बाबुराव रामचंद्र बागूल

जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोह करणारे आणि

मानवी मनाचा वेध क्रांतिकारी लेखणीतून घेणारे दलित साहित्याचे जनक!

महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक म्हणजे बाबुराव बागूल होत. एकूणच भारतीय साहित्यात मौलिक भर टाकणारे सर्जनशील लेखक आणि दलित साहित्याचे जनक म्हणून आपली प्रभावी ओळख त्यांनी निर्माण केली. बाबुराव बागूल यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यात विद्रोही पर्वाचा खरा प्रारंभ झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिशील तत्त्वज्ञानातून अनेक लोकनेते, कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलावंत निर्माण झाले, व त्यांनी आपापल्या वकुबाप्रमाणे बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी कार्य केले. त्याच परंपरेतील बाबुराव बागूल हे एक ठळक नाव.

बाबुरावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील विहितगाव या ठिकाणी १९३० मध्ये झाला. तिथेच ते वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत वाढले. दु:ख, दैन्य, दारिद्रयाचा जन्मजात अनुभव त्यांना तिथे मिळाला. नंतर त्यांच्या मावशीकडे मुंबईत माटुंगा लेबर कँप येथे त्यांना शिक्षणासाठी पाठवण्यात आले. नगरपालिकेच्या शाळेत ते मॅट्रिक झाले. आंबेडकरी चळवळीचा प्रभावशाली वारसा त्यांच्या वस्तीमधूनच मिळाल्याने इयत्ता चवथीत असतानाच त्यांनी पहिली कविता लिहिली. ते एक आंबेडकर स्तुतिपर गीत होते. त्यांच्या कवीमनाने सुरुवातीला श्रमिकांच्या दु:खाच्या जाणिवेतून कविताच अधिक लिहिल्या.

मॅट्रिकनंतर काही काळ बेकारीत घालवल्यावर मुंबईत लॉंड्रीमधील मार्कर, दवाखान्यात कंपांउंडरचा साहाय्यक, मिलमधे व रेल्वेमधे कामगार अशा छोट्या-मोठ्या नोकर्‍या करत ते श्रमिक जीवन जगत होते. पण एकीकडे भरपूर वाचन, मनन, चिंतन चालू होते. मार्क्स, लेनिन, गॉर्की, चेकॉव्ह तसेच गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा, लेखनाचा त्यांच्या मनावर पगडा होता. शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्याशीही त्यांचा काही काळ संपर्क आला. अण्णांबरोबरच ते कामगार चळवळीत कार्यरत झाले. वाचलेले, पाहिलेले, ऐकलेले आणि अनुभवलेले - अशा सार्‍या विचारांचा सखोलतेने ठाव घेत, त्याची वास्तवदर्शी विश्र्लेषण करण्याची जणू सवयच त्यांनी स्वत:ला लावून घेतली. त्यांच्या आजुबाजूच्या वास्तवाचा त्यांच्या संवेदनशील मनावर जो परिणाम झाला, त्या मानसिक अवस्थेचे व अस्वस्थतेचे रूपांतर त्यांच्या दाहक, वास्तव व परिणामकारक लेखनात झाले. पुढे त्यांनी लेखनाला पूर्ण वेळ वाहून घेतले.

आपल्या लेखन अभिव्यक्तीचा प्रारंभ कवितेतून करणार्‍या बागूलांना ज्या जीवनानुभवातील उग्र दाहकता, भीषणता, विदारकता आणि प्रस्थापित व्यवस्थेला नकार देत त्याविरोधात पुकारलेला विद्रोह मांडायचा होता, तो कवितेच्या फॉर्ममधे व्यक्त करताना अपुरेपणा व असमाधान वाटू लागले. तेव्हा त्यांनी कथा, कादंबरीचा फॉर्म स्वीकारला.

आचार्य अत्रे यांच्या ‘नवयुग’ मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. पुढे १९६३ मध्ये ‘जेव्हा मी जात चोरली’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. या संग्रहातील कथांनी मराठीतील पारंपरिक लिखाणाच्या सर्व चौकटी मोडून, तोडून टाकीत मराठी कथेचा चेहरामोहराच बदलून टाकला. या कथासंग्रहाची जन्मकथा सांगताना बागूल म्हणतात - ‘येथे मी जन्म घेतला म्हणूनच मला जात मिळाली, पण जेव्हा लिहू लागलो, तेव्हा मी देशातल्या आणि जगातल्या सर्व दलित, उपेक्षित-वंचितांचा झालो; आणि म्हणून मी त्यांचे दु:ख, वेदना, त्यांचे संघर्षमय जीवन माझ्या कथेत लिहिले.’ बाबुरावांनी दलित साहित्याचे नाते अमेरिकेतील - आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांच्या साहित्याशी जोडून दलित साहित्याला वैश्विक भान देण्यास प्रारंभ केला. साठोत्तरी मराठी साहित्यात बाबुराव बागूल यांचे नाव अग्रक्रमाने येते.  त्यांची कथा स्वयमेव उत्कृष्टतेचा परमोच्च दर्जा गाठते.

