सुरेश भट

गझलेचा दीप महाराष्ट्रात अखंडपणे तेवत ठेवणारे ‘मराठी गझलसम्राट’!

 

स्वातंत्र्योत्तर काळातील एक अतिशय लोकप्रिय व तेवढेच कलंदर, मनस्वी गझलकार, कवी म्हणजे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील सुरेश श्रीधर भट होत. ‘रंगूनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा’ असे जाणीवपूर्वक लिहिणारे व तसेच जीवन जगणारे हे अत्यंत मनस्वीपणे व उत्स्फूर्तपणे वागणारे कलाकार.

सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा. त्यांचे वडील नामंकित डॉक्टर होते व ते अतिशय देवभोळे होते. तर आई शांताबाई भट या अमरावतीमधील डाव्या विचारसरणीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या अर्थातच वृत्तीने नास्तिक होत्या. अशा दांपत्याचे सुरेश भट हे अपत्य ! ते पुढे आईसारखे निरीश्र्वरवादी बनले. पेहरावाबाबत, एकूण राहणीमानाबद्दल बेदरकार झाले.

साधारणपणे १९५६ पासून त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली. त्या काळात केशवसुत, भा. रा. तांबे, कुसुमाग्रज या कवींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. १९५५-५६ मध्ये त्यांनी ज्या काही कविता लिहिल्या, त्या गझल आकृतीबंधामधील (फॉर्ममधील) आहेत हे त्यांना नंतर कळले. हा नकळतपणे त्यांच्या लिखाणात आलेला कवितेचा-गझलचा आकृतीबंध पुढे त्यांच्या जीवनाला नवे वळण देणारा ठरला. त्यांचे ध्येय निश्र्चित करणारा ठरला. सुरेश भट यांनी नंतर त्याविषयी जाणीवपूर्वक अभ्यास केला. गालिब, इकबाल, जिगर मुराराबादी, फैज अहमद फैज आदी कवींच्या गझलांचा अभ्यास त्यांनी केला. त्यासाठी ते उर्दू, फारसी भाषा शिकले. गझलेतील मर्म स्वत: जाणून, समजून घेऊन ते इतर कवींपर्यंत, रसिकांपर्यंत पोहोचवायचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. ते स्वत: काव्यवाचनाचा कार्यक्रम उत्तम रीतीने सादर करत असत.

पायाच्या किंचित अपंगपणामुळे लहानपणापासून भोगलेली वंचना, उपेक्षा तसेच पुढे अत्यंत लोकप्रियता ही दोन्ही टोके अनुभवणारे असे त्यांचे वैयक्तिक आयुष्य होते. आयुष्याच्या या प्रवासात कवितेशी असलेले त्यांचे इमान अभंग राहिले. केवळ कवितेशी असलेले इमान अभंग राहिले नाही , तर महाराष्ट्र व मराठी भाषा यांवर त्यांचे मनस्वी प्रेम असल्यामुळे त्यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीतून अभिमानाने व्यक्त केला.  मराठी भाषेवरच्या त्यांच्या प्रेमाचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची ही कविता -

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो  मराठी.

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी.

आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी,

आमुच्या नसानसात नाचते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी,

आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी,

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी.

येथल्या फुलाफुलात हासते मराठी, येथल्या दिशादिशात दाटते मराठी,

येथल्या नगानगात गर्जते मराठी, येथल्या दरीदरीत हिंडते मराठी,

येथल्या वनावनांत गुंजते मराठी, येथल्या तरुलतात साजते मराठी,

येथल्या कळीकळीत लाजते मराठी, येथल्या नभामधून वर्षते मराठी,

येथल्या पिकामधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी,

येथल्या चराचरात राहते मराठी.

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरीच हाल सोसते मराठी,

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.

 

माणसांचा दुटप्पीपणा, स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता या विषयीचा प्रखर संताप व्यक्त करताना त्यांची शब्दकळा जेवढी तीक्ष्ण, धारदार, उपरोधिक बनते तेवढीच प्रेम, प्रणय, विरह या भावना व्यक्त करताना त्यांची लेखणी तरल, हळुवार बनते. हे त्यांच्या काव्य लेखनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. ‘मलमली तारुण्य माझे’, ‘मालवून टाक दीप’, ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’   ही हळूवार गीते लिहिणारा हाच कवी ‘उष:काल होता होता, काळरात्र झाली’ किंवा ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ यांसारखी तेजस्वी, वीररसपूर्ण गीते लिहून जातो तेव्हा स्तिमित व्हायला होते. त्यांचे रूपगंधा (१९६१), रंग माझा वेगळा (१९७४), एल्गार(१९८३), व झंझावात (१९९४) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

दरम्यान सुरेश भट यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. तसेच तरुण भारत, लोकसत्ता, मराठा आदी वृत्तपत्रांमधून वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम केले. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

‘गझल’ या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व दृढतापूर्वक प्रसार हे सुरेश भट यांचे मराठी काव्यपरंपरेतील महत्त्वपूर्ण योगदान आहे. प्रामुख्याने लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर,सुरेश वाडकर या कलाकारांनी  त्यांचे शब्द घराघरांत, मराठी रसिकांच्या मनामनांत पोहोचवले. त्यांच्याचमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गझल लोकप्रिय झाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कवी गझल लिहू लागले.

सुरेश भट यांच्या निधनानंतर, त्यांचीच गझलची परंपरा पुढे नेणारे कवी सदानंद डबीर यांची प्रतिक्रिया भट यांच्याबद्दल बरेच काही सांगून जाते...

अंत्ययात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे,

धूळही रसत्यातली त्या गायला लागेल रे,

तो कवी होता न साधा एक झंझावात तो

शब्द सांभाळून त्याला न्यायला लागेल रे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel