धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थकारण व साहित्य या सर्वच क्षेत्रांतील प्राचीन काळापासूनच्या प्रवाहांचा, युगप्रवर्तक व्यक्तींचा त्यांचा सखोल अभ्यास होता. एवढेच नव्हे, तर ते संगीताचेही अभ्यासक होते. साहित्य क्षेत्रातील दलित-विद्रोही साहित्य हे प्रवाह निर्माण होण्यामागील वैचारिक पार्श्र्वभूमी तयार करण्याचे कार्य कॉ. डांगे यांनी केले होते.
भारतीय इतिहास, संस्कृती व वाङ्मयाचे बुद्धिमान अभ्यासक, इंग्रजी व संस्कृत भाषेचे अभ्यासक; साम्यवादी, समाजवादी, राष्ट्रवादी व आंतरराष्ट्रवादी विचारांचे पाईक; प्रखर क्रांतिकारक; प्रभावी वक्ते आणि उत्कृष्ट संसदपटू - असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणजे कॉम्रेड डांगे! जवळजवळ संपूर्ण विसाव्या शतकाचे साक्षीदार असणार्या या परिवर्तनाच्या प्रेषिताचे १९९१ मध्ये दु:खद निधन झाले.