‘मरण स्वस्त होत आहे’ हा १९६९ साली प्रसिद्ध झालेला त्यांचा दुसरा कथासंग्रह. त्यांच्या कथेतून, त्यांच्या कथेतील पात्रांमधून पुढे येणारा आत्यंतिक अमानुषपणा, गुन्हेगारी, क्रौर्य या सर्वांबद्दल तुच्छता निर्माण न करता उलट वाचकाच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यात ते कमालीचे यशस्वी ठरले. ही माणसे अशी का वागतात? त्यांना असे वागायला भाग पाडणारी गूढ नियती यामागे नेहमीच नसते, तर इथली जातीय व्यवस्थाही त्याला कारणीभूत ठरते हे वाचकाच्या मनावर ठसवले जाते व हेच त्यांच्या साहित्यकृतींचे उत्तुंग यश आहे.

‘दु:ख हे शोषणातून निर्माण होते’ ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच मुरळी, वेश्या, पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या स्त्रिया असे विषय त्यांच्या कथानकात येतात. झोपडपट्टीतील गलिच्छ वस्ती, त्यांचे दैनंदिन चालणारे नैतिक-अनैतिक व्यवहार हे सारेच अंगावर येणारे असे वाटले, तरी ते वास्तव असल्याने जणू काही त्यांच्यात परकायाप्रवेश करून, त्या लोकांच्या मनातली घुसमट ते आपल्या लेखणीतून समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवतात.

त्यांचे साहित्य हे कलावादी अथवा केवळ रंजनासाठी नसून त्यांच्या लिखाणाला तात्त्विक बैठक आहे. ते केवळ ‘लेखक’ न राहता, त्यांनी साहित्य चळवळीबरोबरच बहुजनांच्या सामाजिक चळवळींनाही आपल्या विविध भाषणांमधून, वैचारिक लेखनातून बळ पुरवले. ज्ञानविज्ञान आणि लोकशाही यांचे ते निष्ठावंत पुरस्कर्ते होते.

नामदेव ढसाळ यांनी तर त्यांची तुलना ‘दस्तयेवस्कीशी’ केली आहे. रशियन राज्यक्रांतीपूर्व काळात दस्तयेवस्कीच्या कथा-कादंबर्‍यांनी वास्तववादी पद्धतीने सामान्य माणसाचे चित्रण करून क्रांतिपूरक प्रबोधन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. दस्तयेवस्की आणि बाबुराव बागूल यांच्यात एकसमान सूत्र सांगता येईल, ते म्हणजे दोघांचीही कलावंत म्हणून माणसाच्या माणूसपणाशी असलेली अत्यंत प्रगाढ बांधिलकी. दोघांनीही मानवतावादी वैश्विक दृष्टीकोनातून, वास्तववादी अंगाने आपापले साहित्य-अविष्कार घडवले.

नाट्यमय घटना, आवेगपूर्ण निवेदन, उत्कट भाषाशैली यांमुळे त्यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. दारूण वास्तवाची त्यांच्या कथेत उमटणारी चित्रे वास्तवाच्या पलीकडे जाऊन त्याला व्यापक, अर्थपूर्ण करतात.

त्यांनी कथेबरोबरच सूड (दीर्घकथा), अघोरी, कोंडी, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा, सरदार, पावशा व पाषाण या कादंबर्‍या आणि ‘आंबेडकर भारत-खंड१ व खंड २’ तसेच ‘दलित साहित्य-आजचे क्रांतिविज्ञान’ असे वैचारिक ग्रंथही लिहिले.

मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणार्‍या बाबुराव बागूल यांना त्यांच्या साहित्यातील व चिंतनातील प्रतिमेमुळे म.ना.वानखेडे यांनी ‘दलित अंग्री यंग मॅन’ असे संबोधले होते. त्यांच्या लेखनातील स्फोटक शब्द ‘व्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याची भाषा’ बोलतात, तेव्हा त्यांच्या नसानसांत मनूप्रणीत व्यवस्थेबद्दल किती चीड आहे, हे प्रत्ययास येते. त्यांच्या एका कवितेत ते म्हणतात -

                  इथे तुझा जन्म झाला असेल तर

                  तुला व्हावेच लागेल आंबेडकर

                  युगांतरकारी आंबेडकर

                  क्रांतिकारी आंबेडकर

                  मनूचा मर्मांतक वैरी आंबेडकर...

जोपर्यंत भेदाभेद पाळणारी जातिव्यवस्था अबाधित राहील, तोपर्यंत या देशात सर्वार्थाने स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रस्थापित होऊ शकणार नाहीत, हा स्पष्ट विचार बागुल वेगवगळ्या पद्धतीने आपल्या साहित्यातून व्यक्त करतात.

बाबुराव बागुल यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य साहित्य - संस्कृती महामंडळ, फाय फाउंडेशन - यांचे पुरस्कार प्राप्त झाले. पहिले विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन यांसह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.

मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणार्‍या बाबुरावांचे वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने नाशिक येथे निधन झाले. त्यांच्या साहित्यातील नकार, विद्रोह, आणि मानवतावादी जीवनमूल्यांचा पुरस्कार ही त्रिसुत्री अत्यंत प्रभावी ठरली. मानवी मनाचा शोध त्यांच्या-एवढा दुसर्‍या कोणत्याही  कथालेखकाने क्वचितच घेतला असेल.  त्यामुळे बागुल यांचे मराठी साहित्यामधे अनन्यसाधारण असे स्थान आहे. ‘मानदंड’ ठरण्याइतके ते साहित्य महनीय आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel