बा.सी.मर्ढेकर

मराठी साहित्यविश्र्वातील नवकवितेचे आद्य प्रवर्तक !

केशवसुतांनंतरचे मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी म्हणून बा. सी. मर्ढेकरांचा मानाने उल्लेख केला जातो. साहित्यातीलपूर्वपरंपरा मोडून नवी वाट चोखाळणे, समकालीनांवर प्रभाव टाकणे आणि उत्तरकालीन लेखकांना नवी दिशा दाखवणे, असे तिहेरी कार्य करणारे विसाव्या शतकातील मराठी साहित्यातील समर्थ कवी, साहित्यिक म्हणजे बाळ सीताराम मर्ढेकर होत. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले.

मर्ढेकरांचा जन्म खानदेशातील (जळगाव जिल्ह्यातील) फैजपूर येथे झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. झाल्यानंतर त्यांनी काही काळ टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. पुढे काही काळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. तसेच आकाशवाणीमध्ये केंद्र अधिकारी (१९३८) या पदावर त्यांनी काम केले.

शिशिरागम(१९३९), काही कविता(१९४७), आणखी काही कविता (१९५१) हे मर्ढेकरांचे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. यात सर्व मिळून फक्त सव्वाशेच्यावर कविता असल्या, तरी त्यामध्ये गुणात्मक मूल्य एवढे होते की, त्यांनी मराठी साहित्यावर ‘युगप्रवर्तनात्मक’ असा प्रभाव पाडला. या उच्च दर्जाच्या व व्यापक आशयाच्या कवितांमध्ये मराठी साहित्यातील कोंडी फोडण्याचे सामर्थ्य दिसून येते.

मर्ढेकरांनी जीवनातल्या अशाश्र्वताचे आणि दु:ख-दैन्याचे भान कवितेतून तीव्रपणे व्यक्त केले. नव्या जाणिवेची, प्रयोगशील, चिंतनशील तर कधी भावोत्कट अशी त्यांची कविता त्यांच्या हयातीतच चर्चेचा विषय बनली. त्यांच्या कवितेवर अश्र्लीलतेचा आरोप करण्यात आला होता. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तताही झाली. त्यांची कविता आशय अन् अविष्काराच्या बाबतीतही प्रयोगशील व क्रांतिकारक होती. सांकेतिक शब्दकळा तिने नाकारली. (उदा. `पिपांत मेले ओल्या उंदिर' ही पूर्णत: नवी शब्दरचना)

नव्या यंत्र युगातली माणसांची घुसमट, अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी त्यांनी नव्या प्रतिमांचा आश्रय घेतला. (उदा. पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी, तरी पंपतो कुणि काळोख, सर्वे जन्तु रूटिना: । सर्वे जन्तु निराशया:। सर्वे छिद्राणी पंचन्तु। या कश्र्चित दु:ख लॉग भरते।।)

अशी नवीन काव्यशैली अवलंबताना दुर्बोधतेचे व अनाकलनीयतेचे आव्हानही त्यांनी पत्करले. पण ते स्वत:च्या अनुभूतींशी कायम प्रामाणिक राहिले. नेहमीच्या निराश, उद्विग्न अवस्थेतील कवितांबरोबरच ‘पोरसवदा होतीस -  किंवा `किती तरी दिवसांत- दवात आलिस भल्या पहाटे’ यांसारख्या प्रसन्न, नितांत सुंदर अशा कविताही त्यांनी लिहिल्या.

नवीनता ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली. वाङ्‌मयीन महात्मता (१९४१), सौंदर्य आणि साहित्य (१९५५) ह्या समीक्षाग्रंथांतून उत्कृष्ट समीक्षालेखनाचा परिपाठ त्यांनी दिला. पाणी, तांबडी माती व रात्रीचा दिवस या तीन कादंबर्‍या, एक नाटक (नटश्रेष्ठ) व चार संगीतिका लिहून हेही साहित्यप्रकार मर्ढेकरांनी समर्थपणे हाताळले.

आशय आणि अभिव्यक्तीत अखेरपर्यंत नवता जोपासणार्‍या या मराठी युगप्रवर्तक कवीचा मृत्यू १९५६ मध्ये दिल्ली येथे झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel