निळू फुले
‘अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच’
लोकरंजनातून लोकप्रबोधन हे सूत्र प्रमाण मानून, आयुष्यभर सामाजिक बांधिलकी हे मूल्य अंगी बाणवून सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ कलाकार व कार्यकर्ते म्हणजे निळू फुले होत.
निळूभाऊंचा जन्म पुण्याचा(१९३०). पुण्यात त्यांचा संबंध ‘सेवादला’शी व एस. एम. जोशी, शिरुभाऊ लिमये, कमल पाध्ये, प्रमिला दंडवते, ग. प्र. प्रधान यांच्याशी आला. सेवादलाच्या कलापथकात काम करण्याची संधी व लोकनाट्यात काम करीत असताना ग. दि. माडगुळकर, वसंत बापट, पु. ल. देशपांडे आदी कलाकारांशी निर्माण झालेली जवळीक हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. या काळात सेवादलाचे कार्य आणि काही लोकनाट्ये व व्यावसायिक नाटकांतून भूमिका असा निळूभाऊंचा दुहेरी प्रवास सुरू झाला. दरम्यान बागकामाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी सुमारे ११ वर्षे आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये बागकामाची नोकरीही केली.
‘लवंगी मिरची कोल्हापूरची’ (दिग्दर्शन व अभिनय) व कथा अकलेच्या कांद्याची (अभिनय) या त्यांच्या सुरूवातीच्या लोकनाट्यांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके व मराठी तसेच काही हिंदी चित्रपट या सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयशैलीचा ठसा निळूभाऊंनी उमटवला. कला क्षेत्रामध्ये ते सुमारे ५० वर्षे कार्यरत होते. १९५७ मध्ये त्यांनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा पहिला वग लिहिला होता. ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६५) या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘शापित’, ‘जैत रे जैत’, ‘पांढर’, ‘एक होता विदूषक’ (मराठी) व ‘कुली’, ‘सारांश’, ‘मशाल’, ‘वो सात दिन’ (हिंदी) अशा अनेक (सुमारे १५०) दर्जेदार मराठी -हिंदी चित्रपटांतून त्यांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या. प्रामुख्याने गावचा बेरकी सरपंच, खलनायकी राजकारणी, कुटुंबांत-गावातल्या लोकांमध्ये भांडणे लावून देणारा कळीचा नारद अशा आशयाच्या त्यांच्या नकारात्मक भूमिकांनी महाराष्ट्राला वेड लावले. निळूभाऊंनी असंख्य खलनायकी भूमिका तर सहजतेने रंगवल्या, त्याचबरोबर त्यांनी काही विनोदी छटा असलेल्या, काही चरित्र भूमिका, सामान्य मध्यमवर्गीय, पत्रकार, रगेल पाटील, गरीब शेतकरी, चतुर राजकारणी अशा अनेक छटा असलेल्या भूमिका त्यांनी तेवढ्याच ताकदीने जिवंत केल्या. ‘सिंहासन’मधील सत्ताकेंद्री राजकारणाचा मूक साक्षीदार असलेला, त्यांनी रंगवलेला पत्रकार मराठी रसिकांच्या मनात कायमच राहील.
पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, राजकारण गेलं चुलीत ही त्यांची लोकनाट्येही गाजली. सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे आदी नाटकांच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली. त्यांनी काम केलेल्या नाटकांची संख्या चित्रपटांपेक्षा कमी असली, तरी त्यांचे अधिक प्रेम होते ते मराठी रंगभूमीवरच! महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट अभिनेता म्हणून निळूभाऊंना तीन वेळा गौरविले. संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार हे पुरस्कारही त्यांना लाभले.
निळूभाऊंचा बेरकी, संपूर्ण देहबोलीतून खलनायकी दर्शविणारा अभिनय, त्यांचा खर्जातला वैशिष्ट्यपूर्ण आवाज यांची नक्कल करत, त्यावरून ‘मिमीक्री’ करत आज महाराष्ट्रातील शेकडो कलाकार लोकांचे मनोरंजन करत आहेत. यावरूनच निळूभाऊंची अभिनयातील श्रेष्ठता सिद्ध होते.
१९९६ नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रातून जवळजवळ निवृत्तीच स्वीकारली. पुढील काळात त्यांनी कुटुंबासाठी वेळ देण्याचा प्रयत्न केला; वाचन, संगीत या गोष्टींना जवळ केले. समाजासाठीच कला ही शिकवण त्यांनी आयुष्यभर जोपासली. सेवादलाच्या कलापथकात काम करीत असताना आपल्या नोकरीच्या कमाईतील १० टक्के वाटा समाजासाठी, सेवादलाच्या उपक्रमांसाठी देण्याचा नियम त्यांनी कसोशीने पाळला. पुढेही नाटके, चित्रपट यांच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता निधीही त्यांनी संकलित केला. या प्रकारे त्यांनी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी विविध सामाजिक कामांसाठी उभा केला.
समाजाचे ऋण मानणार्या, माणुसकी जपणार्या, संवेदनशील अशा या ज्येष्ठ कलाकाराचे दि. १३ जुलै, २००९ रोजी पुणे येथे दु:खद निधन झाले.
महाराष्ट्रात निवडणुकांतील मतदानाद्वारे गावगावात वेळोवेळी अनेक स्थानिक नेते सरपंच म्हणून निवडून येतील, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या या सार्वकालिक ‘सरपंचा’ ला महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही...